निसर्ग नेहमीच आपल्याला भरभरून देत असतो. अशा या हिरवाईने नटलेल्या भारत देशात आपण जन्मलो हे आपलं भाग्यच! लांबच लांब पसरलेल्या हिमालय पर्वतरांगा, रांगडा सह्याद्री, त्याच्या कुशीत मनमुराद हुंदडणाऱ्या नद्या, त्या नद्यांना प्रेमाने आपल्यात सामावून घेणारे समुद्र, दूरवर पसरलेले वाळवंट हे सर्वच आपल्याला खुणावत असतात. त्या ठिकाणांना भेटी देणे, त्यांच्याविषयी जाणून घेणे, त्यांची माहिती इतरांना सांगणे हा आपल्यापैकी बऱ्याच जणांचा आवडता छंद..
तर आज आपण जाणून घेऊया अशाच काही पर्यटनस्थळांबद्दल… आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय, नागालँड, ओडिशा, राजस्थान, सिक्कीम, उत्तराखंड इत्यादी राज्यांमध्ये आपण पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर जातो. सोबत अंदमान निकोबार, दीव-दमण, दिल्ली, जम्मू-काश्मीर, लडाख, लक्षद्वीप, पाँडिचेरी येथील पर्यटनस्थळेसुद्धा आपल्या यादीत आहेत.
अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, त्रिपुरा, मिझोरम, मणिपूर हा प्रदेश ‘सेव्हन सिस्टर्स’ किंवा ‘पूर्वांचल’ म्हणून ओळखला जातो. जानेवारी २०१९ मध्ये आसाम मधील ‘अरण्यक’ संस्थेने आयोजित केलेल्या पर्यावरण शिक्षणाविषयीच्या एका परिषदेच्या निमित्ताने या ७ भगिनींपैकी ३ भगिनींना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला. आसाम, अरुणाचल व मेघालय.. जिविधतेने नटलेल्या या उत्तर पूर्व भागाचे सौंदर्य विलक्षण आहे. आसाम मधील मानस व काझीरंगा ही वन्यजीव अभयारण्ये सर्वपरिचित आहेतच. तिथे आढळणाऱ्या काही प्राणी व पक्षी प्रजाती भारतात इतर कुठेही आढळून येत नाहीत.
उदाहरणार्थ एकशिंगी गेंडा, रुफस नेक्ड हॉर्नबिल इत्यादी. याबरोबरच आसाममधील कामख्या मंदिर अतिशय प्राचीन आणि सुंदर आहे. आसाम मध्येच ‘कार्बी आंगलाँग’ नावाचा एक प्रदेश आहे. तिथे कार्बी नावाची आदिवासी जमात आढळते. दर फेब्रुवारी मध्ये ‘कार्बी युथ फेस्टिव्हल’ तेथे साजरा केला जातो. तेथील माझे काही तरुण मित्र कार्बी भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी अनेकानेक उपक्रम राबवत आहेत. शेजारीच अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या सीमेवर ‘पक्के’ नावाचे व्याघ्र अभयारण्य आहे. एकाच वेळी साधारण १५० ते २०० रीथ हॉर्नबिल पाहण्याचाही आनंद आपल्याला इथे घेता येईल. धनेश महोत्सव (हॉर्नबिल फेस्टिव्हल) सुद्धा इथे साजरा केला जातो. मेघालयची राजधानी शिलाँग येथे डुकराचे मांस ( पोर्क) अप्रतिम मिळते. मला विचाराल तर आयुष्यात बाकी कुठे नाही गेलं तरी या ७ राज्यांना आवर्जून भेट द्या.
उत्तर पूर्व भागातून निघाल्यावर झारखंड, पश्चिम बंगाल ओलांडून आपण ओडिशा मध्ये पोहोचतो. कोणार्क सूर्य मंदिर, चिलका सरोवर, सिमलीपाल अभयारण्य, खाऱ्या पाण्यातील मगरींचे घर असलेली भिरतकणिका पाणथळ भूमी इत्यादी ठिकाणे आपल्यासाठी ‘सेंटर ऑफ अट्रॅक्शन’ ठरतात. ओडिशातील गहिरमाथा समुद्रकिनारा ऑलिव्ह रीडले कासवाचे अंडी घालण्याचे जगातील सर्वात मोठे ठिकाण आहे. ओडिशामधून छत्तीसगड ओलांडून आपण मध्यप्रदेशमध्ये पोहोचतो. छत्तीसगडचे वैशिष्ट्य असे की भारतातून चित्ता नामशेष होण्याआधी १९४७ मध्ये तो शेवटचा याच राज्यात दिसला होता. आज आफ्रिकेतील चित्ता भारतात आणण्याची चर्चा सुरू आहे. कदाचित पुढील काही वर्षांमध्ये मध्य प्रदेशातील नौरादेशी वन्यजीव अभयारण्यात तो आपल्याला पाहता येईल. मध्य प्रदेश वन्यजीव पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे राज्य आहे. कान्हा आणि बांधवगड वन्यजीव अभयारण्य याच राज्यात आहेत. इथे गेल्यास व्याघ्रदर्शन हमखास होतेच. परंतु जंगल सफारीला जाणे म्हणजे फक्त वाघ बघणे नव्हे तर तेथील इतर जैव विविधता तेवढीच महत्त्वाची आहे. जंगल वाचण्यात एक वेगळाच आनंद असतो असे अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी आपल्या विपुल साहित्यातून सांगितले आहे. गुजरात आणि राजस्थान ही दोन राज्येसुद्धा वनपर्यटनासाठी उत्तम आहेत. गुजरातच्या गीर अभयारण्यात सिंह आढळतात. गुजरात हे संपूर्ण भारतातील एकमेव राज्य आहे ज्यात नैसर्गिक अधिवासात सिंह आहेत. तसेच येथील कच्छचे रण पक्षीनिरीक्षणासाठी अतिशय सुंदर ठिकाण आहे. तेथील Wild Ass हा प्राणी अनेक निसर्गप्रेमींसाठी आकर्षण ठरतो. राजस्थान येथील रणथंबोर नावाचे वन्यजीव अभयारण्य, अनेक किल्ले, सरोवर, महाल अशी ठिकाणे प्रसिद्ध आहेत. ‘पधारो म्हारे देस’ असे म्हणत आपले गोड स्वागत तेथील स्थानिक करतात.
मध्य भारतातून जसजसे आपण उत्तर भारताच्या दिशेने जाऊ लागतो तसतशी तापमानात घट व्हायला सुरुवात होते. अतिशय थंड हवेचे ठिकाण म्हणजे आपले जम्मू-काश्मीर, जे काही महिन्यांपूर्वी केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले. काश्मीरमध्ये पाऊल ठेवल्यावर ‘अगर फिरदौस बर रुए जमी अस्त.. हमी अस्त हमी अस्त हमी अस्त…’ ( जर पृथ्वीवर कुठे स्वर्ग असेल तर तो इथेच आहे) ही भावना मनात आल्यावाचून राहत नाही. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड सुद्धा अप्रतिम राज्ये आहेत. हिमाचल प्रदेशातील ‘मसरूर’ हे दगडात कोरलेले अतिशय सुंदर असे मंदिर आहे. डेहराडून, उत्तराखंड मधील ‘वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ येथे काही महिने एका प्रकल्पानिमित्त राहण्याचा योग आला. तेथील बुद्ध मंदिरे, प्राचीन गुहा न चुकता भेट द्याव्या अशा आहेत.
दक्षिण भारतातील गोवा हे आपल्या प्रत्येकाचेच ड्रीम डेस्टिनेशन आहे. काही दिवस गोव्यात मनसोक्त फिरावं, समुद्रकिनाऱ्यावर जावं, धम्माल करावी अशी सर्वांची इच्छा असते. गोव्यात अनेक पुरातन चर्च, मंदिरे आहेत. गोव्यातील प्रमुख पर्यटन स्थळे बघून झाल्यानंतर तेथील ग्रामीण भागांनाही जरूर भेट द्यावी. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश ही राज्ये देखील जैव विविधतेने नटलेली आहेत.
अंदमान निकोबार हे आपल्या सर्वांचे अतिशय लाडके ठिकाण. इतिहास आणि पर्यावरण यांचा संगम याठिकाणी अनुभवायला मिळतो. अंदमान शब्द उच्चारल्यावर आठवतात ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. पोर्ट ब्लेअर येथील विमानतळाला या महान क्रांतिकारकाचे नाव दिले आहे. अंदमानच्या सेल्युलर जेलमधील त्यांची कोठडी, कोठडीच्या खिडकीतून सहजरित्या दिसू शकेल असे फाशीघर, सावरकरांनी तेथे भोगलेले कष्ट, कोठडीच्या भिंतीवर लिहिलेले महाकाव्य ‘कमला’, तेथील हिंदू मुस्लीम कैद्यांच्या गोष्टी. हे सर्वच डोळ्यासमोर उभे राहते. सन १९११ मध्ये इथे जलदुर्ग उभारला जावा व पूर्वेकडून शत्रूच्या आरमाराने भारतावर हल्ला केला तर, या जलदुर्गाने तो हल्ला इथेच परतवावा अशी इच्छा या महान नेत्याने व्यक्त केली होती.
सावरकर समजून घ्यायचे असतील तर अंदमानला नक्कीच भेट द्यायला हवी. सोबतच स्वच्छ, नितळ पाण्यात स्कुबा डायविंग करून रंगीबेरंगी प्रवाळ बघण्याचा आनंद घेता येतो.
सर्वात शेवटी येऊया आपल्या महाराष्ट्रात आपली राजधानी ‘मुंबई’ अतिशय डौलाने उभी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून येणाऱ्या प्रत्येकाचे ती मनःपूर्वक स्वागत करते. महाराष्ट्रात महाराजांच्या आशीर्वादाने पावन झालेले अनेक गडकिल्ले, थंड हवेची ठिकाणे, कोकणातील हिरवाई याचबरोबर अनेक अभयारण्ये, पठार, सरोवर आहेत. गडकिल्ले ही फक्त भेट देऊन येण्याची ठिकाणे नाहीत तर जगण्याची भावना आहे. चंद्रपूर येथील ताडोबा, साताऱ्यातील कासचे पठार, बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर ह्या ठिकाणांचा तुमच्या ‘बकेट लिस्ट’ मध्ये नक्की समावेश असावा.
नाशिक जिल्ह्यातील नादूर मध्यमेश्वर अभयारण्याचा मुद्दाम उल्लेख करायचे कारण असे की त्याला नुकताच ‘रामसर स्थानाचा’ दर्जा प्राप्त झाला आहे. हे महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थान आहे. इराणमधील रामसर या ठिकाणी १९७१ मध्ये पाणथळभूमी विषयावर पहिली सभा आयोजित करण्यात आली होती. तेव्हापासून २ फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक पाणथळ भूमी दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. पाणथळ भूमीचे संरक्षण व संवर्धन हा यामागील उद्देश. अशी एकूण ३७ स्थाने आपल्या भारतात आहेत.
आपला भारत देश नैसर्गिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, भौगोलिक आणि वैज्ञानिक विविधतेने शृंगारलेला आहे. या भारतमातेच्या पोटी जन्म घेतल्याचा मला सार्थ अभिमान आहे.
लंडन देखा पॅरिस देखा और देखा जापान माईकल देखा, एल्विस देखा सब देखा मेरी जान सारे जग में कहीं नहीं है दुसरा हिंदुस्तान……
दुसरा हिंदुस्तान…
–सुरभी वालावलकर
(व्यास क्रिएशन्स च्या पर्यटन दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)
Leave a Reply