नवीन लेखन...

नवं न्यारं अन् खळ्यात उपनेरचं वारं !

जगण्याचा खरा आनंद हा बालपणीचाच. गावखेड्यातलं जगणं म्हणजे मुक्त छंदातील कविता! मोकाट भटकायचं.मनसोक्त पोहायचं. वाट्टेल तसं जगायचं.गावात जशी माळवदाची घर तशी रानात खळं-दळं, बोंदरी बारदाना आलाच. शिवळाट-जोते, चाढं-ओटी , इळे-खुर्पे, सुतळी दाभण, डांभमेखी. जगातील कोणत्याच शब्दकोशात न सापडणारी शब्दसंपदा. जवळची वाटणारी. ऊन्हाळ्यात रानं निपचित पडल्याली. दिवसभर उन्हाच्या झळायांचा आलेख खालीवर होणारा.खळं आणि जागली ठरलेल्या. आंब्याच्या कैर्या आणि चिंचेचे बोटूक म्हणजे त्या काळातले वडापावच !

कारण असे की , खळं करणे हा शेतजीवनातील महत्वाचा टप्पा. रानात एका ठिकाणी माती सारत, वर्तुळ तयार करणे. मध्यभागी तिवढा रोवणे, त्यावर पाणी शिंपडणे, जनावरांच्या पायान खुरतणे, मोगरी वा दगडाने थापटणे , सारवणे. बर्याच प्रक्रियेतून खळं तयार होतं.

उपनेर नावाचं यंत्र नविनच आलेलं. कणसांपासून धान्य बाजूला काढण्यासाठी.त्या उपनेरास पाणी लागायच. तेही दोनतीन टिपाड. पाणी आणायला विहिरीवर जावं लागायचं. विहीर अर्धा ते दीड किलोमीटर लांब. तिथं जाऊन पाणी शेंदायचं. तेही दिव्यच.ढेंभीवर उभा र्हाऊन गडीमाणसं शेंदून द्यायची. आम्ही डोक्यावर कळशी, हंडे नाहीतर हातात बादल्या घेऊन पळत सुटायचो. इतकं पाणी वहायचं की वाटच ओली व्हायची. वाटातच गाड्या-गाड्या सुरू व्हायच्या. डाव्या बाजुनं गाडी न्यायची याची नकळत शिकवण मिळत असे. सुर्यफुलाच्या वाळलेल्या काड्या, फाटलेल्या बुटात ऊसाच्या चिवट्या नाहीतर चिपाडं घालून त्याच्याही गाड्या! हे गाडीवेड ! तसं उपनेरला लागणार्या पाण्यासाठी गाडीचीच भाषा. उपनेरचा मालक ऐटीत सारे आदेश एका जागी बसून सोडणार. पाणी भरा!

माणसं पाणी वाहून दमून जात.तो नारळ फोडून उपनेर चालू करी. मध्येच इंजिन बिघडायच. इंजिनचा पार्ट आणायला जातो म्हणायचा . तालुक्याच्या गावाला जाऊन भेळभत्ता खायचा.रातभर खळ्याची राखण करायची.चांदणं मोजायचं. आईनं आणलेलं पिठलं भाकरी अन् तव्यावर रगडलेला ठेचा. नव्या कैर्याचं लोणचं. भन्नाट डाव रंगायचा. निम्मी पोरं पेंगायची.कणसं आणि माणसं जवळ असली की सर्वात श्रीमंत आपणचं. दुसरा दिवस उजाडला. पुनः उपनेरला पाणी भरायचं. खळं पुर्ण झालं की मग पोते भरून घरी आणायचे. तिथंच मोडणी करणाराचं,सगळ्याच मिटवायच्या. गाडी जुपून धान्य घराकडं आणायच.पायावर पाणी टाकत, कपाळी कुंकू लावत, गोड घास देऊन आलेल्या धान्यलक्ष्मीच स्वागत करायचे. आता तळवटावर खळं करण्याच फॅड आलेल. मी जेव्हा रानात जातो तेव्हा हे सारं आठवत जातो, मन दाटते.आपण कोणत्या जंगलात वाढतोय ?

विठ्ठल जाधव, शिरूरकासार (बीड)
संपर्कः 9421442995
vitthalj5@gmail.com

दै.सकाळ मध्ये प्रकाशित लेख 

Avatar
About विठ्ठल जाधव 57 Articles
श्री विट्ठल जाधव हे अनेक मराठी पुस्तकांचे लेखक आहेत. ते बीड जिल्ह्यातील शिरुरकासार येथील रहिवासी असून पुण्यनगरी आणि इतर वृत्तपत्रांमध्ये नियमित लेखन करत असतात. त्यांना साहित्यविषयक अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..