‘नटसम्राट’ हा चित्रपट नक्की कुणाचा? तो फक्त विश्वनाथ दिनकर पाटेकर (वि.दि.पाटेकर) म्हणजेच नाना पाटेकर यांचाच? कारण जाहीरातीमध्ये तर त्यांचाच चेहेरा दिसतो? पण चित्रपट पाहिल्यावर लक्षात येते की हा चित्रपट फक्त वि.दि.पा. म्हणजेच नाना पाटेकरांचाच नाही तर अनेकांचा आहे.
हा चित्रपट विक्रम गोखले यांचा पण आहे. तसे पाहीले तर विक्रम गोखले यांची भूमीका तशी दुय्यम आहे. नानाच्या तुलनेने त्यांना मिळालेले ‘फुटेज’ बरेच कमी आहे. पण एका दुय्यम भूमिकेचे सुद्धा कसे ‘सोने’ करता येते हे विक्रम गोखले यांनी दाखवून दिले आहे. ‘नटसम्राट’ हा खरे म्हणजे नाना पाटेकर व विक्रम गोखले या दोन ‘नटसम्राटां’च्या अभीनयाची जुगलबंदी आहे. यात कमी फूटेज मिळालेले विक्रम गोखले नाना एव्हडाच ‘भाव’ खाऊन जातात. एखाद्या भूमिकेचे सोने करणे हे त्या भूमिकेला मिळालेल्या ‘फूटेज’ वर अवलंबून नसते तर अभिनेत्याच्या अभिनय कौशल्यावर अवलंबून असते हे विक्रम गोखले यांनी दाखवून दिले आहे.
नटसम्राट हा चित्रपट मेधा मांजरेकर यांचा आहे. यापूर्वी त्यांनी कोणत्या चित्रपटात काम केले आहे किंवा नाही हे माहीत नाही. तसेच नानांच्यापेक्षा त्या तरुण आहेत. नानासारख्या कसलेल्या अभिनेत्यापूढे ठामपणे उभे रहाणे हेच एक आव्हान असते. असे असुनही त्यांनी उभी केलेली ‘नटसम्राटांची पत्नि’ ‘सरकार’ लाजबाब. वरून शांत दिसणारी पण आतून अत्यंत कणखर असणारी ‘सरकार’ त्यांनी अत्यंत ताकतीने उभी केली आहे.
नटसम्राट हा ‘नटसम्राटांच्या’ सुनेची भूमिका करणार्या नेहा पेंडसे व त्यांच्या मुलीची भूमिका करणार्याा मृण्मयी देशपांडे यांचा पण आहे. सासर्यां च्या उद्योगांना कंटाळून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार्याृ सुनबाई तर वडिलांवर चोरीचा आळ घेऊन त्यांना बदनाम करु पहाणारी मुलगी या भूमिका या दोन अभिनेत्रींनी ज्या दाकदीने उभ्या केल्या आहेत त्याला तोड नाही.
हा सिनेमा यामध्ये छोट्या छोट्या भूमिका करणार्याा अनेक आर्टिस्टचा आहे. नटसम्राटांना वडापाव खायला घालणारी म्हातारी मुसलमान बाई, त्यांना सावलीसारखी साथ देणारा दाढीवाला एनआरआय, शेवटी शेवटी त्यांना साथ देणारा दारुड्या तरूण, तर लंडन रिटर्न्ड तरुणाच्या छोट्या भूमिकेत वावणारे जेतेन्द्र जोशी, तर नटसम्राटांची नात झालेली छोटी चिमुरडी, या सगळ्यांचीच कामे अप्रतीम. हा त्यांचा पण सिनेमा आहे.
या सिनेमाचे संवाद हा प्राण आहे. याचे संवाद लेखन किरण यज्ञोपवीत व अभिजीत देशपांडे यांचे आहे. हा सिनेमा खरे म्हणजे त्यांचा तर आहेच पण या चित्रपटाची उत्कृष्ट फोटोग्राफी करणार्याा अजिथ रेड्डी यांचा पण आहे. ‘लास्ट पण नॉट द लिस्ट’ हा चित्रपट या सर्वांची सुरेख गुंफण करणारे याचे दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर (म.वा.मां.) यांचा तर आहेच आहे.
या चित्रपटाची ‘थिम’ तशी काही नवीन नाही. एक बाप निवृत्तीनंतर आपली सर्व संपत्ती मुलाबाळांना वाटून टाकतो व पुढे मुले त्याला कशी बेघर कराता व त्याला ‘कोणी घर देता का घर’ अशी भीक मागत रस्त्यावरून फिरावे लागते अशी एका ओळीत या सिनेमाची स्टोरी सांगात येईल. याच थिमवर पुर्वी अमिताभ बच्चन व हेमा मालिनी यांचा ‘बागबान’ हा चित्रपट आला होता व तुफान गाजला होता. अशा प्रकारच्या चित्रपटांमध्ये हमखास डोळ्यातून आश्रु हे येतातच येतात. मग ‘नटसम्राट’ मध्ये वेगळे काय आहे? हा चित्रपट ‘डोळ्यात आंसु आणि ओठांवर हसू’ या कॅटेगरीतला आहे. असे चित्रपट काढणे फार कठीण असते. पूर्वी चार्ली चॅपलिन व राज कपूर यांना ही कला जमली होती. हाच करिष्मा राजा परांजपे यांनी त्यांच्या ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटात दाखवला होता. राजा परांजपे, ग.दि.माडगूळकर व सुधीर फडके यांच्या मुशितून निर्माण झालेली ही अजरामर कलाकृती आहे. त्यानंतर कुठलाच मराठी चित्रपट याच्या तोडीस पोचु शकला नाही. पण ‘नटसम्राट’ ने मात्र ही पातळी आवश्य गाठली आहे. पण तो ‘जगाच्या पाठीवर’ च्या पूढे मात्र गेलेला नसला तरी ही पातळी गाठणे हे ही नसे थोडके.
‘नटसम्राटांच्या’ भाषेत बोलायचे तर हा चित्रपट म्हणजे उत्तम भट्टी जमलेली, डोळ्यात आसू व ओठांवर हसू आणणारी, विलक्षण झींग आणणारी जांभळाची दारू आहे.
आता ही दारू प्यायची की नाही, म्हणजेच हा चित्रपट बघायचा की नाही जे ज्याचे त्याने ठरवावे.
(मी नाना पाटेकरांचा उल्लेख वि.दि.पाटेकर असा केला आहे या बद्दल क्षमस्व. जर चित्रपटाचा देग्दर्शक आपले नाव महेश वामन मांजरेकर असे जाहीर करतो मग नाना पाटेकरांचा उल्लेख विश्वनाथ दिनकर पाटेकर किंवा वि.दि.पा. असा करावयास काय हरकत आहे? असो)
— उल्हास हरी जोशी, मोः-9226846631
नमस्कार.
उत्कृष्ट लेख.
कांहीं उल्लेख अजून असायला हवे होते. ( कदाचित फक्त या सिनेमाबद्दल लिहायचें ठरवल्यानें आपण त्याचा उल्लेख केला नसेल).
– नटसम्राट हें नाटक वि. वा. उपाख्य तात्यासाहेब शिरवाडकर यांनी लिहिलेलें आहे. ही गोष्टही फार महत्वाची आहे. अर्थात्, विक्रम गोखले यांची भूमिका माटकात नव्हती; ती सिनेमात नवीन टाकलेली आहे, ( आणि खरोखरच विक्रम गोखले यांनी तिचें सोनें केलेलें आहे).
– शिरवाडकरांनी हें नाटक शेक्सपियरच्या ‘किंग लियर ’ या नाटकावर आधारलेलें आहे.
सस्नेह
सुभाष स. नाईक