समाजातील प्रत्येक शुभकार्य पार पाडण्यासाठी ‘पुलं’च्या ‘नारायण’ सारखी अंगावर येणारी कामं उत्साहाने झेलणारी एकतरी व्यक्ती असतेच. ‘पुलं’चा ‘नारायण’ हा लग्न ठरण्यापासून ते वऱ्हाडी जाईपर्यंतच्या सर्व जबाबदाऱ्या पुढाकार घेऊन पार पाडतो, अगदी तसाच नाटकाच्या मुहूर्तापासून ते नाटकाचे दौरे पार पाडण्यापर्यंत सदैव राबणारा एक ‘वसंत आचार्य’ होऊन गेला…
सिनेमा जाहिरातीच्या पहिल्या कामापासूनच वसंत आमच्या संपर्कात होता. ‘सासू वरचढ जावई’ हा चित्रपट गजानन सरपोतदारांचा होता, त्यांच्या आधीच्या ‘दुनिया करी सलाम’ चित्रपटापासून त्यांच्या प्राॅडक्शनचे तो काम पहायचा. त्याने अरविंद सामंत यांच्याही अनेक चित्रपटांच्या वेळी काम केले. तो सिने-नाट्यसृष्टीतील प्राॅडक्शनची कामं करण्यात तरबेज होता.
वसंत हा सर्व साधारण उंचीचा, डोक्यावर भांग पाडण्याएवढेच कुरळे केस ठेवलेला, सावळा रंग, गोल चेहरा, बोलके डोळे, तुरळक मिशी, गुळगुळीत दाढी केलेला, अंगात खादीचा रंगीत झब्बा व खाली पांढरी सुरवार, पायात काळी सॅण्डल आणि चेहऱ्यावर कायम हास्य असा असायचा. कधी झब्याऐवजी शर्ट घातलेला असेल तर शर्टची बटणं ढेरीमुळे कोणत्याही क्षणी तुटतील, एवढी ताणलेली दिसायची. ‘गुणगौरव’च्या समोर येऊन, स्कुटरवर बसूनच आम्हाला आवाज द्यायचा, ‘आहेत का नावडकर बंधू?’ आम्ही त्याला आत बोलवायचो.
‘सासू..’ चित्रपटाच्या कामानंतर वसंत येऊ लागला अण्णा कोठावळेंच्या ‘मंगळसूत्र’ या नाटकाच्या निमित्तानं! या नाटकाचे फोटो काढणे, डिझाईन करणे, जाहिराती पेपरला देणे अशा कामांसाठी वसंत वारंवार भेटत राहिला.
आम्ही जेव्हा विवेक पंडित यांच्या नाटकांची डिझाईन करीत होतो तेव्हा वसंत, त्यांच्या नाटकांसाठी व्यवस्थापक म्हणून काम करीत होता. पंडित भेटायला येणार असल्याचा निरोप देणे, त्यांच्या नाटकाच्या तालमीचे वेळी सर्व जबाबदाऱ्या पार पाडणे, बुकींगची व्यवस्था पहाणे यासाठी वसंताची धावपळ चालू असायची.
नरेन डोंगरे यांच्या ‘विच्छा माझी पुरी करा’ या वगनाट्यासाठी तर वसंत फुलटाईम काम करताना दिसायचा.
भालचंद्र पानसे यांच्या अनेक नाटकांसाठी वसंत व्यवस्थापक म्हणून तर होताच त्याहीपेक्षा जास्त करुन नाटकांच्या दौऱ्यामध्ये तो खिंड लढविणारा बाजीप्रभूच असायचा.
केशव करवंदेंच्या नाटकाच्या प्रयोगाची चोख व्यवस्था ठेवताना आम्ही त्याला पाहिलंय. त्यांच्या एका रात्रीच्या प्रयोगानंतर आम्ही सर्व कलाकार व तंत्रज्ञांसोबत जेवण केले आहे.
आशू उर्फ ललिता देसाई यांच्या अनेक नाटकांचे दौरे वसंतानं केले होते. ‘तुझे आहे तुजपाशी’ दौऱ्यातील अमरावती येथील प्रयोगानंतर डाॅ. काशिनाथ घाणेकर गेले. त्यावेळी वसंतच त्यांच्याजवळ होता.
पुण्यातील भरत नाट्य, बालगंधर्व, टिळक स्मारक, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह ही त्याची मंदिरं होती.दिवसभरातील अठरा तास तो इधंच रमायचा. पुण्यातील सर्व सिने-नाट्य कलाकार, सिने-नाट्य निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ या सर्वांबद्दलची अपडेट माहिती त्याला ज्ञात होती. ज्येष्ठ अभिनेते राजा गोसावी, शरद तळवलकर, संगीत नाटकातील दिग्गज अशा कलाकारांशी त्याचा जवळून परिचय होता. लावणी क्षेत्राबद्दलही तो जाणकार होता.
गणपतीच्या सीझनमध्ये वसंताची धावपळ रात्रंदिवस चालायची. फक्त नाटक, सिनेमाच नाही तर त्याने आॅर्केस्ट्राचे देखील व्यवस्थापक म्हणून काम पाहिले होते. सकाळी उठल्यापासून ते रात्रीबेरात्री जमिनीवर अंग टाकेपर्यंत फक्त नाटकाचा, कलाकारांचा, निर्मात्याचा आणि आखलेल्या दौऱ्याचा विचार करणारा हा एकमेव प्राणी होता.
दरम्यान वसंताचं लग्न झालं, त्याला मुलगा झाला. संसाराची जबाबदारी वाढली. त्याची पत्नी नोकरी करीत होती. वसंता तिला सकाळी नोकरीवर सोडून आपल्या दिवसभरच्या उद्योगाला लागायचा.
कधी कामाच्या निमित्ताने आॅफिसमध्ये आल्यावर भरपूर गप्पा मारायचा. सिने-नाट्यसृष्टीचे असंख्य बरेवाईट किस्से ऐकवायचा. नाटकाच्या दौऱ्यातील कलाकारांचे रंजक अनुभव सांगायचा. ते ऐकून असं वाटायचं की, याचं संकलन करुन, पुस्तक काढलं तर नाट्यसृष्टीच्या सुवर्णकाळाचा तो एक अमोल ठेवा होईल. मात्र ते काही झालं नाही.
वसंताच्या सहकार्याने सिने-नाट्य निर्माते मोठे झाले, त्यांनी मिळवलेल्या पैशातून स्वतःचं वैभव निर्माण केलं मात्र वसंत जिथं होता, तिथंच शेवटपर्यंत राहिला.
वसंत आचार्य त्याच्या शेवटच्या दिवशी एका ऐतिहासिक नाटकाच्या तालमीसाठी काम करीत होता. रात्री उशीरा तालीम संपल्यावर तो आपल्या स्कुटरवरुन जंगली महाराज रोडने घरी निघाला होता. संभाजी पार्क जवळून जाताना त्याचा दुर्दैवी अपघात झाला. सकाळी महाजनचा फोन आल्यावर वसंत गेल्याचे समजले.
वैकुंठात आम्ही दोघे गेलो. नाट्य व्यवसायातील असंख्य माणसं त्याच्या अंत्यदर्शनासाठी आलेली होती. अनेक जणांनी त्याला श्रद्धांजली वाहिली. शेवटी विवेक पंडितांनी शोकसभेची तारीख उपस्थितांना सांगितली.
चार दिवसांनी भरत नाट्य मंदिरात शोकसभा भरली. वसंताच्या माणसांनी थिएटर फुल्ल भरलेले होते. स्टेजवरील मान्यवर मंडळींमध्ये ‘मनोरंजन’चे अण्णा कुलकर्णी, अण्णा कोठावळे, नाट्य परिषदेचे पदाधिकारी होते. प्रत्येक नाट्य निर्मात्याने भाषणातून वसंताच्या कामगिरीचा, त्याच्या सेवावृत्तीचा उल्लेख केला. त्याच्या कुटुंबीयांसाठी दोघा तिघांनी आर्थिक मदत जाहीर केली. एका निर्मात्याने ‘माझ्या यापुढील होणाऱ्या प्रत्येक नाट्य प्रयोगातून वसंताच्या नाईटचं पाकीट बाजूला काढलं जाईल.’ असं जाहीर केलं. शोकसभा संपली आणि आम्ही आॅफिसवर परतलो.
आता या गोष्टीला खूप वर्षांचा काळ लोटला आहे. आता पूर्वीसारखे पुण्यात नाट्य निर्माते राहिलेले नाहीत. जी काही नाटकं रंगभूमीवर येतात, ती बहुधा मुंबईचीच असतात. नाट्य व्यवसायालाही मंदीची झळ पोहोचलेली आहे. नाटक नाही तर व्यवस्थापक कुठून येणार? जो नाट्यसृष्टीचा सुवर्णकाळ होता तो आता ‘इतिहासजमा’ झालाय.
आता कुणाला वसंत आचार्य बद्दलची गोष्ट सांगायला गेलं, तर ती खरी न वाटता ती एक ‘दंतकथा’च वाटेल…..
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१९-९-२०.
Leave a Reply