नौशाद यांचे लहानपण लखनौमध्ये गेले. ते ज्या ठिकाणी राहायचे त्याच्या बाजूलाच एक थिएटर होतं. त्यांचा जन्म २५ डिसेंबर १९१९ रोजी झाला.पूर्वी चित्रपट चालू असताना त्याचं पार्श्वसंगीत पडद्यासमोर बसलेली मंडळीच द्यायची. घरात बसल्या बसल्या या पार्श्वसंगीताचे सूर नौशाद यांच्या कानांवर पडायचे. यामुळे ते संगीताकडे खेचले गेले. लादनसब हे अशा प्रकारचे संगीत देण्यास माहीर होते. त्यांचा वाद्यवृंद पार्श्वसंगीत देत असताना नौशाद त्यांच्या सार्या गोष्टी टिपून घ्यायचे. यामुळे त्यांच्या शाळेला दांड्या व्हायला लागल्या. पावलं आपोआप थिएटरकडेच वळायची. त्यांचे वडील तापट होते. त्यांना मा.नौशादचा हा नाद मुळीच पसंत पडलेला नव्हता. वयात आल्यावर नौशादनी घरदार सोडलं. ते सोडणं त्यांना क्रमप्राप्तच होतं. त्या वेळी लखनौमध्ये अनेक वाद्यवृंद तेव्हा कार्यरत होते. त्यात नौशादनी आपला स्वतःचा ‘विंडसर एंटरटेनर’ नावाचा वाद्यवृंद सुरु केला. दहा वर्ष त्यांच्या कानांवर जे संगीत पडलं होतं त्यातून त्यांना चाली स्फुरायला लागल्या. हा वादयावृदं स्वतःचा असल्याने त्यांचा स्वतंत्रपणे सारं काही करायला लागल्या. हा वादयवृदं स्वतःचा असल्याने त्यांना स्वतंत्रपणे सारं काही करायला मिळायचं यामुळे त्यांची प्रातिभा फुलली.
मुख्य म्हणजे आपणही संगीतकार होऊ शकतो हा आत्मविश्वास त्यांना लखनौमधल्या कार्यक्रमातून मिळाला. विंडसर एंटरटेनचे कार्यक्रम घेऊन त्यांनी मग जयपूर, जोधपूर, सिकर, माऊंट अबू, सिरोही, विरमगाम अशा ठिकाणी दौरे काढले. विरमगामला शेवटचा कार्यक्रम झाल्यावर त्यांना मुंबई साद घालायला लागली. स्वप्नाची नगरी मुंबई एवढी जवळ आली असताना आपण माघारी लखनौला जाण्यापेक्षा मुंबईत जाऊन अपलं नशीब अजमावावं या विचाराने ते मुंबईला आले. तेव्हा ते फक्त १६ वर्षांचे होते आणि त्यांच्या खिशात दमडीही नव्हती. जवळ होता तो फक्त संगीतकार होण्याचा आत्मविश्वास. दादरला शिवाजी पार्क आणि ब्रॉडवे सिनेमाच्या आवारात रात्रीचे ते झोपायचे. सकाळी छोटंमोठं काम मिळतं का ते शोधत फिरायचे. पण याच ब्रॉडवेला एके दिवशी आपण संगीत दिलेला चित्रपट झळकेला याची त्यांना खात्री होती. सुरुवातीला एन्. ए. (म्हणजे नौशाद अली) दास या नावाने त्यांनी काही गाणी स्वरबध्द केली. उस्ताद झंडे खाँ यांच्याकडे त्यांना शेवटी ४० रु. महिना पगार असलेली नोकरी मिळली. नंतर रणजित स्टुडिओत जाऊन काम मिळतं का ते पाहायला लागले आणि रणजित स्टुडिओच्या सरदार चंदूलाल खेमजी यांनी त्यांना आपले संगीतकार खेमचंद प्रकाश यांच्याकडे साहाय्यक म्हणून ठेवून घेतलं. या ठिकाणी नौशादंना खेमचंदजींकडून बरंच काही शिकायला मिळालं. पण अजूनही त्यांचं स्वप्न पूर्ण होण्याचं चिन्ह दिसत नव्हतं. दरम्यान गीतकार दीनानाथ मधोक त्यांना घेऊन मोहन भवनानी या निर्मात्याकडे घेऊन गेले. या भवानानींना एक नवा संगीतकार हवा होता. मधोकनी त्यांना नौशादचं नाव सुचवलं. मधोक यांनी नौशादमधले गुण पक्के हेरलेले होते. पण तेव्हा नौशाद अवघे वीस वर्षांचे होते. हा एवढा कोवळा पोरगा काय कपाळाचं संगीत देणार, असंच तेव्हा भवनानींना वाटलं होतं. पण तरीही मधोक यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी महिना १०० रुपये पगारावर आपल्या ‘प्रेमनगर’ चित्रपटाला संगीत देण्याचं काम नौशाद यांच्याकडे सोपवलं. मा.नौशादनी अवघ्या तीन महिन्यांत ‘प्रेमनगर’ ला संगीत दिलं. त्यांना फक्त तीनशे रुपये मिळाले. पण त्यापेक्षा त्या चित्रपटाच्या श्रेयनामावली संगीतकार म्हणून त्यांचं नाव झळकलं होतं याचं त्यांना विशेष अप्रूप वाटलं. १९४० च्या सुरुवातीला झळलेल्या ‘प्रेमनगर’च संगीत लहानथोरांना आवडलं आणि संगीतकार नैशादचा उदय झाला. यानंतर्च नौशाद यांना छोटी-मोठी कामं मिळत गेली. विजय भट, कारदार यासारखे निर्माते त्यांच्यावर फिदा झाले. यामुळे ‘माला’, ‘दर्शन’, ‘शारदा’, ‘कानून’. ‘कीमत’, ‘पहले आप’, नमस्ते’, ‘सन्यासी’, ‘संजोग’, ‘जीवन’, ‘गीत’, ‘शहाजहान’, ‘नाटक’, ‘दर्द’, ‘दिल्लगी’, ‘दुलारी’, ‘दिवाना’ असे मा.नौशादजीचें चित्रपट आले.
नौशाद यांचा या चित्रपटसृष्टीत त्यामुळे जम बसला. पण त्यांची बऱ्याच जणांनी फसवणूकही केली. एका चित्रपटाद्वारे त्याकाळी लाख रुपये गोळा करणारे हे निर्माते त्यांच्या हातावर नाममात्र पैसे ठेवायचे. १९४४ साली गुलाम हैदर यांच्यापासून स्फूर्ती नौशादनी ‘रतन’ मध्ये उत्तर भारतीय ढंगाचं संगीत बेमालूमपणे वापरलं आणि ‘रतन’च संगीत अफलातून लोकप्रिय झालं. नौशाद यांचा ‘रतन’मुळे खूप गाजावाजा झाला. ‘द मास्टरो विथ मिडास टच संगीतसम्राट नौशाद’, ‘नौशाद नौशद चालीस करोड में एकही नौशाद’ अशी त्यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली जाऊ लागली. १९५७ मध्ये ‘मदर इंडिया’ची जुळवाजुळव सुरु होती. मेहबूब खानच्या आधीच्या ‘अंदाज’ला नौशादनीच लाजवाब संगीत दिलेलं होतं म्हणून त्यांचीच ‘मदर इंडिया’च्या संगीतासाठी त्यांनी निवड केली होती. पण आता नौशादनी पहिल्यांदा आपली रॉयल्टी मेहबूब खान यांच्याकडे मागितली आणि त्यांनीही ती दिली. यानतंर त्यांची आर्थिक चणचण संपली. नौशाद यांनी नंतर दर्जेदार संगीत देण्याचा सतत प्रयत्न केला. वर्षभरात ते एकच चित्रपट यासाठी करायचे. त्यांना गायकांकडून कसून तयारी करुन घेतल्याशिवाय गाणं रेकॉर्डिंग करायला आवडायचं नाही. लता मंगेशकर, रफी ही मंडळा त्यांच्याकडे तासनतास एकाच गाण्यासाठी रिहर्सल करायला न कंटाळता यायची. आजही नौशाद म्हणतात, ‘आपल्याकडे गायक, गायिकांना संगीतकारांपेक्षा अधिक मान मिळतो हे सपशेल चुकीचे आहे. गाण्याची चाल, त्यावरचे संस्कार संगीतकार करत असतो. त्या गाण्याच्या सुरेलपणाचा वा बेसुरीपणाचा मालक तो संगीतकार असतो. आम्हा संगीतकारांमुळे अनेक गायक – गायिकांचं नावं झालं हे लक्षात घ्या. संगीतकाराविना गायक काहीच करु शकत नाही. लता, रफी हे चांगले गायक असल्याबद्दल प्रश्नच नाही. पण त्यांच्याकडून उत्तम प्रकारे गाऊन घेणार्या, संगीतकारांना तुम्ही कमी लेखू नका.’ लताकडूनही आपल्या मनासारखं गाणं जोवर येत नाही तोवर तिला गायला लावण्याचा हट्ट नौशाद धरायचे. रफीने गायलेलं ‘कोई सागर दिल को बेहलाता नही’ किंवा शमशाद बेगमचं ‘छोड बाबुल का घर’ ही गाणी केवळ मा.नौशाद हा संगीतातला चमत्कार होता. यासाठी ते वाट्टेल ते करायला तयार असायचे. ते जे काही करायचे ते मात्र मनापासून असायचं. ते श्रध्दापूर्वक रेकॉर्डींगही करायचे. ‘बैजू बावरा’तल्या ‘मोह भूल गये सावरियाँ’ गाण्याच्या रेकॉर्डींगची गोष्ट अशी आहे. हे गाणं भैरव रागातलं असल्याने भैरव म्हणजे शिवशंकर म्हणून नौशादनी रेकॉर्डिंग करायच्या आधी सर्वाना स्नान करुन शुचिर्भूत होऊन रेकॉर्डिंग करायचा आग्रह धरला होता.
‘बैजू बावरा’ने नौशादना तुफान लोकप्रियता तर दिलीच, पण त्यांना स्वतःला फार मोठं समाधान दिलं. या एका चित्रपटात त्यांनी बहुतेक सगळ्या रागांचा वापर केला. रफीच्या आवाजातली ‘मन तडपत हरी दर्शनको आज’ मालकंसमध्ये, ओ दुनियाके रखवाले’ दरबारीमध्ये त्यांनी तयार केलेलं होतं ‘तू गंगांकी मौज मै’, ‘दूर कोई गाये’, ‘इन्सान बनो’ ही सगळी गाणी गाजली. नौशाद यांच्या कारकीर्दीतला ‘बैजू बावरा’ हा कोहिनूर हिरा ठरला. पलुस्कर आणि उस्ताद आमिर खान यांची जुगलबंदीही पेश केली. सुरुवातीला ‘बैजू बावरा’मध्ये दिलीपकुमार – नर्गिस अशी जोडी घेतली जाणार होती. पण नौशादनीच यामुळे प्रेक्षक निव्वळ या जोडीला पाहायला येतील. याचं कथानक, संगीत उपेक्षित राहील अशी शंका व्यक्त करुन नव्या कलाकारांना घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार मीनाकुमारी, भारतभूषण ही जोडी घेतली गेली आणि या जोडीलाही पुढे स्थिरावता आलं. त्यांच्या मोठ्या मुलीच्या लग्नात बँडवर ‘छोड बाबुलका घर’ वाजवलं गेलं होतं आणि त्यांच्या सहाव्या आणि सर्वात धाकट्या मुलीच्या लग्नालाही बँडवर. हेच गाणं वाजवलं गेलं तेव्हा त्यांना भरुन आलं होतं. आपण दिलेलं संगीत चिरकाल टिकणात्रं आहे याचीच साक्ष बँडवाल्यांनी दिली होती. याचं कारण हे गाणं यांनीच ‘रतन’साठी शमशाद बेगमकडून गाऊन घेतलेलं तर होतं! मा.नौशाद यांचे निधन ५ मे २००६ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply