डांबर ऊर्फ बिटुमीन जुन्या काळापासून इजिप्शियन लोकांना माहीत होते. त्यांच्या लाकडी जहाजांची पाण्यामुळे नासधूस होऊ नये म्हणून ते डांबराचा थर जहाजांवर देत. लाख हे एक प्रकारचे प्लास्टिकच. ही लाख मानवाला फार पूर्वीपासून माहीत आहे.
लाखेपासून बांगड्या आणि अन्य दागिने बनवले जात. लाखेचा थर फर्निचरवर देत.फर्निचर त्यामुळे देखणे दिसे आणि त्यावर हवेचा परिणाम होत नसे. अंबर नावाच्या झाडापासून मिळणारे एक पॉलिमर रेझिन ग्रीक लोकांना माहीत होते. पिवळ्या रंगाचे हे पॉलिमर असते. वर वर्णन केलेली प्लास्टिक ही नैसर्गिक होत. पण सध्या जी प्लास्टिक म्हणून आपण वापरत आहोत ती सर्व कारखान्यात बनवलेली आहेत. म्हणून ती कृत्रिम अथवा सिंथेटिक म्हणायची. खरे म्हणजे पॉलिथिलीन आणि पीव्हीसी ही प्लास्टिक बनवण्यासाठी नाफ्था हे द्रव्य वापरतात. नाफ्था हे कच्च्या (क्रूड ऑइल) तेल आणि नॅचरल गॅसपासून मिळवतात.
कच्चे तेल जमिनीखाली मिळते आणि नॅचरल गॅस या तेलाबरोबर मिळतो. ते नैसर्गिक स्वरूपातच, पण ते प्लास्टिक म्हणून जसेच्या तसे वापरता येत नाही आणि त्यावर कारखान्यात बऱ्याच प्रकारच्या प्रक्रिया कराव्या लागतात. मात्र या सिंथेटिक प्लास्टिकमध्ये नैसर्गिक प्लास्टिकपेक्षा खूपच चांगले गुणधर्म असतात. नॅचरल गॅसपासून मेथानोल बनवतात आणि पुढे र्मल्डिहाइड नावाचे प्लास्टिक बनवतात. नाफ्थापासून इथिलीन मिळते तसेच प्रॉपिलीनही मिळते. या प्रॉपिलीनपासून पुढे पॉलिप्रॉपिलीन, अॅक्रिलिक प्लास्टिक, फिनोल, पॉलियुरेथीन आणि नायलॉन मिळवता येते. तर ब्युटीलीनपासून कृत्रिम रबर मिळते. कृत्रिम रबर आणि नैसर्गिक रबर यांच्या रेणूच्या रचनेमध्ये सारखेपणा असतो; पण एकरूपता नसते. इ.स. १९३० च्या सुमारास ब्युटाडीन व अॅक्रिलोनायट्राइल यांचे सहबहुवारिकीकरण करण्यात आले.
त्यापासून ब्युना एन हा एक रबरी प्रकार मिळाला. रबरामध्ये कार्बन व हायड्रोजन ही दोनच मूलद्रव्ये आहेत. रबराच्या रेणूमध्ये पाच कार्बन अणूबरोबर आठ हायड्रोजन अणू या हिशेबाने ती संयोग पावलेली असतात.
-अ. पां. देशपांडे (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
Leave a Reply