नवीन लेखन...

नांवाला जपणारे ब्रिटीश, निर्लज्ज राजकारणी आणि दु:खाचा बाजार मांडणारा मिडीया

महाडच्या दुर्घटनेचा दोष निसर्गावर टाकून आणि ‘मृतात्म्यां’ची एक ‘सरकारी किम्मत’ ठरवून सरकारी बगळे सावित्रीच्या पुरात मृतांच्या नावाने आंघोळ करून मोकळे झाले. पुलाच्या दुरुस्तीवर पैसे खर्च करण्यापेक्षा जे काही लोक अपघातात मरतात त्यांची अशी ‘किम्मत’ देणं एकदम स्वस्त पडत असावं बहुदा..! शिवाय पुलाच्या दुरूस्तीत यांना असा काय तो मलीदा मिळणार असा विचार त्यांनी केला असणेही सहज शक्य आहे..!

महाडच्या प्रसंगात निसर्गाची काही एक चुक नाही. निसर्ग निसर्गाच्या धर्मानेच वागला, वागतो. कोकणातला बेदम पाऊस काय आताच पडला नाही. तो तर गेली शेकडोवर्ष तसाच पडतो..नद्या-नाल्यांना पूर येणे कोकणी माणसांना पिढ्या न पिढ्या सरावाचे आहे. त्यामुळे पुरामुळे पुल कोसळला आणि अपघात घडला असं सांगून जर राजकारणी जनतेला XXX बनवायचा प्रयत्न करत असतील तर मग काळ बदलला असल्याची जाणीव ह्या पांढऱे कपडे धारण करून, ४०-५० लाखाच्या गाडीतून गावावरून ओवाळून टाकलेल्या चमच्यांसोबत फिरणाऱ्या या नराधम राजकारणी लोकांना नाही असंच म्हणावं लागेल..तोंडात माव्याचा (तंबाखू) तोबरा कोंबून ‘पालकाचा’ सेल्फी काढण्याचा प्रयत्न या पब्लिकला XXX समजायच्या मानसिकतेतूनच झालाय..

या पुलाचं म्हणे स्ट्रक्चरल ऑडीट मे मध्ये झालं होतं आणि पुल धडधाकट असल्याचा निर्वाळा स्ट्रक्चरल ऑडीटरने दिला होता..स्ट्रक्चरल ऑडीट ही काय गंम्मत असते हे मी मुंबईच्या बांधकाम क्षेत्रात काहीकाळ मुशाफिरी केली असल्याने मला चांगलंच माहित आहे. अहो, टेबलाखालून पैसे दिले की असे आपल्याला हवे तसे सोयीचे रिपोर्ट्स ढिगाने बनवून मिळतात.. शेवटी पापाच्या पैशांवर लठ्ठ कॅपिटेशन फी भरून इंजिनिअर झालेल्या अशा ऑडीटरकडून आणखी अपेक्षा ती काय ठेवणार? तो आपला येनकेन प्रकारेण आपली फी वसूल करायच्या मागे, मग जनता गायी भाड मे… अर्थात काही निस्पृह इंजिनिअर्सही आहेत पण ते नेमके कोणासाठी काम करतात हा संशोधनाचा विषय ठरावा. आमचं नशिबच खोटं, आम्हाला अद्याप ते काही सापडले नाहीत. बरं, हे रिपोर्ट बनवतांना त्यात ‘नरो वा कुंजरो वा’ शब्दांचा वापर कसा करावा आणि प्रकरण अंगाशी आलं की त्या शब्दांचा आधार घेत निर्दोष कसं सुटावं हे सातव्या वेतन आयोगाच्या लागू होण्याची वाट पाहात बसलेला सरकारी अधिकारीच सांगतो..

ब्रिटिशांनी महाडच्या पुलाची कालमर्यादा संपली असल्याचे त्यांच्या देशातून स्वातंत्र्यानंतर इतके वर्षांनीही कळवले. त्यांच्याकडे ते रेकॉर्ड्स अजून जपले गेले आहेत. ब्रिटीश उघड व्यापारीवृत्तीचे साम्राज्यवादी होते. परंतु व्यापार करतानाही त्यांनी त्यांच्या कामाशी किमान निष्ठा बाळगून जनतेच्या जीविताची इमाने इतबारे काळजी घेतली होती किंवा आपले नांव खराब होऊ नये याची काळजी घेतली होती असा निष्कर्ष त्यांनी केलेली बांधकामे अजून जनतेच्या सेवेत आहेत यावरून काढावा लागेल. या ठिकाणी मला विलियम होल्डन, जॅक हॉकिन्स, अलेक गिनेस या अभिनेत्यांनी आपल्या देखण्या अभिनयाने अधिकच देखणा केलेल्या ‘द ब्रिज ऑन रिव्हर क्वाय’ अप्रतिम इंग्रजी चित्रपटाची आठवण झाली. या चित्रपटात ब्रिटीश युद्ध कैद्यांकडून जपानी एक पूल बांधून घ्यायचे ठरवतात..ब्रिटीश युद्ध कैदीकैद्यांनी कमी दर्जाचे काम करतात हे त्यांचा प्रमुख असलेल्या लेफ्टनंट कर्नल निकोलसन (अभिनेता अलेक गिनेस) याला आपल्या सैनिकांनी अत्यंत सुमार दर्जाचे काम केल्याचे लक्षात येते. तो आपल्या सैनिकांना याचा जाब विचारतो. सैनिक सांगतात की, ‘शत्रूसाठी आपण काम कलेले आहे आणि म्हणून ते मुद्दाम सुमार दर्जाचे केले आहे. आपल्याकडून बांधून घेतलेला हा पूल कोसळून शत्रू असलेल्या जपानला नुकसान होईल असा उद्देश या मागे आहे.’ यावर निकोलसन आपल्या सैनिकांची जी कानउघाडणी करतो ती चित्रपटात मुळातून बघण्यासारखी आणि ऐकण्यासारखी आहे. तो आपल्या सैनिकांना सांगतो की, ‘जरी हा पूल आपल्याकडून आपला शत्रू जबरदस्तीने करून घेत असला तरी हा पूल ‘ब्रिटीश’ बनवत आहेत हे कायम लक्षात ठेवा..आणि हा पूल कोसळला तर त्यात बदनाम ‘ब्रिटीश’ होणार आहेत जे मला अजिबात चालणार नाही’. शत्रूसाठी एखादे बांधकाम करतानाही ते आपल्या नावाची बदनामी होऊ नये याची ब्रिटीश किती काळजी घेत हे या चित्रपटावरून लक्षात येते आणि देशभक्ती काय चीज आहे हे आपल्याला समजते.. ब्रिटीशांनी केलेली बांधकामे दीड-दोनशे वर्षानंतरही लोकांच्या सेवेत आहेत आणि आमचा ‘मनोरा’ वीस वर्षात मोडकळीला येतो याच्या मागचे कारण काय हे सर्व जनता जाणते..ब्रिटीशांचे मोठेपण आपल्या सुमार दर्जाच्या आणि ‘देशसेवे’च्या नावाखाली पैसे खायला सोकावलेल्या देशी पुढाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर अधिकच ठळक होते.

आणि इलेक्ट्रोनिक मिडीयाबद्दल काय बोलावे? अपघातात सापडलेल्यांची प्रेते दाखवू नयेत असा संकेत असतानाही बेलाशक अशी दृश्ये दाखवली जात होती. चित्रे थोडीशी ब्लर केली की हे नियमातून सुटले..अपघातात सापडलेल्या नातेवाईकांचे दु:ख ‘लाइव्ह’ दाखवून मिडीयावीर हे कोणता विकृत आनंद मिळवतात कोण जाणे..! जनतेला त्या नातेवाईकांचे दुःख टीव्हीवर दाखवल्याशिवाय समजत नाही असे यांना का वाटते? जनतेच्या दुःखावर आपली दुकाने २४ तास चालवण्याची ही कोणती मानसिकता? नेपाळच्या भूकंपातून भारतीय मिडीयाला का हाकलून लावले याची कारणे इथे कळतात..तो कोणी अँकर नावाचा जो प्राणी असतो त्याचे बावळट ज्ञान, स्तुडीओतून त्याला बालिश प्रश्न विचारणाऱ्याचे त्याहीपेक्षाचे अगाध ज्ञान (म्हणजे माहिती. ज्ञान काय असते हे यांना काय कळणार?) किती बाळबोध आहे याचीच सर्व उदाहरणे समोर येतात..सुरक्षित अंतरावर उभे राहून शोध यंत्रणा कुठे चुकली आणि आम्ही त्याची सर्वात प्रथम ‘ब्रेकिंग न्यूज’ (खरं तर हा शब्द ‘बार्किंग न्यूज’ असा असल्यास जास्त चपखल होईल) कशी दाखवली याचेच हे भांडवल करत आपली दुकाने चालू ठेवत आहेत. हे मूर्ख मिडियामेन करत असलेले लाइव्ह विश्लेषण पहिले की देश कुठे चाललाय हेच कळेनासे होते..

त्या सोबतच्या दुसऱ्या पुलावरून हा सर्व ‘सेल्फिश’नेस ‘लाइव्ह’ चालू असताना तो दुसरा पूलही कोसळला असते तर बरे झाले असते आणि आपण सुटलो असतो असे वाटले तर चुकले काय? काही वर्षांपूर्वी संसदेवर जो अतिरेकी हल्ला झाला होता त्यात कोणीही राजकारणी का मेला नाही असा मुलभूत प्रश्न तेंव्हा सामान्य लोकांनी एकमेकाला विचारला होता याची आठवण ह्या प्रसंगी होते..मला तर वाटते अतिरेकी अफजल गुरूला न्यायालयाने फासावर देण्यामागे हे देखील एक कारण असावे..

हे माझ लिखाण सर्वपक्षीय पुढाऱ्यांकडून झालेल्या भ्रमनिराशेने झालेल्या उद्विगतेतून आलेलं आहे. लोकशाहीच्या गोंडस नावाखाली जनतेशी चाललेला जो खेळ आहे तो आता कुठेतरी थांबविण्याची गरज आहे. आपण सामान्य जनताही याला कारणीभूत आहोत. आपण जाब विचारायला विसरलोय आणि त्यातून ह्या लोकांची ही मुजोरी आलेली आहे. राजकारण्यांना आणि आपल्या पैशावर गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या प्रशासनिक अधिकाऱ्यांना आता जाब विचारण्याची कधी नव्हे एवढी गरज निर्माण झाली आहे. विविध पक्षांचे झेंडे खांद्यावर मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांनी आता त्या झेंड्यांची काठी उलट्या बाजून हातात घेऊन ‘मदारी’ होऊन आपापल्या नेत्यांना जाब विचारायची हीच वेळ आहे. आता नाही तर कधीच नाही..जागे व्हा, जागे होऊ..!!

कोकणापुरतं बोलायचं तर कोकणचा ‘कॅलीफोर्निया’ करून झाला..’व्हिजन डॉक्युमेंट’ करून झाले..कोकण आहे तिथेच आहे, पुरात माणस मारतायत, हायवेवर कुत्र्याच्या मौतीने आपला जीव गमावतायत, कुटुंब उध्वस्त होतायतं..! सर्व तसच चालू आहे, स्वप्न दाखवणारे नेते मात्र कुठच्या कुठे जाऊन पोहोचले..! कोकणात प्रामाणिक नेते नाहीत असे नाही परंतु त्यांना ‘श्रेष्ठीं’चा आशीर्वाद नाही, त्यांना तळमळीने काम करायचे आहे परंतु बळ नाही अशी सर्व परिस्थिती आहे..!!

जाता जाता –

आमच्या म्युन्शीपाल्टीकडे म्हणे मुंबईतल्या ब्रिटीशकालीन पुलाचा रेकॉर्डच नाही अशी बातमी टीव्हीवर पहिली..रेकॉर्ड नाही असे नाही परंतु फुटामागे पैसे खाणाऱ्या बिएम्शीच्या अधिकाऱ्यांना ते रेकॉर्ड शोधायची सवडच नाहीय..पडला पूल की दे भरपाई (त्यातही यांचा वाटा असतोच), काढ अर्जंट टेंडर, खा पुन्हा त्यात मलिदा आणि बनव परत एखादा कामचलावू पूल असे हे दुष्टचक्र सुरु आहे..एवढे पैसे खावून हे करतात काय हा मला पडलेला प्रश्न आहे..! बरं पैसे खाल्यामुळे मोठी शिक्षा होऊन तुरुंगात गेलाय असा एकही राजकारणी/मोठ्या पदावरचा अधिकारी मला आठवत नाही (भुजबळचे उदाहरण अपवाद. आणि तो ही पैसे खाण्याच्या आरोपाखाली राजकीय कारणांचा बकरा ठरला असावा)..बिएम्शी आणि म्हाडा या मुंबईतल्या घरबांधणीत कंट्रोलिंग एजन्सीज असणाऱ्या संस्थांचा फाईल पासिंगसाठी दर फुटाला टेबल खालून किती पैसे द्यावे ह्याचा ‘रेट’ ठरलेला आहे आणि तो या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनाच माहित आहे..आणि तो ‘रेट’ मोजल्याशिवाय शिवाय तुमची फाईल कितीही सरळ असली तरी क्लीअर होतच नाही..ह्या पैशात सर्वात खालच्या शिपाया पासून ते आयएएसचं बिरूद नावामागे मिरवणाऱ्या अधिकाऱ्या पर्यंतचा वाटा ठरलेला असतो..आणि हो, मंत्र्याचा वाटा सर्वात मोठा असतो..!

हल्ली ‘आयएएस’कडे जाणाऱ्या मुलांची संख्या वाढण्यामागे त्या पदात असणारा ‘इझी मनी’ हा मुख्य मोटिव्हेशन पॉईंट असण्याची शक्यता असावी, देशसेवा वैगेरे बडबड लोणच्यासारखी तोंडी लावण्यापुरती असावी.

ही कोंडी कधी फुटणार कोणास ठाऊक?

— गणेश साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..