महाराष्ट्र विद्यालयातील आठवीचा वर्ग. मराठीच्या शं. रा. देवळे सरांचा तास होता. आदल्या दिवशीच सरांनी सर्व विद्यार्थ्यांना निबंध लिहून आणायला सांगितला होता. विषय दिला होता, ‘तुमचा आवडता लेखक.’ सर वर्गात येऊन बसले. वर्गावर एक नजर फिरवली व म्हणाले, ‘प्रत्येकाने पुढे येऊन आपला निबंध वर्गाला वाचून दाखवा’.
एकेकजण पुढे येऊन वेगवेगळ्या लेखकांवर लिहिलेले निबंध वाचून जात होता. एकाचाही निबंध सरांना विशेष आवडला नाही. शेवटी एक सुदृढ दिसणारा मुलगा सरांजवळ आला. त्याने आधी सरांना आपल्या वहीतील निबंध दाखवला. सरांनी त्या सुवाच्य अक्षरातील लिखाणावर एक नजर टाकली. त्या मुलाने अतिशय मुद्देसूद पद्धतीने राम गणेश गडकरी यांच्यावर निबंध लिहिलेला होता. तो त्याने वाचून दाखविल्यावर सरांसह वर्गाने टाळ्यांचा एकच गजर केला.
वर्गाला शांत रहायला सांगून सरांनी त्याला विचारले, ‘तू निबंधासाठी नाटककार गडकरींचीच निवड का केलीस?’ त्या मुलाने बाणेदारपणे उत्तर दिले, ‘मला नाट्यकलेविषयी फार आवड आहे आणि गडकरी म्हणजे भारतातील शेक्सपिअरच आहेत.’ देवळे सर ओळखून गेले की, मोठेपणी हा मुलगा नाट्यक्षेत्रात नक्कीच नाव कमवणार!!
तो मुलगा म्हणजेच आज कित्येक नामवंत लेखकांच्या नाटकांना रंगभूमीवर आणून असंख्य कलाकारांना रंगमंचावर संधी देणारे ‘श्रीं ची इच्छा’ चे विजय जोशी!
आम्ही व्यावसायिक नाटकांची डिझाईन करु लागलो, तेव्हापासून कधी एखादा निर्माता, तर कधी लेखक, डिझाईन करुन घेण्यासाठी आमच्याकडे येत असे. तसेच नाटक पहायला, बुकींगवर कुणाला भेटायला बालगंधर्ववर जात असू. तिथल्या शोकेसमध्ये ‘ही श्रीं ची इच्छा’ या नाटकाचे रंगीत फोटो लावलेले पाहिले होते. त्यावेळी विजय जोशी हे नाव वाचले होते.
विजय जोशी हे शाळेमध्ये रमेशच्या बरोबरच होते, हे आता पंचेचाळीस वर्षांनंतर कळलं. त्यावेळी विजय कसबा पेठेत रहायचे. विजयला लहानपणापासूनच नाटक सिनेमाचं मनस्वी वेड. कित्येकदा शाळा बुडवून फर्स्ट डे-फर्स्ट शो टाकलेले. मराठी, हिंदी चित्रपट पाहून त्या भाषेवर त्याचे विशेष प्रेम!! शिक्षण झाल्यावर प्राप्त परिस्थितीनुसार काहीतरी उद्योग करणे आवश्यक होते. दरम्यान जगाचे अनेक बरेवाईट अनुभव घेतले. हाताला लागतील ती पुस्तके वाचलीच होती, आता ते माणसंही वाचू लागले. पुढे जीवनात कोणताही निर्णय घेताना हा अभ्यास त्यांना उपयोगी पडणार होता.
विजयची नाट्यसृष्टीतील सुरुवात झाली, ती बुकींग क्लार्क पासून. विजयसह काही मित्रांनी एकत्र येऊन ‘युनिटी’ नावाची नाट्यविषयक सेवा देणारी संस्था सुरु केली. तेव्हापासून विजयची बुकींग ते नाटकाचा प्रयोग विषयी अनुभवाची शिदोरी वाढत गेली.
विजयने स्वतः नाटकाची निर्मिती करुन जेव्हा जेव्हा बाहेरगावचे दौरे केले, तेव्हा प्रत्येक वेळी केवळ ‘नटराजाच्या कृपेने’ तो संकटातून सही सलामत सुटत राहिला. अडचणींचे प्रकार प्रत्येक वेळी नवीनच होते, तरीदेखील न डगमगता त्याने अडचणींवर मात केली. दौऱ्याच्या वेळी जहाजावरील कॅप्टनसारखा संयम ठेवून निर्णय घ्यावा लागतो. एखाद्या मोठ्या कुटुंबाप्रमाणेच कलाकार व बॅकस्टेजवाल्यांची जबाबदारी पार पाडावी लागते.
विजयचे काम तसे आमच्याकडे उशीरानंच सुरू झाले. ‘स्वयंवर झाले डाॅलीचे’ प्रयोगाचं डिझाईन करायचं होतं. त्यांनी एका पेपरवर सुवाच्य अक्षरात मजकूर लिहून दिला. डिझाईन झाले. ते जोशींना फार आवडले. तेव्हापासून काही नवीन काम असले की, जोशी हजर व्हायचे!
पुलं चे ‘तुझे आहे तुजपाशी’, आचार्य अत्रेंचे ‘लग्नाची बेडी’, ‘तो मी नव्हेच’, ‘माझी बायको माझी मेहुणी’, ‘डार्लिंग डार्लिंग’, ‘बाप बिलंदर बेटा कलंदर’, ‘चंद्रिका ही जणू’, ‘चल ‘लव’कर’, ‘रायगडला जेव्हा जाग येते’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘संकेत मीलनाचा’, इ. अनेक नाटकांचे हजारोंच्या संख्येने त्याने प्रयोग केले.
प्रत्येकानं आपल्या व्यवसायात कुणाचा तरी आदर्श समोर ठेवलेला असतो. त्यांचं अनुकरण करीत त्याची यशाकडे वाटचाल सुरू असते. विजयने नाट्य व्यवसायातील ज्येष्ठ निर्माते व सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार मोहन वाघ यांना गुरुस्थानी मानले. परिणामी विजयच्या नाटकाचा पडदा उघडल्यावर नेपथ्य पाहून प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करु लागले.
नाटकांच्या जाहिरातीसाठी गृहपाठ करणारा हा एकमेव निर्माता आहे. नाटकाच्या जाहिराती उत्कंठा वाढविणाऱ्या कॅचलाईन करण्यासाठी खूप विचार करावा लागतो.
त्यांनी ‘फू बाई फू’ हा मनोरंजनाचा कार्यक्रम आखाती देशात दुबई येथे जाऊन सादर केला होता. आजपर्यंत नागपूरसह महाराष्ट्रातील सर्व जिल्हे, गोवा, मध्य प्रदेश, इ. ठिकाणी शेकडो प्रयोग केले आहेत.
या नाट्यप्रवासात अनेक ज्येष्ठ सिने-नाट्य अभिनेते व अभिनेत्री त्यांच्या संपर्कात आले आहेत. हिंदीतील सिनेकलावंतांच्या भेटी झाल्या आहेत. गेल्या दहा वर्षांत पुण्यातील नाट्यनिर्मिती हळूहळू कमी होऊ लागली आहे. कित्येक नामवंत निर्मात्यांनी नाट्यनिर्मिती बंद केली आहे. आता पूर्वीसारखे नाटकांचे दौरे देखील होत नाहीत. प्रेक्षकवर्ग मोबाईल आणि टीव्ही चॅनेलवरील मनोरंजनात समाधानी आहे. त्याला घराबाहेर पडून थिएटरमध्ये जाण्याचे कष्ट घेण्याची इच्छा नाहीये. जेवता जेवता टीव्ही पहाते हीच त्यांची करमणूक झालेली आहे.
एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतही विजय नाट्यनिर्मितीचा विचार करीत असतोच, कारण तो हाडाचा निर्माता आहे. कोरोनामुळे सिने नाट्यसृष्टी झाकोळून गेलेली आहे.
काही महिन्यांनंतर पुन्हा नाटकाला चांगले दिवस येतील, प्रयोग ‘हाऊसफुल्ल’ होतील, अशी स्वप्नं पाहणाऱ्या विजय जोशी या माझ्या परम मित्रास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१८-११-२०.
Leave a Reply