खरं सांगते बरा आहे
नवरा माझा नवरा आहे
थोडासा तो कोडगा आहे
जणु माझा पोरगा आहे
कधी तो माझा पप्पा आहे
मनातला नाजूक कप्पा आहे
थोडासा तो चिडका आहे
पण मायेचा झरा आहे
खरं सांगते बरा आहे
नवरा माझा नवरा आहे
लहानांशी त्याची गट्टी आहे
थोडासा तो हट्टी आहे
त्याला वाटतं तो धाडसी आहे
मला वाटतं तो आळशी आहे
थोडासा तो हळवा आहे
माझ्या जिवनाचा वारा आहे
खरं सांगते बरा आहे
नवरा माझा नवरा आहे
थोडासा तो भावनिक आहे
राग त्याचा क्षणिक आहे
नव्या कल्पनेत उडणारा आहे
जुन्या आठवणीत रमणारा आहे
नव्या स्वप्नात रंगणारा आहे
त्याच्यामुळे सौख्य घरा आहे
खरं सांगते बरा आहे
नवरा माझा नवरा आहे
थोडासा तो ज्ञानी आहे
सुखी आणि समाधानी आहे
संयम थोडासा कमी आहे
जिभेनं थोडा कडवा आहे
पहिल्यापेक्षा बरा आहे
मी कुठं म्हणते हिरा आहे
खरं सांगते बरा आहे
नवरा माझा नवरा आहे.
– डॉ. सुभाष कटकदौंड