ठाण्याच्या धुळीधुळीच्या कणाकणांत नाटक सामावलेले आहे. त्यामुळे ठाण्यात जन्मलेल्या मुरलीधर गोडे यांच्या नाकातोंडात हे नाटकाचे धूलिकण न घुसते तरच नवल!
त्यांचे शालेय जीवन महाडच्या परांजपे विद्यामंदिरात गेले. विद्यार्थी असताना मो. ग. रांगणेकरांच्या ‘आशीर्वाद’ व ‘माझे घर’ या नाटकात आणि ‘ध चा मा’ या ऐतिहासिक नाटकात अभिनय करून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. एम.ए., बी.एड्. झाल्यानंतर १९६३ पासून महाडच्या परांजपे विद्यालयातच शिक्षक म्हणून आठ वर्षे सेवा केली. या काळात स्नेहसंमेलनासाठी विद्यार्थ्यांचे बालनाट्य दरवर्षी आग्रहपूर्वक बसवले. ‘एक होतं भांडणपूर’, ‘बेटावरचे बहादूर’, ‘निम्मा शिम्मा राक्षस’,‘कळलाव्या कांद्याची कहाणी’, ‘अदृश्य माणूस’, ‘गाणारी मैना’, ‘शेपटीचा शाप’ ही नाटके त्यांनी दिग्दर्शित केली. परांजपे विद्यामंदिरचं स्नेहसंमेलन म्हणजे महाडकरांसाठी एक इव्हेंटच असायचा आणि त्यात होणारे बालनाट्य म्हणजे आनंद पर्वणीच!
याच काळात महाडमधील हौशी मंडळींचा एक नाटकाचा ग्रुप तयार केला. त्यांची ‘असावे घरटे छान’, ‘दुरितांचे तिमिर जावो’ आणि ‘प्रेमा तुझा रंग कसा?’ ही तीन नाटके त्यांनी केली. महाडकरांचा अर्थातच प्रचंड प्रतिसाद त्याला लाभला. याशिवाय आणखी एक वेगळा कलाकारांचा गट कलापथकाच्या स्वरूपात उभा केला. नाव होते ‘यशवंत कलापथक’. शाहीर यशवंत सावंत या निष्ठावंत लोककलाकाराच्या कलापथकातर्फे मुरलीधर गोडे यांनी लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या दोन लोकनाट्याचे २५ प्रयोग रायगड जिल्हाभर झाले. गोडे यांनी लिहिलेली ती लोकनाट्ये होती ‘सस्त्यात लावली राजकन्या’ आणि ‘गाडीला लागलाय घसरा’.
१९७१ ला महाड सोडून ठाण्यातील डॉ. बेडेकर विद्यामंदिर या शाळेत मुरलीधर गोडे दाखल झाले. तेथेही शाळेचा सांस्कृतिक विभाग त्यांच्याकडे आला. प्र. ग. वैद्य हे खंदे शिक्षक त्यांच्या जोडीला होतेच. बेडेकर विद्यामंदिरसाठी स्नेहसंमेलन व विविध स्पर्धांकरीता बालनाटिका त्यांनी बसवल्या. ‘जादूचा शंख’, ‘नवा चष्मा’, ‘राजा राणीला घाम हवा’, ‘कहाणी कोरड्या गाभाऱ्याची’, ‘बांध फुटला’, ‘गाणारी मैना’, ‘बेटावरचे बहाद्दर’ अशी अनेक नाटके बसवली. याशिवाय ठाण्यातील नाट्यचळवळीशी आणि नाट्यसंस्थांशी गोडे यांचा सतत व निकट संपर्क राहिला. ‘मित्रसहयोग’, ‘कलासरगम’, ‘नाट्यछंदी’ या संस्थांशी अधिक संपर्क राहिला.
राज्य नाट्यस्पर्धा, महाविद्यालयीन नाट्यस्पर्धांना उपस्थित राहणे हा त्यांचा छंद असल्यामुळे अनेक नाट्यकर्मींशी त्यांचा संपर्क आला आणि अनेकांशी जिवाभावाची मैत्री जुळली. १९७१ साली ठाण्यात वास्तव्यास आल्यापासून आजतागायत म्हणजे जवळपास ४५ वर्षे येथील रंगभूमीशी व रंगधर्मींशी ते जवळून संबंधित आहेत. नाट्यक्षेत्रातील बहुतेक उपक्रमांशी ते या ना त्या स्वरूपाने जोडलेले असतात. म्हणूनच अनेक रंगकर्मीही कोणत्याही प्रकारचे साहाय्य लागले तर त्यांना भेटण्यास संकोच करत नाहीत. नव्हे, हक्काने भेटतात. तर असा नाट्यसृष्टीला विविध अंगांनी, विविध स्तरांवर योगदान देणारा रंगकर्मी ठाणेकर आहे ही बाब खरोखर अभिमानाची आहे.
–मुरलीधर गोडे
Leave a Reply