१९७६-७७ साल असावं. भरत नाटय मंदिरला त्याकाळी ” कै. सौ. वसुमती विजापुरे ” एकपात्री अभिनय स्पर्धा होत असत. एका कलावंताने ” नटसम्राटमधील ” चार स्वगतांचा एक एकपात्री प्रयोग सादर केला. त्यापासून प्रेरणा घेत मीही वालचंदला असताना “आर्ट सर्कलच्या ” उदघाटन प्रसंगी नटसम्राटचे छोटे स्वगत सादरीकरणाचा प्रयोग केला.
त्याचे कौतुक झाल्यावर पुढील वर्षी कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठाच्या “यूथ फेस्टिवलमध्ये ” तोच एकपात्री प्रयोग केला. आमचे हक्काचे मेकअपमन विसुभाऊ माझ्या प्रेमापोटी रात्री सांगलीहून कोल्हापूरला आले होते. परीक्षक होते- जयदेव हट्टंगडी ! त्यांनी शाबासकी दिली , प्रमाणपत्र दिले. भरून पावलो होतो तेव्हा!
आज हे आठवायचे कारण म्हणजे त्यांच्या पत्नी,श्रीमती रोहिणी हट्टंगडी यांनी साकारलेली “कावेरी “पाहिली टीव्ही वर “नटसम्राट “मध्ये ! आजही भरून पावलो.
मोहनराव जोशींना जमले नाही. नाना पाटेकर नंतर फसलेला हा दुसरा “नटसम्राट !” विशेषतः कुसुमाग्रजांची स्वगते त्यांना अजिबात पेलली नाही. लागू ,भट, सतीश दुभाषी, यशवंत दत्त साऱ्यांना पाहिलेले असल्याने तुलना अपरिहार्य होती. मात्र रोहिणी हट्टंगडी कुसुमाग्रजांना अभिप्रेत असलेली आणि शांताबाई जोगांच्या जवळ जाणारी मंद तेवती “कावेरी ” सादर करण्यात यशस्वी झाल्या. रविवार संध्याकाळ संपन्न झाली.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply