कायस्थ विकासच्या दिवाळी अंक 2023 मध्ये प्रकाशित झालेला श्री रजन ताम्हणे यांचा हा लेख.
माझा मोठा भाऊ सुरेश त्याच्या दोन मित्रांना घेऊन कुठल्यातरी नाटकातले संवाद सादर करायचा. घरातल्या हॉलमध्ये आईच्या काही नऊवारी साड्या किंवा रोज वापरायच्या चादरी इकडे तिकडे लटकावून त्यांचं स्टेज तयार व्हायचं. आम्ही बाल गोपाळ , मित्रमंडळी हे सगळे त्यांचे प्रेक्षक असायचो. मजा वाटायची ते सगळं बघताना. माझ्यासाठी नाटक हा विषय तेव्हा या पुरताच होता. बाकी संबंध काही नाही. कारण लहानपणी फक्त खेळायचं हुंदडायचं एवढंच मला माहीत होतं.
शाळेमध्ये असताना नववी दहावीपर्यंत (1957/58) मी अनेक खेळ खेळत होतो.खेळात थोडा पुढेच होतो. त्यामुळे शिक्षकांत, मित्रमंडळीत शाळेत सगळे ओळखत होते .दहावीत असताना एक दिवस अचानक इंग्रजी विषयाच्या शिक्षकांनी सांगितलं, ‘आपलं गॅदरिंग होणार आहे, त्यात आपण एक छोटं नाटक तयार करणार आहोत आणि तुला त्यात काम करायचंय.’ ‘ अरे बापरे!’ मी म्हटलं, ‘सर मी अजून कधी नाटकात काम केलं नाही, मला येतही नाही.’
‘घाबरतोस काय ? मी सांगेन तसं करायचं. सगळे खेळ तुला छान जमतात मग हे का नाही येणार?’
‘सर,खेळ वेगळे, नाटक वेगळं’ मी सरांना म्हटलं.’ मला जमणार नाही.’
‘ काही नाही तू काम करायचं म्हणजे करायचं.’ सरांनी फतवाच काढला.
‘ठीक आहे सर, ‘ मी मान्य केलं.सरांनी दुसऱ्या पात्राचंही काम एका विद्यार्थ्याला दिलं. दोघांचही पाठांतर चोख झालं. वर्गात सर तालमी घ्यायचे.
एक दिवस अशी तालीम चालू होती. इतर वर्गातली काही मुलं सुद्धा तालीम बघायला आली होती. तालीम बघितल्यावर सर्वजण खुश झाले . आम्हा दोघांचं भारी कौतुक करायला लागले . आम्ही पण खुश झालो. पण वरच्या वर्गात असलेला माझा मित्रच एकटा मला वाईट म्हणाला . आम्ही दोघं चांगले मित्र असल्यामुळे त्यांनी मला स्पष्टपणे, त्याला न आवडलेल्या बाबी सांगितल्या. विशेषतः माझ्या स्टेजवरच्या हालचाली. माझ्या नाटकातल्या कारकिर्दीतला हाच पहिला टीकाकार पण तो मोलाचा होता. मित्र असल्यामुळे त्याचा अजिबात राग आला नाही. पण त्यावर मला विचार करायला मात्र प्रवृत्त केलं.
तेव्हापासून अनेक गोष्टींचं निरीक्षण करण्याची सवय लागली. माणसं निरनिराळ्या प्रसंगात वागतात कशी, बोलणं, प्रतिक्रिया देणं, चेहऱ्यावरचे भाव, त्यांचं चालणं, हात वारे करणं हे फक्त निरखायचं. त्यावर आपलं मत मांडायचं नाही, बरोबर की चूक म्हणायचं नाही. पुढे दिग्दर्शन करताना या निरीक्षणाच्या सवयीचा मला खूप फायदा झाला. माझ्या नाट्य क्षेत्रातल्या पुढच्या कारकीर्दीत खूप मोलाची मदत झाली.
हनुमान व्यायाम शाळेत असताना तिथे दरवर्षी गणेशोत्सवात विविध कार्यक्रम केले जायचे. तिथेच नाटकाचं दिग्दर्शन करायची सवय लागली, तेही कुणाच्याही मार्गदर्शनाशिवाय. इतरही काहीजण आपापल्या परीने कार्यक्रम सादर करत होते. अशातच, मित्रमंडळींनी विचार केला की आपण तरुण मुलांनी दरवर्षी एक मोठं नाटक (तीन अंकी) करायचं. त्यामुळेच ‘घेतलं शिंगावर’, ‘ दिवा जळू दे सारी रात,’ ‘ सभ्यगृहस्थ हो !’अशी अनेक नाटक माझ्या दिग्दर्शनाखाली सादर केली.
मित्र सहयोग या नाट्यसंस्थेचा सभासद झाल्यावरही अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक बक्षिसे मिळवली. राज्य नाट्यस्पर्धा व इतर स्पर्धांमध्ये भाग घेऊन मोठी नाटक सादर केली. 1974 साली मी दिग्दर्शित केलेल्या ‘अपूर्णांक ‘या नाटकाला तर राज्य नाट्य स्पर्धा ,पार्श्वनाथ आळतेकर नाट्य स्पर्धा यामध्ये अभिनय, दिग्दर्शन, नेपथ्य, अशा विविध प्रकारात आम्ही प्रथम पारितोषिके मिळवली. 1976 च्या राज्य नाट्य स्पर्धेतही श्रीहरी जोशी लिखित ‘ श्री शिल्लक ‘या नाटकातल्या भूमिकेसाठी अंतिम स्पर्धेत 1974 प्रमाणेच, अभिनयाचे प्रथम पारितोषिक मिळालं.
या सगळ्याच्या आधीची गोष्ट जेव्हा मी सिद्धार्थ कॉमर्स महाविद्यालयात बीकॉम साठी प्रवेश घेतला तेव्हा समजलं की तिथे होणाऱ्या आंतर भाषीय एकांकिका स्पर्धेत कधीही मराठी एकांकिका सादर झाली नाही. मग काय त्याच वर्षी मित्रांना गोळा करून स्पर्धेत भाग घ्यायचं ठरवलं. लेखन आमच्याच वर्गातल्या जोगळेकर नावाच्या मित्रांने केलं होतं. मी दिग्दर्शन आणि अभिनय आणि काय प्रथम पारितोषिक पटकावलं की हो. या बाबतीत मराठीला कमी लेखणारे, महाविद्यालयातले सर्वजण अवाक् झाले.
धर्मवीर आनंद दिघे साहेबांनीदेखील माझ्यावर विश्वास ठेवला व त्यामुळेच दरवर्षी गडकरी रंगायतनमध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमाचे नेपथ्य करण्याची संधीही 7/8 वर्ष मला मिळाली. त्यावेळी ते अनुभवही विविध…हे सर्व चालू असताना आपल्या जातीच्या सोशल क्लब आणि इतर संस्था यांचे असंख्य कार्यक्रम आम्ही ज्ञाती बांधव सादर करत होतो. प्रत्येक कार्यक्रम विविध अनुभव देत होता. त्यावेळी सुरेश गुप्ते, शशी गुप्ते अविनाश कोर्डे, विजय चौबळ, मदन प्रधान इत्यादी वरिष्ठ मंडळींकडून आम्हा सर्व कलाकारांना प्रोत्साहन आणि जे सहकार्य मिळालं त्याबद्दल खरंच मन भरून येतं.
नंतरच्या काळात जवळजवळ 15 वर्ष दूरदर्शन मालिका, चित्रपट , व्यावसायिक नाटके , जाहिराती यामध्ये काम करण्याची संधी मिळाली. कितीतरी वेगवेगळे अनुभव आले . प्रसिद्धी मिळाली, प्रेक्षकांचं प्रेम मिळालं, किती म्हणून सांगू… आता थांबतो……नंतर कधीतरी बोलू.
रजन ताम्हणे
98676 57620
rajantamhane267@gmail.com
Leave a Reply