आज नव्या घरात येऊन 10 दिवस झाले.
अजूनही घर ओळखीचं असं झालं नाही…
सामान जुनंच आहे…
तरीही नवीन ठिकाणी हात सरसावत नाही.
जुने शेजारी, जुन्या वाण्याचा अजूनही कुठे कुठे भास होतो… भाजीवाल्यापासून गिरणीपर्यंत
सगळेच चेहरे अनोळखी आहेत..
ते मला नि मी त्यांना कोण ही नवी बया? हा एकच सवाल आहे…
भिंतीसुद्धा बोलक्या असतात…
त्या आधीच्या घरी बोलायच्या…
छोट्याशा माझ्या अंगणात ऊन सावल्यांचा खेळ खेळायच्या…
इथलं अंगण प्रशस्त आहे,
आमराई अन तुळशी वृंदावन आणखीन झोपाळा नेमका आहे…
तरीही ते अजून ओळखिच नाही
माझ्या मनाला घेऊन झुलवत नाही…
सावल्या दाटून आल्या म्हणजे
गप्पा तिथे रमत नाहीत…
चहासोबत किशोरीचा सहेला रे इथे गुंजत नाही…
होईल हळूहळू सारे काही सुरळीत…
रमेन ही काही काळानी मी माझी या खोपीत…
तरी अजून सारे काही नवे नवे नव्हाळी
सरत नाही दिस माझा लागतो उगी जिव्हाळी!!
— वर्षा कदम.
Leave a Reply