काल अलका टॉकीज वरून येत असताना “बॉईज ३” या चित्रपटाचे पोस्टर दिसले. बेंगरूळ कॉम्बो वाटले ते- चित्रपटगृहाची सध्याची अवस्था (अगदी बाहेरूनही न बघवणारी इमारत) वर्सेस नवा चित्रपट!
काही वर्षांपूर्वी मी अलकाला पत्नी आणि मुलाच्या हट्टाने एक इंग्रजी चित्रपट बघितला होता आणि आतील जळमटे, स्वच्छतागृहे इत्यादी बघवली नव्हती. माझं मन नाही रमलं चित्रपटाच्या गोष्टीत!
अनेक वर्षांपूर्वी मी ठाण्याला असताना वंदना चित्रपटगृहात आमिरचा “सरफरोश ” बघितला होता आणि तेथील नैसर्गिक उकाड्यात इतका उबलो की तो चित्रपट आत पोहोचलाच नाही. नंतर काही वर्षांनी दूरदर्शनवर पाहिला आणि चक्क आवडला.
पुण्याच्या अपोलो मध्ये समांतर अनुभव आला.
पुणे/सांगली/सोलापूर मधील जुन्या आवडत्या सिंगल स्क्रीनची अवस्था आजकाल बघवत नाहीए. पण त्यांनी दिलेले चित्रानुभव दिगंत आहेत. माझ्या पोस्टस मधून ते नियमितपणे “सुखभरे दिन बिते रे भैय्या ” सारखे ओघळतही असतात. कदाचित मल्टिप्लेक्स समोर ही मंडळी तग धरू शकली नाही. पण तेथे बाह्यात्कारी झगमगाटच अधिक! चित्रानुभवाचे काय?
शिवनेरी/शिवशाही पुढे लालपरी कशी टिकाव धरणार?
मग महत्वाचे काय? आतल्या काळोखातील गुंगवून टाकणारी/भिडणारी थरारक चित्रदृश्ये की प्रदर्शनीय वास्तू ?
मनात सतत जुन्या-नव्या दिवसांची/व्यक्तींची/स्थळांची रेलचेल सुरु असते.
१ ऑक्टोबरला पुण्यात “चारचौघी” चा प्रयोग आहे-नव्या संचात? मी आणि पत्नीने जाहिरात वाचल्या-वाचल्या जायचे ठरविले आहे. पूर्वीच्या स्मृती मनात कोरलेल्या आहेतच पण आता नव्या-जुन्या संचांमध्ये तुलना न करता आम्ही जातोय.
रोहिणी हट्टंगडी, मुक्ता, कादंबरी आणि पर्ण अशा तुल्यबळ (अर्थात सध्याच्या दृष्टीने, पण खरंतर या चौघीही जुन्या संचाइतक्याच प्रभावी आणि तोडीस तोड आहेत – दीपा श्रीराम, वंदना गुप्ते, आसावरी आणि प्रतीक्षा) व्यक्तींमधील नक्षत्रांच्या शर्यती चुकविणे केवळ अशक्य!
रवी शंकर, कुमार गंधर्व मैफिल संपल्यावर अस्वस्थ दिसले की त्यांना त्यामागचे कारण विचारले जायचे. ते म्हणत- ” तो स्वर मला तिथे उंचावर दिसतोय. प्रयत्न करून थकतो क्वचित, पण तेथपर्यंत पोहोचता आले नाही की मन खिन्न होतं. वरकरणी मैफिल मारली असते,पण अंतर्यामी खटकत राहते- गंतव्यापर्यंत पोहोचू शकलो नाही याची!”
१ ता.ला कळेल या चौघींचीही अशीच घालमेल होतेय कां ते- जुन्या मापदंडापाशी पोहोचू शकू का नाही?
कारण १९९१ पासूनचं सगळं आसपासचं पर्यावरण आता ३३ वर्षांनी बदललं असलं तरी (including माझ्या सारखा वयाने वाढलेला जुना प्रेक्षक) मानसिकता तीच आहे, स्त्रियांची हत्यारे, क्षमता बदलल्या असल्या तरीही प्रश्न/समस्या त्याच आहेत.
सार्वकालिक कलाकृती म्हणूनच अशा खुणावत असतात खऱ्या कलावंतांना!
तरी बरं, हा प्रयोग तुलनेने सध्या पुण्यातील बऱ्या नाट्यगृहात (यशवंतराव मध्ये) आहे, म्हणजे जुन्या वास्तूंची माझी तक्रारही निष्फळ, निकामी!
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे.
Leave a Reply