एका नामांकित लेखक-समीक्षकाने, “बलवत्तर भाग्याचे नौशाद” अशा शीर्षकाचा लेख आपल्या एका पुस्तकात लिहीला आहे. नौशादजी ‘Top’ ला जाण्यात त्यांच्या ‘गुणवत्तेपेक्षा’ त्यांच्या ‘भाग्याचा’ वाटा मोठा आहे असे सूचन करणारे हे शीर्षक व हा लेख आहे. आता, नौशादांची गाणी त्या त्या काळात लोकप्रिय झालीच पण साठ सत्तर वर्षांनंतरदेखील ती जनप्रिय आहेत याला निव्वळ ‘भाग्य’ म्हणणे म्हणजे विनोदच आहे.
अर्थात नौशादांवर टीका करणारे अनेक आहेत . भप्पी लहिरीने सुद्धा त्यांना झोडपले होते. एका पत्रकाराने भप्पीला विचारले की ‘तुम्ही चालींची चोरी करता’ या आरोपाबाबत काय सांगाल? तशी भप्पी म्हणाला की ‘ चोरी कोण करत नाही ? नौशाद नाही का शास्त्रीय संगीतातले राग चोरत?’ आता चालींची ‘उचलेगिरी’ करणे आणि एखादा राग कलात्मकतेचा शिडकावा करून विविध स्वरूपात मांडणे यातील फरक त्याला समजत नसेल काय? पण वेळ मारून नेली ना? मग झालं तर!
नौशादजी एका वेळी एकच चित्रपट करत याचीही कुचेष्टा होत असे. पण मला तरी हे कलाकाराच्या मनस्वीपणाचं व नम्रतेचं निदर्शक वाटतं. एक विषय हातात घेतला की त्यावर अधिकाधिक परिश्रम घेऊन, स्वतःच्या कुवतीनुसार त्याला पूर्ण न्याय देऊन त्यातून बाहेर पडायचे व मगच दुसऱ्या विषयात प्रवेश करायचा यात चुकीचे काय? The secret of good writing is re-writing असे म्हणतात. ‘प्रतिभेच्या पहिल्याच उमाळ्यात सुचले तेच अंतिम’ असे मानण्यापेक्षा , ते अधिकाधिक उत्तम व निर्दोष कसे करता येईल यावर जोर देणे ही एक प्रकारची विनम्रताच आहे.
त्यांचे आत्मचरित्र प्रौढी मिरवणारे आहे अशीही टीका झाली. परंतु त्यात इतर कोणाला कमी लेखले आहे असे मला तरी आढळले नाही. मला तरी ते स्व-कर्तृत्वाचे सार्थ (पण अनाठायी नव्हे) अभिमानाने केलेले विस्तृत कथन वाटले.
“भाग्याचीच” गोष्ट म्हणायची तर ‘सैगल’ व ‘नूरजहाँ’ या दोन्ही शिखरस्थ कलाकारांना संगीत देण्याचे भाग्य नौशादजीना लाभले. ते अन्य कोणालाच प्राप्त झाले नाही. आणि महत्वाचे म्हणजे ‘शहाजहाँ’ व ‘अनमोल घडी’ यातली गाणी अनुक्रमे सैगल व नूरजहाँ यांच्या करीअर मधली माईलस्टोन गाणी ठरली. शिवाय सैगल व नूरजहाँ या दोघांनी नौशादजींकडे फक्त एकेकच चित्रपट केला होता हे ही लक्षात घेण्याजोगे !
मेहबूब, करदार, सनी, विजय भट्ट, के आसीफ यासारखे मोठे निर्माते नौशादजीनाच घेत ही केवळ ‘योगायोगाची’ गोष्ट नव्हती तर ती त्यांच्या गुणवत्तेची पावतीच होती.
‘कलात्मक’ संगीत देणा-या संगीतकारात त्यांचे स्थान खूप वरचे आहे. त्यांच्या संगीतातील ‘कोरस’चा वापर या एकाच विषयावर एक मोठा लेख लिहीता येईल. एकाच ओळीसाठी दोन चाली – मुख्य गायकासाठी एक व कोरससाठी एक- हे त्यांचे मुख्य वैशिष्ट्य! त्यातही एक चाल आरोही असेल तर दुसरी अवरोही अश्या रचना ! कधीकधी दोन्ही चाली एकाच दिशेने जाणा-या!
कधी गाण्याची चाल ‘नाजूक’ असेल तर त्याला ‘भारदस्त’ कोरसची ‘भक्कम’ चौकट तर कधी उलट – म्हणजे ‘रांगड्या’ चालीला ‘नाजूक’ कोरसची कलात्मक नक्षी ! उडन खटोला मधील ‘मोरे सैय्याजी उतरेंगे पार’ म्हणजे तर कोरसमधील सृजनशीलतेची परिसीमाच! यात prelude व interlude म्हणून फक्त कोरसच वापरला आहे. ‘हैय्या हो हैय्या रे हैय्या’ हे शब्द किती वेगवेगळ्या प्रकारे दिले आहेत ते प्रत्येकाने मोजून बघायला हवेत. शिवाय कोरस दोन वेगवेगळ्या स्केल मध्ये वापरला आहे. त्यामुळे ‘अंतराचा’ आभास निर्माण होतो.
“ज्यांचा गळा गायनासाठी फारसा ‘तयार’ नाही अशा कलाकारांकडून अजरामर गाणी गाऊन घ्यायची” हे त्यांच्या प्रतिभेचं आणखी एक द्योतक! उमादेवी ( अफसाना लिख रही हूँ), श्याम (तू मेरा चांद), करण दिवाण ( जब तुमही चले परदेस आणि सावनके बादलो), मंजू (अंगडाई तेरी है बहाना) या सगळ्यांना ‘गायकाचा’ मान नौशादजीनीच मिळवून दिला.
माझे एक नौशादप्रेमी मित्र म्हणतात की रविंद्र संगीत , बंगाली संगीत याप्रमाणेच “नौशाद संगीत” ही एक स्वतंत्र व समृद्ध संगीत शाखा आहे. मला तरी यात काही अतिशयोक्ती वाटत नाही. मात्र या प्रगल्भ प्रतिभेच्या संगीतकाराच्या संगीताचा बारकाईने अभ्यास करता येईल असे सांगितीक ज्ञान माझ्याकडे नाही याची खंत मात्र सतत वाटते .
— धनंजय कुरणे
08.05.2017