नवे वर्ष. नवा सूर्य, नवी सकाळ, सारे काही नवे नवे. जुने जे होते ते गेले संपले नवी सुरवात झालीय. मनाच्या कोपऱ्यातील सारी जळमटं जुन्या बरोबर जळून गेलीय. मातीच्या उदरातून अंकुर बाहेर यावा तसा नवा कोरा दिवस उजाडलाय. पूर्णता पाटी कोरी असलेला. असं म्हणतात, की दृष्टी बदलली की सृष्टी बदलते. तसे पहायला गेले तर कालचा दिवस आणि आजचा दिवस यात मोठा फरक तो काय? कालही सूर्य होता, चंद्र होता… तारे होते… रात्र होती, दिवस होता. काल जे होते तेच आजही आहेच ना? मग बदलले ते काय? जे काल होते तेच आज आहे, म्हटल्यावर मनात उत्साहाची कारंजी का फुलावी… नव्या दमाचा उत्साह शरीरात का यावा. याचे उत्तर शोधणे फार अवघड नाही. जेव्हा आपण सारेच जण एकत्रितपणे हे समजुन चालतो की आज काहीतरी नवीन होणार आहे, नवे काहीतरी घडणार आहे, नव्याची सुरवात होणार आहे… तेव्हा ही जाणीव समूहाच्या, समूहातल्या प्रत्येकाच्या मनात खोलवर रूजते. तीच सार्वत्रिक रुप घेऊन बाहेर येते, त्याचाच परिणाम आपल्याला जाणवत राहतो. नव्या दिवसाचे, नव्या वर्षाचे स्वागत करतांना ही जाणीव अधिक तीव्र होत जाते. गत वर्षाच्या सर्व जुन्या आठवणी बाजुला सारत नव्याने सुरवात करायला आपण सारेच आतुर असतो…
मानवी स्वभावाचे वैशिष्ट्येच आहे की त्याला नव्याची ओढ असते, आकर्षण असते. नवेपण त्याला हवे असते. जे काही नवे आहे, ते स्वीकारण्यात मानवाला आनंद असतो. नाविन्याचा शोध घेणे, स्वीकारणे हे प्रत्येकाला आवडत असते. आम्ही नवे काय स्वीकारतो. आम्ही नवी भाषा स्वीकारतो, नवे बोलणे स्वीकारतो, नवी जीवनशैली स्वीकारतो. मोबाईलच्या स्क्रीनवर येणाऱ्या नवनव्या गोष्टींचा स्वीकार करतो. नव्या विचारांचा स्वीकार करतो. लहान असतांना बोलायला शिकणे नवे होते, लिहायला शिकणे नवे होते, मैदानात खेळणे नवे होते. खेळता-खेळता पडणे देखील नवेच होते ना… पहिल्यांदा शाळेत जाणे नवे होते, आई-वडिलांचा हात सोडून अनोळखी वर्गात… अनोळखी बाईंच्या (मॅम) बरोबर राहण्याचा तो वर्गही नवाच होता… महाविद्यालयाच्या गलबटात भांबावलेल्या चेहऱ्याने फिरणेही नवेच होते… या नवेपणात भेटणारा एखादा चेहराही नवाच असतो… शिक्षणाची पदवी पदरात घेतल्यानंतर व्यवहाराच्या जगात पाऊल ठेवणे देखील नवीनच होते. स्वत:ला प्रत्येक कसोटीवर ताऊन सुलावून पाहणे देखील नवेच होते. नोकरीच्या पहिल्या दिवशी घरातून बाहेर पडतांना आई-वडिलांच्या पायावर डोके ठेवण्याचा अनुभव देखील नवाच होता. पहिला पगार आईच्या हाती ठेवणे देखील नवेच होते. आपल्या आयुष्यातील नव्याची ही साखळी कधी, कुठे संपणार आहे का? मनाच्या उत्साहाला आहोटी आली की हे नवेपण संपायला लागते. हे लक्षात घेतले पाहिजे. तेव्हा मनाचा उत्साह कायम असायला हवा. तो कायम ठेवण्यासाठी पुन्हा दृष्टीची आराधना करणं आलचं. कारण जशी दृष्टी तशी सृष्टी हे समजून घेतलं पाहिजे. डोळ्यावर ज्या रंगाचा चष्मा असेल तशाच रंगाचा भवताल दिसू लागेल हे समजून घेतले पाहिजे. नवी दृष्टी लाभण्यासाठी आतल्या सृष्टीला जागृत करायला हवे. आपल्या प्रत्येकाच्या आत, अंतर्मनात ही सृष्टी आहे… सकारात्मक दृष्टीकोन बाळगायला हवा. आजच्या व्यवहारपूर्ण जीवन संघर्षात ही सकारात्मकता जपणे कठीण वाटू शकते, पण अशक्य नाही. नव्या वर्षाच्या नव्या दिवसाचा हा संकल्प करूया का…!
— दिनेश दीक्षित… जळगाव
(९४०४९५५२४५)
Leave a Reply