हिंदी चित्रपटसंगीताचा सुवर्णकाळ ज्याला म्हटलं जातं त्याची सुरुवात नौशादजींनी केली. त्यांचा जन्म २५ डिसेंबर १९१९ रोजी झाला. नौशादजींनी १९४२ च्या शारदा पासून १९६८ च्या संघर्ष पर्यंत २६ वर्षात ५ हिरक महोत्सवी रतन, अनमोल घडी, बैजू बावरा, मदर इंडिया आणि मुघल-ए-आझम, १२ सुवर्णमहोत्सवी आणि तब्बल ३५ रौप्यमहोत्सवी चित्रपटाना संगीत दिले. त्यांच्या हिरक महोत्सवी चित्रपटांची नावं बघीतली तर पहिले दोन चित्रपट आणि बैजू बावरा हे केवळ आणि केवळ नौशादजींच्या संगीताने तारले होते. हिंदूस्थानी शास्त्रीय संगीतातला असा एकही राग नाही ज्यावर आधारित नौशादजींचं एकतरी गाणं नाही.
पण नौशादजींच्या संगीतातून रफी यांना वेगळा काढणे केवळ अशक्य आहे. रफीच्यां आवाजाच्या रेंजचा, त्याच्या क्लासिकल वरील हुकुमतीचा, वेगवेगळे प्रयोग करण्याच्या तयारीचा सर्वात जास्त आणि अप्रतिम वापर जर कुणी केला असेल तर तो नौशादजींनीच. हिंदी चित्रपट संगीतातले काही ठळक आणि वेगळे प्रयोग करण्याचं श्रेय मात्र नौशादजींकडेच जातं. खरंतर शास्त्रिय संगीत हाच त्यांचा पाया असला तरी याही क्षेत्रातले बर्मनदादा, शंकर जयकिशन यासारख्या समांतर संगीतकारांची स्पर्धा त्यांना होतीच. पण या सर्वातूनही आपला बाज न बदलता वर्षानू वर्ष टिकून रहाणे या साठी मेहनत आणि सृजनशिलतेची आवश्यकता असते.
पं. पलूस्कर आणि खाँसाहेब आमिरखान यासारख्या दिग्गजांना बैजू बावरा साठी केवळ साडे-सहा मिनीटांच्या जुगलबंदीसाठी तयार करणे, हिंदी चित्रपट संगीतकारांना दारातही उभे न करणार्या खाँसाहेब बडे गुलाम अली खान यांच्याकडून मुघल-ए-आझम साठी चक्क दोन बंदिशी गावून घेणे, महेंद्र कपूर सारख्या गुणी गायकाला पहिली संधी देणे ही नौशादजींची कमाल होती. बैजू-बावरा हा चित्रपट तर त्यांनी अक्षरश: निर्धाराने केवळ आपल्या संगीताच्या जोरावर हिरक-महोत्सवी केला. या चित्रपटाचे निर्माते जरी प्रकाश भट असले तरी या चित्रपटाची खरी निर्मीती नौशादजींचीच होती. आपल्या मित्रासाठी त्यांनी दिलेले हे योगदान होते. त्यांनी काही चित्रपटांची निर्मितीही केली. उडन खटोला हे त्यातले ठळक नाव.
गुलाम मोहम्मद यांनी काही काळ त्यांच्या सहाय्यकाची भुमिका केली होती. त्यामुळेच पुढे स्वतंत्र संगीतकार म्हणून गुलाम मोहम्मद यांनी संगीत दिलेल्या पाकिजाचे पार्श्वसंगीत गुलाम मोहम्मद यांच्या निधनानंतर नौशादजींनी पुर्ण केलं. पाकिजा न पाहिलेल्यांना या पार्श्वसंगीताची गंमत कदाचित कळणार नाही. कारण चित्रपटाच्या संगीताच्या एल.पी. रेकॉर्डस, कॅसेटस, सी.डी.ज वर जितकी गाणी आहेत तितकीच किंबहून थोडी जास्तच गाणी या पार्श्वसंगीतात लपली आहेत जी केवळ चित्रपट पाहतानाच ऐकायला मिळतात. पण नौशादजींच्या प्रयोग करण्याच्या हौसेमुळे काही वेळेला त्यांचं संगीत हे केवळ ऐकायला छान आणि म्हणायला कठिण बनलं.
सामान्य संगीतरसिकांना काहीसं अडचणीचं भासू लागलं. रफीला देखील याचा काही वेळेला त्रास झाला. उदा. बैजू बावरा मधलं “ओ दुनिया के रखवाले” गाताना ताण असह्य होऊन रफीच्या नाकाचा घुळणा फुटला आणि रक्त वाहू लागलं. पण त्याही स्थितीत त्याने ते गाणं पुर्ण केलं. तिच गोष्ट मुघल-ए-आझम मधल्या “जिंदाबाद ऐ मुहोब्बत जिंदाबाद” या गाण्याची. नौशाद यांचे ५ मे २००६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply