गन्धसारघनसारचारुनवनागवल्लिरसवासिनीं
सान्ध्यरागमधुराधराभरणसुन्दराननशुचिस्मिताम् ।
मन्थरायतविलोचनाममलबालचन्द्रकृतशेखरीं
इन्दिरारमणसोदरीं मनसि भावयामि परदेवताम् ॥ २॥
आई जगदंबेच्या दिव्य शृंगाराचे वर्णन करताना भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
गन्धसार- अर्थात मलय पर्वतावर निर्माण होणारे उत्तम चंदन.
घनसार- म्हणजे कापूर,
चारुनवनागवल्लि- सुंदर कोवळ्या विड्याच्या पानांचा,
रसवासिनीं – रस धारण करणाऱ्या,
आचार्य श्री येथे बाह्य आणि अंतर्गत अशा दोन्ही शृंगारांचा विचार करीत आहेत.
चंदनाचा लेप हा बाह्य शृंगार आहे. तर विडा खाणे हा अंतर्गत शृंगार. पूर्ण भोजन झाल्यानंतर तांबूल ग्रहण हे अंतर्गत तृप्तीचे प्रतीक.
यातील कापूर दोन्हीकडे वापरला जातो. चंदना सोबत लेपा मध्ये आणि विड्या सोबत खाण्यासाठी.
अशा अंतर्बाह्य रसांना धारण करणाऱ्या, परमरसपूर्ण असणाऱ्या,
सान्ध्यराग- संध्याकाळी सूर्यास्त समयी पसरलेल्या रंगाप्रमाणे असणाऱ्या,
मधुराधराभरण- अत्यंत मधुर अर्थात आकर्षक असणाऱ्या म्हणजे ओठांचे आभूषण असणाऱ्या धारण करणाऱ्या,
सुन्दरानन- सुंदरतम मुखकमल असणाऱ्या,
शुचिस्मिताम् – अतीव पवित्र हास्य असणाऱ्या,
मन्थर- आत्मतृप्त अवस्थेत किंचित मिटलेल्या स्वरूपातील मंद,
आयत- लांब,
विलोचनाम्- नेत्र असणाऱ्या
अमल- अत्यंत स्वच्छ, बालचंद्र- चंद्राची कोर,
कृतशेखरीं- मस्तकावर धारण करणाऱ्या,
इन्दिरा- देवी लक्ष्मी
रमण- तिचे रमन म्हणजे भगवान श्री विष्णू.
सोदरीं – त्यांची भगिनी असणाऱ्या,
मनसि भावयामि परदेवताम् – परमदेवता आई जगदंबेचे मी मनाने ध्यान करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply