नटवर्य चित्तरंजन कोल्हटकर यांचा जन्म १५ जानेवारी १९२३ रोजी अमरावती येथे झाला.
संगीत रंगभूमीवरील सुप्रसिद्ध अभिनेते चिंतामणराव कोल्हटकर हे त्यांचे वडील तर विनोदी साहित्याचे मेरूमणी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे चित्तरंजन कोल्हटकर यांचे काका. चित्तरंजन कोल्हटकर यांनी कोल्हापूर येथे १९४४ साली ललित कला कुंजच्या भावबंधन याच नाटकाद्वारे रंगभूमीवर पदार्पण केले. मात्र पदार्पणातील त्यांची भूमिका घनःश्यामची नसून मोरेश्वरची होती. घनःश्यामची भूमिका त्यांनी प्रथम १९४९ मध्ये केली. आपल्या समर्थ अभिनयाने त्यांनी भावबंधन नाटकातील घनःश्यामची भूमिका अजरामर केली. मात्र याच भूमिकेने त्यांच्यावर खलनायकाचा शिक्का बसला आणि खलनायकाच्या भूमिकेलाही त्यांनी नवीन उंचीवर नेऊन ठेवले.
तत्पुर्वी १९४७ मध्ये गरीबांचे राज्य या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. कुंकवाचा धनी या १९५० मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात त्यांनी शांताबाई आपटे यांच्याबरोबर नायकाची भूमिका प्रथमच केली. त्यानंतर त्यांनी पेडगावचे शहाणे, शेवग्याच्या शेंगा, मोहित्याची मंजूळा, हिरवा चूडा, थांब लक्ष्मी कुंकु लावते, जावई माझा भला, तू तिथे मी आदी ८० पेक्षा जास्त चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या.
त्यांच्या ऐतिहासिक नाटकातील भूमिका अतिशय गाजल्या. आग्य्राहून सुटका, बेबंदशाही, पद्मिनी, इथे ओशाळला मृत्यू, नटसम्राट आदी प्रसिद्ध मराठी नाटकांतून त्यांनी अजरामर भूमिका केल्या. भावबंधन प्रमाणेच एकच प्याला, स्वामिनी, दुरीतांचे तिमिर जावो, गारंबीचा बापू, पंडितराज जगन्नाथ, अश्रूंची झाली फुले इ. नाटकांमधील त्यांच्या भूमिका प्रसिद्ध आहेत. ‘गारंबीचा बापू’मधील चित्तरंजन कोल्हटकर यांच्या एन्ट्रीला तर टाळ्या पडत असत. काही नाटकांचे त्यांनी दिग्दर्शनही केले.
इंदुर येथे १९८७ मध्ये झालेल्या ६८ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. नाट्यपरिषदेच्या पुणे शाखेचेही ते अध्यक्ष होते. तर संस्कार भारतीचे ते महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदही त्यांनी भूषविले होते. त्यांना सिने आणि नाट्य अभिनयासाठी विविध पुरस्कार प्राप्त झाले होते. त्यात विष्णूदास भावे पुरस्कार, शासनाचा चिंतामणराव कोल्हटकर पुरस्कार, छ.शाहू पुरस्कार, अल्फा गौरव पुरस्कार, नानासाहेब फाटक जीवनगौरव पुरस्कार आदींचा समावेश आहे.
चित्तरंजन कोल्हटकर यांनी रंगात रंगलो मी हे आत्मकथनात्मक पुस्तक लिहिले आहे.
चित्तरंजन कोल्हटकर यांचे निधन २५ ऑक्टोबर २००९ रोजी झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply