ज्या गोष्टीमुळे आपला भारत देश जगाला भुरळ घालत असेल तर ती बाब म्हणजे लोकशाही. या लोकशाहीला बळकट करणारी प्रणाली म्हणजे मतदान. प्रजासत्ताक दिन म्हणजेच २६ जानेवारीच्या पूर्व संध्येला राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. ‘निवडणुका सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागी बनवणे’ ही राष्ट्रीय मतदार दिवस २०२२ साठीची यंदाची संकल्पना आहे.
सगळ्यांना माहित असणाऱ्या दोन राष्ट्रीय सणांबरोवरच याही दिवशी नवीन मतदार बनावा, त्यांच्यात मतदाना संदर्भात जागृती व्हावी, भारतीय घटनेने नागरिकाना दिलेला मतदानाचा अधिकाराचा वापर निर्भयपणे झाला पाहिजे. यासाठी दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी भारतीय लोकशाही अधिक बळकट व्हावी. यासाठी भारतीय घटनेमध्ये बदल करुन वय वर्ष २१ ऐवजी १८ व्या वर्षी मतदानाचा हक्कय मतदारांना मिळवून दिला. मतदान प्रक्रियेतील संख्यात्मक वाढ व्हावी व सक्षम लोकशाहीची बिजे भारतीय लोकशाही प्रणालीत अधिक बळकटीसाठी सातत्याने मतदान जागृतीतून भारतीय लोकशाहीच्या मूल्याची जपणूक व्हावी यासाठी शासनही प्रयत्नशील आहे. निवडणूक आयोग व शासन स्तरावरुन आजवर ही चळवळ व्यापक स्वरुपात व्हावी. यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांतून भारतीय निवडणूक आयोगासह राज्यातही मोठ्या प्रमाणात मतदार जनजागृती करण्यात येते. आपल्या देशामध्ये २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून प्रति वर्षी साजरा करण्यात येतो. भारत निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० या दिवशी झाल्याने हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. २०११ पासून दरवर्षी २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. ज्याप्रमाणे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन, १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. यामागे त्या त्या दिवशी त्या त्या घटनेची आठवण जागृत राहावी व त्याची प्रेरणा घ्यावी असा हेतू असतो. त्याप्रमाणे मतदारांमध्ये जागृती निर्माण व्हावी हा मतदार दिन साजरा करण्यामागे मुख्य हेतू आहे. तरुण वर्ग हा देशाचा आधारस्तंभ आहे. जगामध्ये सर्वात जास्त तरुण वर्ग म्हणून चीननंतर भारत दोन नंबरवर आहे. त्यामुळे तरुणांनी अधिक पुढे येऊन, मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे व समृद्ध सशक्त अशा लोकशाहीचा पाया अधिक मजबूत करावा अशी अपेक्षा आहे.
मानवी जीवन अधिकाधिक सुसह्य करण्यासाठी, शास्रज्ञ मंडळी अहोरात्र मेहनत घेऊन विविध क्षेत्रात संशोधन करीत असतात. निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थितीशी झगडत देशाच्या सीमारेषेवर आपले सैनिक डोळ्यात तेल घालून प्रसंगी प्राणाची बाजी लावून देशाचे संरक्षण करीत असतात. विविध उद्योगांना चालना देऊन अनेक उद्योगपती देशाच्या विकासामध्ये हातभार लावत असतात. तसेच काळ्या आईच्या सेवेमध्ये आपला घाम गाळून बळीराजा देशाला सुजलाम सुफलाम करीत असतो. आपापले कर्तव्य चोखपणे पार पाडून ही सर्व मंडळी आपआपल्या परीने देशसेवाच करीत आहेत. त्याप्रमाणे मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपले कर्तव्य पार पाडणे ही देखल एक प्रकारची देशसेवाच आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply