या पुरस्काराने कार्यक्रम करण्याची नवी उमेद दिली. कळवा स्कूलच्या मदतीसाठी आयोजित केलेल्या शंकर-जयकिशन नाईटमध्ये मी काही गाणी गायली. ओसवाल पार्क कलामंचच्या उद्घाटनाप्रित्यर्थ ‘फर्माईश’ हा माझा गझलचा कार्यक्रम झाला. सौ. पारसनीस आणि श्री. पटवर्धन याचे आयोजक होते. यानंतर ‘स्वर- गंध’ या अंधांसाठी आयोजित केलेल्या सुगम संगीत गायन स्पर्धेचे मी परीक्षण केले. रोटरी क्लब ऑफ ठाणे हिल्स आणि नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाईंड यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. शास्त्रीय संगीतावर आधारित हिंदी चित्रपटगीतांचा कार्यक्रम ‘मधुबन मे राधिका’ आयोजक रमेश पाटील आणि नगरसेवक विलास सामंत यांनी घंटाळी मैदानावर आयोजित केला. या कार्यक्रमात मी अनेक गाणी सादर केली. या कार्यक्रमानंतर नगरसेवक विलास सामंत आणि स्थायी समितीचे सभापती नरेश म्हस्के यांनी ‘ठाणे गौरव’ पुरस्कारासाठी माझे नाव सुचवले. महापौर संजयजी मोरे यांनी या संदर्भात माझी भेट घेतली आणि काही दिवसातच ठाणे महानगरपालिकेतर्फे देण्यात येणारा ‘ठाणे गौरव पुरस्कार’ मला जाहीर झाला. याच काळात हिंदू जागृती गणेशोत्सव मंडळासाठी मी ‘आरास ही
स्वरांची’ हा मराठी व हिंदी गाण्यांचा कार्यक्रम केला. माझा विद्यार्थी मंदार जोशी, विद्यार्थिनी गीता पुरााणिक आणि सुप्रसिद्ध गायिका रंजना जोगळेकर या कार्यक्रमात माझ्याबरोबर गायल्या.
१ ऑक्टोबर २०१५ रोजी ठाणे गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. माजी महापौर मोहन गुप्ते, सतीश प्रधान आणि वसंतराव डावखरे यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथजी शिंदे आणि महापौर संजयजी मोरे यांच्या हस्ते मी ‘ठाणे गौरव’ पुरस्कार स्वीकारला. या एका वर्षात ‘ठाणे नगररत्न’ आणि ‘ठाणे गौरव’ असे दोन पुरस्कार मला मिळाले.
या पुरस्कारांपेक्षाही मोठा आनंद देणारी गोष्ट घडली होती. मी ९९७ जाहीर कार्यक्रम पूर्ण केले होते. आता श्रीगणरायांना पुन्हा वंदन करायचे होते. या माझ्या इच्छेप्रमाणे ९९८ वा कार्यक्रम जनप्रबोधिनी प्रतिष्ठानसाठी टिटवाळा येथे मी श्रीगजाननाच्या चरणी सादर केला आणि त्याचा आशीर्वाद घेतला. पुढील कार्यक्रम मी ठाणेकर रसिकांसाठी केला. ६ डिसेंबर २०१५ रोजी ‘स्वर-मंच’तर्फे ‘फर्माईश’ या माझ्या हिंदी गझलच्या कार्यक्रमाचे मोफत आयोजन करण्यात आले. निवेदन मयुरेश साने याचे होते. रसिकांनी या कार्यक्रमाला मनापासून दाद दिली आणि दुसऱ्याच दिवशी मी गडकरी रंगायतनकडे तारखेसाठी धाव घेतली. माझ्या स्वप्नातल्या एक हजाराव्या कार्यक्रमासाठी तारीख मिळाली २० एप्रिल २०१६ !
-अनिरुद्ध जोशी
Leave a Reply