मादाम तुसॉद बघून हॉटेलवर परत आलो. गेले कित्येक आठवडे साईट सीईंग मुळे खूप धावपळ केली होती.आता थकल्यासारखे वाटत होते. अजून एक विकेंड, मग पुढच्या विकेंडला बॅक टू पॅव्हिलिऑन. थोड होम सिक वाटायला लागले होते. घरच्यांची आठवण येत होती. जातील हे पण दिवस!
सोमवार, 16 ऑगस्ट 2004 उजाडला. आम्ही प्रियाला हळू हळू तिथल्या ट्रेन सिस्टीम, तिकीट सिस्टीमची ओळख करून देत होतो. ऑफिस मध्ये गेल्यावर तिची मार्टिन आणि नीलशी ओळख करून दिली.
तिचा जास्त कल एन्जॉयमेंटकडे होता. कामात लक्ष कमी वाटलं. पहिल्याच दिवशी तिचा मेल बॉक्स फुल झाल्याची तक्रार माझ्यापर्यंत पोहचली. रात्री हॉटेलवर मी आणि उमेशने तिला समजावून सांगितले. परत दुसऱ्या दिवशी तीच तऱ्हा. तिच्या कामाविषयी पण एक – दोन तक्रारी आल्या. रात्री परत थोड फार बौद्धिक घेतलं. पण तिच्या पचनी पडलं नसावं ते. मग आम्ही नाद सोडून दिला.
आता माझे शेवटचे दोन आठवडे राहिले होते इथे. परत येण्याचं सुध्धा काही ठरलं नव्हत. आमचं नेहमीच रूटीन सुरू होत. मला संतोषच्या हॉटेलवरच्या फेऱ्या वाढल्यासरख्या वाटल्या. त्याला चेष्टेने मी म्हणाले सुद्धा, काही उपयोग नाही. ती ऑलरेडी एन्गेजड् आहे. बिच्चारा! हिरमोड झाला असावा. अशा खेळीमेळीच्या वातावरणात दिवस पुढे सरकत होते.
प्रिया तास न् तास तिच्या बॉयफ्रेंडशी फोनवर बोलत बसायची आणि ऑफिस मधून मेलबाजी. मला खूप आश्चर्य वाटायचे. इतकं काय बोलतात. मला आमचे हॉस्टेलचे दिवस आठवले. मी आणि शैलेश आधी काय किंवा आता लग्नानंतर काय, 5-10 मिनिटांपेक्षा जास्त बोललो असू हे आठवत नाही.
गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे ऑफिसला गेले आणि परत एक मेल आदळली होती मेलबॉक्स मध्ये. ह्या शनिवारी आम्हाला सडबरी टाऊनला शिफ्ट व्हायचे होते. मी, प्रिया आणि उमेश. परेश, रितेश आणि बालाजी प्रेस्टन रोडला शिफ्ट होणार होते.
झालं! पुन्हा उचल बांगडी. थोडीशी वैतागलेच मी. मला घरी जायची ओढ लागली होती. आणि आता पॅकिंग करून डायरेक्ट एअर पोर्ट गाठण्याची स्वप्ने बघत होते मी. मला अगदी बकिंगहॅम पॅलेस मध्ये सुध्दा शिफ्ट करायला सांगितले असते तरी माझी तयारी नव्हती. आणि काय एका आठवड्यांसाठी नसती झंझट! मी थोड्या तिरमिरीतच इंडियाला सुभाष कुलकर्णींना फोन लावला.
फोनवर मला जे कळलं त्याने माझ्या रागाची जागा आनंदाने घेतली. मला वर्क परमिटवर परत यायचं आहे, (हे मला आत्ताच कळत होतं) मग आत्ताच सगळं सामान तिकडे शिफ्ट कर आणि जरुरी पुरतं इंडियाला घेवून जा. बाकी सडबरीच्या घरात ठेव. आणि परत आलीस की डायरेक्ट तिकडेच जा. असा प्लॅन आहे तर! हे म्हणजे आंधळा मागतो एक आणि देव देतो दोन अस झालं. फोन ठेवतानाच माझ्या डोक्यात एक भन्नाट विचार आला. येस, आता आपण खूप शॉपिंग करू शकतो.
मगाचा वैताग आता उत्साहात बदलला. मस्त पैकी भली मोठ्ठी शॉपिंग लिस्ट बनवली. जरुरीपुरते कपडे आणि केलेलं शॉपिंग एवढंच आता मला न्यायचं होत. जो होता है वो अच्छे के लिये ही होता है!
मग शुक्रवारी रात्री आम्ही खूप एन्जॉय केलं. खूप उशिरापर्यंत गप्पा, गाणी, परत शेवटची हाईड पार्कची चक्कर अस करत आम्ही 3-4 वाजता झोपलो. आता उद्या जाण्याचं काही टेन्शन नव्हत. आपलीच मंडळी होती तिथे. म्हणजे माझा पहिला वीकेंड आणि शेवटचा वीकेंड एकाच घरात! मला ते घर तसही खूप आवडलं होत पहिल्याच भेटीत!
एखादे घर, जागा कधी कधी पहिल्याच भेटीत आपलीशी वाटते तसच काहीस माझं ह्या घराबाबत झालं होत. मी पहिल्या वीकेंडला परेशने सांगितल्याप्रमाणे स्टेशनला उतरले होते आणि तिथे परेश घ्यायला आला होता. स्टेशनपासून घर 15 मिनिटांच्या रस्त्यावर होत. सुरवातीचा 10 मिनिटांचा रस्ता नेहमीच्या इंग्लिश रस्त्यांप्रमाणे स्वच्छ, सुंदर, दोन्ही बाजूला टुमदार बंगले.
थोडे पुढे गेल्यावर एक छोटे कुंपण होते. दोन्ही बाजूला गोल्फ कोर्सचे मैदान आणि त्याची हिरवळ. मध्ये एक छोटा कच्चा रस्ता आणि पलीकडे अजून एक कुंपण!
मला एकदम अपूर्वाई मधील खेड्याचे केलेले वर्णन आठवले. त्या चित्रातल्या सारखेच हे होते. ते मला पहिल्या वीकेंडलाच जाणवले होते. आणि पु.ल.नच्या अपूर्वाई मधील चित्राशी साधर्म्य सांगणारे ते दृश्य मनात कोरले गेले होते.
घरसुद्धा ३ मजली टुमदार होते. मी हिथ्रो एक्सप्रेसमधून जी भातुकलीच्या खेळण्यातली घरे पाहिली होती, अशाच एका घरात मी काही आठवडे रहाणार होते. किती एक्सायटींग होतं!
घराच्या उजव्या हाताला कार पार्किंगची जागा, आत प्रवेश केल्याबरोबर समोर एक पॅसेज, डाव्या हाताला करकर वाजणारा लाकडी जिना, उजवीकडे हॉल मधे उघडणारे दार, समोर किचन, हॉलच्या २ भिंतीना मोठ्या फुल साइज् काचेच्या खिडक्या, मागे बॅकयार्ड, किचनमधून बॅकयार्डला जाण्यासाठी काचेचे दार. वरती ३ बेडरुमस् आणि वॉशरुम. अजून वर गेले की एक बेडरुम ज्याचे छत कौलारु होते. आणि तिथेही एक वॉशरुम. पूर्ण घरभर कारपेट. सगळं फ्लोअरिंग वूडन! टिपिकल इंग्लिश सिनेमामधे असणारं घरं!
आता माझे वास्तव्य काही काळाने पुढचा काही काळ तिथेच असणार ह्या जाणिवेने मी खुश झाले.
शनिवारचं शिफ्टिंग एक दिवस पुढे ढकललं गेलं. शनिवारी ते घर साफ करुन घेणार होते. वा! म्हणजे अजून एक दिवस मुक्काम वाढला इथला!
मग शनिवारचा पूर्ण दिवस आम्ही बॉंड स्ट्रीट, ऑक्सफर्ड स्ट्रीट, पिकॅडिली सर्कस शॉपिंगच्या नावाखाली आख्खं पिंजून काढलं. संध्याकाळी उशिरा RCAला परतलो आणि पॅकिंग करून सामान तयार ठेवलं. आता उद्या सकाळी फायनल अलविदा RCA ला!
जुनं सोडवत नव्हतं आणि नविन खुणावत होतं अशा मनाच्या दोलायमान अवस्थेत ती रात्र गेली!
— यशश्री पाटील.
Leave a Reply