कुण्डलत्रिविधकोणमण्डलविहारषड्दलसमुल्लस-
त्पुण्डरीकमुखभेदिनीं च प्रचण्डभानुभासमुज्ज्वलाम् ।
मण्डलेन्दुपरिवाहितामृततरङ्गिणीमरुणरूपिणीं
मण्डलान्तमणिदीपिकां मनसि भावयामि परदेवताम् ॥ ५॥
आई जगदंबेच्या परमप्रकाशित, दिव्य रूपाचे वर्णन करतांना पूज्यपाद जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
कुण्डलत्रिविधकोणमण्डलविहार- आई जगदंबेच्या कोणत्याही यंत्राच्या मध्यभागी असणाऱ्या त्रिकोण मंडल अर्थात स्थानामध्ये , कुंडल अर्थात आपल्याच आनंदामध्ये विहार करणारी,
षड्दलसमुल्लसत्पुण्डरीकमुखभेदिनीं – षट्दल म्हणजे सहा पाकळ्यांचे, समुल्लसद्- प्रफुल्लित, पूर्णपणे उमललेल्या, पुंडरीक अर्थात कमळ.
सहा पाकळ्यांच्या कमळाचे हे वर्णन स्वाधिष्ठान चक्राशी संबंधित आहे. हे चक्र नवनिर्मितीशी संबंधित आहे.
त्याचे मुखभेदन करणारी अर्थात कुंडलिनी स्वरूपात प्रवास करताना या चक्रातून वर जाणारी.
प्रचण्डभानुभासमुज्ज्वलाम् – सूर्याच्या तेजा प्रमाणे अत्यंत देदीप्यमान असणारी.
मण्डलेन्दुपरिवाहितामृततरङ्गिणी- चंद्र मंडलामध्ये प्रवाहित असणाऱ्या अमृत तरंगांप्रमाणे आल्हाददायक असणाऱ्या,
अरुणरूपिणीं- अरुणा प्रमाणे लालबुंद अर्थात अत्यंत आकर्षक असणाऱ्या,
मण्डलान्तमणिदीपिकां- सर्व निवासस्थानांचे अंतिम स्थान असणाऱ्या आपल्या मणिद्वीप नावाच्या लोकाला प्रकाशित करणाऱ्या,
आई जगदंबेच्या निवासस्थानाला मणिद्वीप असे म्हणतात. जसा विष्णूंचा वैकुंठ, शंकरांचा कैलास तसा आई जगदंबेचा लोक आहे मणिद्वीप. शक्तीच्या उपासकांसाठी तोच अंतीम लोक आहे. परम गंतव्यस्थान आहे.
मनसि भावयामि परदेवताम् – परमदेवता आई जगदंबेचे मी मनाने ध्यान करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply