नटवर्य गोपाळ गोविंद ऊर्फ नानासाहेब फाटक यांचा जन्म २४ जून १८९९ रोजी झाला.
मराठी रंगभूमीवर फार थोड्या नटांना खलनायकांच्या भूमिका करून यश, कीर्ती आणि संपत्ती यांचा लाभ झाला. अशा थोड्या नटांत नानासाहेबांची गणना प्रामुख्याने होते. जाहिरातीत नटवर्य नानासाहेब फाटक हे नाव वाचले की, प्रेक्षक नाट्यगृहात तोबा गर्दी करीत असत. धिप्पाड आणि बांधेसूद तसेच रेखीव आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्व. रंगमंचावर पाऊल टाकले की, सारा रंगमंच भरून गेला असे वाटत असे. देहयष्टी दृष्ट लागण्यासारखी. नटाला जो ‘डोळा’ लागतो तो नानासाहेबांपाशी होता. आवाज तिन्ही सप्तकांत लीलया फिरणारा. हालचाली कमालीच्या ग्रेसफुल. आवाज पल्लेदार असल्याने कितीही मोठे वाक्य ते अगदी विनासायास, सहजगत्या आणि लीलया फेकीत. त्यांनी केलेल्या सर्व भूमिका ही कुणाचीही नक्कल न करता स्वत:च्या पद्धतीने, विचारपूर्वक केल्या होत्या.
नटाने जीवनातील विविध अनुभव घ्यावेत. अनेक गोष्टी पाहाव्यात, कराव्यात, भोगाव्यात असे त्यांचे मत होते. त्यांना वाटे की, अनुभवाने समृद्ध असे जीवन जर नटाचे नसेल तर त्याला विविध भूमिकांचा आविष्कार उत्तम प्रकारे करता येणार नाही.
विद्यार्थीदशेतली नानासाहेबांची काकासाहेब खाडिलकरांच्या ‘सत्त्वपरीक्षा’ या नाटकातली विश्वारमित्राची भूमिका खूप गाजली, पण त्यांना खरी प्रसिद्धी आणि लोकप्रियता लाभली ती ‘रक्षाबंधन’ या नाटकातील ‘गिरीधर’च्या भूमिकेने. या भूमिकेने त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले. हा सुशिक्षित आणि देखणा नट आपल्याकडे असावा असे गुणग्राहक केशवराव भोसल्यांना वाटले आणि त्यांनी नानासाहेबांना ललितकलेत बोलावले. या नाटक मंडळीत नानासाहेबांचा प्रवेश झाला आणि त्यांच्यातील नाट्यगुणांना वाव मिळेल अशा विविधांगी भूमिका त्यांच्या वाट्याला आल्या.
राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकातील वीरश्रीयुक्त विक्रांतची भूमिका, ‘संन्याशाचा संसार’मधील शंकराचार्यांची भूमिका, ‘सत्तेचे गुलाम’मधील केरोपंत वकिलाची भूमिका, ‘शहाशिवाजी’ नाटकात शहाजी, ‘कृष्णार्जुन युद्धात’ चित्ररथ गंधर्व, ‘हाच मुलाचा बाप’मध्ये वसंत, ‘श्री’ या नाटकातील कुसुमाकर, ‘सोन्याचा कळस’ नाटकातील कामगार बाबा शिगवण इ. भूमिका तर खूपच गाजल्या, पण ‘पुण्यप्रभाव’मधील वृंदावन, ‘एकच प्याला’मधील सुधाकर, ‘झुंजारराव’ नाटकातील झुंजारराव आणि ‘हॅम्लेट’ या भूमिका त्यांच्या सर्वोच्च भूमिका होत.
केंद्र सरकारने सर्वश्रेष्ठ नट म्हणून नानासाहेबांना गौरवचिन्ह अर्पण केले होते. त्यांच्याइतका भव्य, रुबाबदार, देखणा आणि ग्रेसफुल नट आजतागायत दुसरा कुणी झाला नाही.
नानासाहेब फाटक यांचे ८ एप्रिल १९७४ रोजी निधन झाले. आपल्या समूहातर्फे नानासाहेब फाटक यांना आदरांजली.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply