मन्या शेट ने देवीच्या देवळावर लाल रंगाचा ऐटदार कोंबडा उडवला आणि आई माऊलीचा उदोउदो करून जयजयकार केला. पाण्याने भरलेले डोळे पुसले आणि देवीला बोलला, आई तू मला वाचवला म्हणूनच मी अख्ख्या घरादाराला घेऊन पुन्हा भेटीला आलो. कुंदा बायने सुद्धा हुंदका आवरला आणि देवीला मनोभावे हात जोडले आणि बोलली, आई तुला नवस बोलले आणि आज पुरा करायला आले, माझा संसार वाचवलास ग आई माझ्या.
तीन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, मन्या शेट गावात नावाजलेला बिल्डर होता. त्याने केलेल्या बांधकामात क्वालिटी असायची. दिवसभर उन्हातान्हात साईटवर स्वतः लक्ष घातल्याने इतर बिल्डर सारखे कमी क्वालिटीचे माल मटेरियल किंवा थातुर मातुर कामं करत नसल्याने त्याने बांधकाम केलेल्या रूम चांगल्या भावात विकल्या जायच्या. घरात पैश्या अडक्याची, गाडी घोड्याची कमतरता नव्हती. लहान भावाचे आणि बहिणीचे गेल्याच वर्षी जोरात लग्न लावून दिले होते. भाऊ पण बांधकामाच्या साईट मन्या शेट प्रमाणे बघत होता.
मन्या शेट आणि कुंदा बायचे लग्न होऊन सात वर्षांनी त्यांना वर्षभरा पूर्वी जुळे झाले होते. मुलगा आणि मुलगी झाली होती, संपूर्ण घर आनंदाने ओसंडून वाहत होते. मुला मुलीचे जावळ करायला देवीकडे जाण्याचे ठरले. मन्या शेट आणि कुंदा बाय दोघेही स्वतः सगळ्या सगे सोयऱ्यांना आमंत्रण करायला जाऊन आले, मित्र परिवार आणि गावातल्या कुटुंबदारांना एकूण एकाला जावळ करायला चला असे आग्रहाचे आमंत्रण दिले.
एक मिनी बस आणि चार फोर व्हिलर सांगून ठेवल्या. एक दिवस वस्ती करायची होती, मित्राच्या सासऱ्याचा बंगला देवीच्या डोंगराच्या पायथ्या जवळ होता त्यामुळे राहण्याची सोय पण झाली. दोन बकरे, दहा गावठी कोंबडे आणि पंधरा हजारांची मच्छी घेतली. गावातल्या ब्रास बँडला सुपारी देऊन ठेवली. सगळ्या सामानाची मन्या शेट च्या भावाने जमवा जमव केली. पण मन्या शेट ने बियरचे वीस बॉक्स आणि वीस खंबे आणले ते बघून भावाने मन्या शेटला विनवले, दादा हे कशासाठी आणलेस आपल्या शुभ कार्यात याची काय गरज आहे. मन्या शेटने त्याची समजूत काढली, हल्ली याच्याशिवाय कोणी यायला मागत नाही, मटण मच्छी तर सगळेच आपापल्या घरी दोन दिवसाआड खातातच, नाहीतरी आपण वस्तीला जाणार आहोत एवढं आणलेले पण कमी येईल बघ.मन्या शेटला लहान भावाने समजावायचा खूप प्रयत्न केला पण त्याच्या हौसेला मोल नाही असा विचार करून तो गप्प बसला.
मंगळवारी दुपारी मन्या शेटच्या गाड्या देवीकडे जायला निघाल्या. मिनी बस मध्ये कुटुंबदार आणि घरातली बाया पोरं बसली. फोर व्हिलर मध्ये गावातले मित्र आणि सगे सोयरे बसले. दारूची सोय आहे समजल्यावर गाड्या कमी पडल्या तर आणखीन तीन गाड्या वाढवायला लागल्या. संध्याकाळी सगळे पोचल्यावर एक बकरा आणि चार कोंबडे कापले. अंधार पडायला लागल्यावर ब्रास बँड वाजायला लागला. देवीच्या गाण्यांवर ताल धरून बायका पोरं नाचू लागली. मन्याचे मित्र आणि सगे सोयऱ्यांची बैठक बंगल्याच्या टेरेसवर बसली. रात्री दहा वाजता सगळे पिऊन तराठ झाले आणि नाचायला आले. बँड वाले वाजवून थकले तर त्यांना शिवीगाळ करून अजून अर्धा तास त्यांच्याकडून वाजवून घेतले. शेवटी बँडवाले कंटाळल्यावर फोर व्हिलर मध्ये मोठ्या आवाजात गाणी लावून आणखी तासभर नाचले.
जावळ करायला आणलेली मन्या शेटची बाळं गोंगाटामुळे पार बावरली, झोप होत नसल्याने चीड चीड करत रडायला लागली होती. कुंदा बाय आणि तिची धाकटी जाऊ त्यांना संध्याकाळपासून घेऊनच बसली होती.
मन्या शेटच्या भावाने पोरांना, वाहिनीला आणि बायकोला बघून डोक्याला हात मारला होता, मन्या शेट पण दारूच्या नशेत चूर झाला होता त्याला बोलून काही उपयोग नव्हता. कुटुंबदारात पण कोणी वरिष्ठ कोणाला काही बोलायला किंवा समजवायला मागत नव्हता.
सकाळी लवकरच बायका पोरं देवळात गेली, मन्या शेटने अंथरुणातूनच भावाला तुम्ही व्हा पुढे मी येतो मागून म्हणून पुढे पाठवला. पोरांचा मामा ज्याच्या मांडीवर पोरांना ठेऊन जावळ केले जाणार होते त्याने रात्री एवढी प्यायली होती की जेवता जेवता तो ताटातच ओकला होता. कुंदा बाय आणि तिची भावजय जेवायला बसली होती, भावाचा प्रताप ऐकून दोघी पण भरल्या ताटावरून उठल्या आणि ओकारीची घाण साफ करायला गेल्या होत्या. रात्री जास्त झाल्याने अकरा वाजले तरी पोरांचा मामा आणि मन्या शेट काही आले नव्हते. अर्ध्या तासाने दोघे कसेतरी उगवले तेव्हा कुठं तीन तास ताटकळून राहिलेल्या मंडळींनी निःश्वास सोडला पोरांचे केस काढले. टकलावर चंदनाचा लेप लावला आणि ब्रास बँड वाजायला लागला. नाचत नाचत सगळ्यांनी धमाल केली. जसजस ऊन वाढायला लागलं तसतसं सगळे बंगल्यावर माघारी फिरले.
शिक्का मारलेला दुसरा बकरा आणि कोंबडे कापले. वीस बियर बॉक्स पैकी रात्री पंधरा संपले आणि चारच खंबे उरले होते. मन्या शेटने चार पेग मारले होते, दारू संपायला आल्याने त्याच्या तोंडचे पाणी पळाले होते, भर उन्हात त्याने गाडी काढली आणि वाईन शॉप कडे निघाला. शिल्लक असलेली दारू संपायच्या आत दुसरी आणण्याच्या धडपडीत मन्या शेट सुसाट गाडी पळवत होता. पण वाईन शॉपला पोचण्या अगोदरच रस्त्यात एक गाय आडवी आली तिला वाचवण्याच्या नादात मन्या शेटची गाडी डिव्हायडर वर आदळली आणि दोन पलट्या खाऊन रस्त्याच्या मधोमध कोसळली. समोरच पोलीस चौकी होती, दोन पोलीस धावत धावत गेले आणि मन्या शेट च्या खिशातून बाजूला पडलेला मोबाईल उचलला, लास्ट डायल वर कॉल केला आणि घडलेला प्रकार सांगितला.
सगळ्यांची धावाधाव झाली मन्या शेटला ऍम्ब्युलन्स मधून मुंबईला हलविले. गावात वाऱ्यासारखी बातमी पसरली, मन्या शेट कोमात गेला. आठ दिवस हास्पिटल आणि घरी लोकांची रीघ लागली. मन्या शेट कोमातच होता, हळू हळू हॉस्पिटल आणि घरी येणारी लोकं कमी झाली. कुंदा बाय रडून रडून अर्धी झाली होती. मन्या शेटच्या भावाने सगळ्यांचा चांगलाच अनुभव घेतला सुरवातीला येऊन धीर देणारे नातेवाईक आणि गावातले लोकं आता नजर टाळू लागले होते. ज्याचा तो आपापल्या कामात गुंतला होता. मन्या शेट जिवंत आहे का कधी मरेल याचे कोणाला काही पडले नव्हते. एवढंच काय त्याच्या बायकोने त्याला सांगितले, जावळ करायला एवढी लोकं आली होती सगळ्यांनी दाबून खाल्ले आणि प्यायले पण ज्या शुभ कार्यासाठी आले होते त्यांनी पोरांना जवळ घ्यायचे सोडा पण साधे वळून बघितले पण नाही.बायका पोरं सोडून देवीच्या दर्शनाला पण कोणाला जावंसं वाटतं नव्हतं एवढी सगळ्यांना जास्त झाली होती.
पंधरा दिवासानंतरसुद्धा मन्या शेट कोमातच होता. हॉस्पिटल मध्ये मन्या शेटचा हात हातात घेऊन झोप लागलेल्या कुंदा बायला पहाटे सकाळी सकाळी स्वप्न पडले आणि कुंदा बायने घरी येऊन आंघोळ केली आणि घरातल्या देव्हरातल्या देवीच्या मुखवट्यासमोर भरल्या डोळ्याने आर्जव केले, बोलली, आये माझा संसार वाचव, तुझा नवस फेडायला आम्हाला जोडीने लवकरच येव दे.
कुंदा बाय जुळ्या पोरांना भावजयी जवळ झोपवून रात्री हॉस्पिटल मध्ये मन्या शेट जवळ राहायची. तिला झोप आल्यावर मन्या शेटचा हात हातात घेऊन झोपायची. देवीला नवस बोलून चार दिवस झाले होते, पहाटे पहाटे कुंदा बायच्या हाताला काहीतरी जाणवले, सुरवातीला झोपेत स्वप्न पडलंय असं तिला वाटले पण मन्या शेटची बोटं हलू लागली तशी ती खाडकन जागी झाली. ड्युटीवर असलेल्या डॉक्टर कडे धावत गेली आणि आनंदाने किंचाळू लागली, माझा धनी शुद्धीवर आला डॉक्टर. डॉक्टर ने तपासले आणि त्याच्या चेहऱ्यावरचे हसू बघून कुंदा बायने देवीला हात जोडले. आय माझी हाकेला धावली बोलून कुंदा बाय धाय मोकलून रडू लागली.
मन्या शेटला पूर्णपणे बरं व्हायला आणखीन दीड महिना गेला. मन्या शेटला त्याच्या भावाने ऍक्सीडेन्ट झाल्यापासूनच्या सगळ्या घडामोडी सांगितल्या. फक्त आणि फक्त वहिनीने त्याचा जीव मागून आणला, देवीची कृपा झाली आणि तू परत आला हे सांगताना त्याचे डोळे पाणावले.
मन्या शेटने मनातल्या मनात देवीची माफी मागितली यापुढे दर्शनाला गेल्यावरच काय पण उभ्या जन्मात दारूला हात लावणार नाही अशी शप्पथ घेतली. देवीच्या दर्शनाला जाताना कुठल्याही शुभ कार्याला माझ्या घरातूनच काय पण माझ्या संपूर्ण कुटुंबदारांपैकी कोणाकडूनही दारू आणि नशापाणी होऊ देणार नाही यासाठी वचनबद्ध राहण्याचा मन्या शेटने निर्णय घेतला.
कृपया नांव आणि घटना यांचा एकमेकांशी संबंध जोडू नका. ऐकीव घटना व माहितीच्या आधारे सदरचा लेख लिहिला आहे.
देवस्थानाच्या पवित्र ठिकाणी, शुभकार्याना हौस आणि मौज मजेच्या नावाखाली चालणारी हुल्लडबाजी आणि नशा पाणी थांबवण्यासाठी सहकार्य करा.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर,
B. E. (Mech), DME, DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply