या जगात माझा प्रवेश झाल्या झाल्या जेव्हा कधी मी डोळे उघडले असतील तेव्हा पहिल्यांदा मी हिलाच पाहिलं असावं बहुधा .. हो माझ्या आईची आई .. प्रमिलाआजी !
कारण दुसऱ्या बाळंतपणासाठी आईची रवानगी
बुरहानपूरहून डोंबिवलीला तिच्या माहेरी झाली होती … तिच्या आईकडे !
मी जन्मले आणि त्याच दरम्यान माझ्या डोंबिवलीच्या आजोबांना नोकरीत बढती मिळाली . .पत्र्याच्या चाळीतल्या छोट्या दोन खणी घरातून डायरेक्ट रत्नदीपच्या मोठया घरात आजीबाबा ,मामा , दोन्ही मावश्या
आनंदाने रहायला आले … त्या काळात त्या मोठया घरातलं पाहिलं बाळ मीच … माझ्या ताईचा जन्म आधीच्या पत्र्याच्या घरातला !
आणि तिथे मात्र सुनेला दुसरी पण मुलगीच झाली म्हणून बुरहानपुरची यमूआज्जी मात्र नाराज झाली होती …
इथे प्रमिला आजीनं मात्र सगळ काही उत्साहांनं पार पाडलं . … पुन्हा मुलगी झाली म्हणून नाराज न होता बाळंतपण सुखरूप झालं आणि बाळबाळंतीण व्यवस्थित आहेत .. ह्या आनंदात ती होती …. आईचं खाणंपिणं , घरातलं सगळ , येणारे जाणारे …सगळं जिथल्या तिथ केल असावं तिनं अन् तिच्या माझ्या प्रेमाच्या नात्याची नाळ जुळली तेव्हापासुनच !
तिचं अत्यंत उत्साही अऩ् प्रसन्न व्यक्तिमत्व , सर्वांना आपलंस करण्याची हातोटी …फार बोलघेवडा स्वभाव ..इतका की आम्हाला वाणसामान पुरवणाऱ्या त्या कोपऱ्यावरच्या वाण्यापासून ते थेट सोसायटीतल्या चौथ्या मजल्यावरच्या डॉक्टरांपर्यत सर्वांशी तीच्या गप्पा रंगत …
सगळ्यांशी आपुलकीनं बोलणारी , विचारपूस करणारी … अडीअडचणीत जमेल तशी मदत करणारी …
सोसायटीचा रंगनाथ वॉचमन असो मच्छीमार्केटमधली कुठलीही कोळीण असो , दुधवाला भय्या ,भाजीवाल्या बायका , शेजारणी .. नाही तर तिची मैत्रीण सुभी असो .. अगदी कुण्णाशीही ती तासंतास गप्पा मारू शकत असे … गप्पा मारतांना विचारपूस ,सल्ले , सुखदु : खाची देवाणघेवाण , निरोप अस सगळ साग्रसंगीत चाले … तिच्याबरोबर जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी कुणी ना कुणी ओळखीचं भेटेच भेटे ..कधी कधी खूप जणं भेटत आणि मग तास दीड तास ही आवर्तनं होत … तेव्हा तिला शांतपणे निरखत रहाणं हेच माझं काम !
डोंबिवली स्टेशनजवळचं आजीचं पाहिल्या मजल्यावरचं घर सगळयांना इतकं सोयिस्कर पडे कि विचारता सोय नाही .. जाता येता सगळ्यांना थोडा वेळ थांबून रिफ्रेश होण्याचे ठिकाण म्हणजे आजीचे घर ..आणि आजीलाही माणसांमधे रहाणं फार आवडे . मग काय . . खूप येणारे जाणारे आणि कुणीही आलं की त्याची खुशाली विचारणं त्याला काही बाही खाऊ घालणं .. हे दिवसभर चाले .. त्यात मुलीबाळी जावई नातवंड भाऊ बहीण इतर नातेवाईक … सगळे सगळे असतच …सुट्टीच्या दिवशी तर हौशीनं केलेलं स्पेशल जेवण : उत्साहानं साजरे केलेले सण समारंभ .. सगळ सगळ अगदी छान असायचं …लहानपणी एकटं कधीच वाटायचं नाही कारण आजूबाजूला असणारी ही सगळी प्रेमाची माणसं !
आमच्या या आजीच्या स्वयंपाकघराच्या खिडकीतून शं ना नवरेंचं बैठ घर दिसे … कधी कधी त्यांच्या घरातली मंडळी ही दिसत … मग स्वयंपाक करता करता कुणीही दिसलं की त्यांच्या आणि आजीच्या गप्पा चालत .. त्यात आज कुठला खास पदार्थ बनलाय तिथपासून त्या पदार्थाची रेसिपी आणि त्याच्या साठी लागणाऱ्या साहित्यासाठी केलेली धावपळ इतक्या गोष्टींचा उहापोह होई .. त्याचबरोबर त्यांच्याकडे काय बनलंय .. महागाई कशी वाढतेय , पाऊसपाण्यIच्या गप्पा , तब्येतीच्या चौकश्या .. स्वयंपाक करता करता सगळ पॅरॅलली चालत असे .
माणसं जोडणारी , आमच्या घरदाराला एकत्र बांधणारी , हौसेने वेगवेगळे पदार्थ करून सर्वांना खाऊ घालणारी .. आमची आजी ! तिला तिचा भाऊ अभिमानाने गौरी म्हणे . कारण तिचं सुंदर रुप …उंच शेलाटा बांधा , गौरवर्ण , हसरा चेहरा , मोठया केसांची वेणी .. त्यावर माळलेले अनंताचे फुल .. अगदी रोज हं … रोज पहाटे आन्हिकं आवरून घरामागच्या बागेत जाउन फुलं गोळा करायची आणि देवपूजा झाली की आपणही एक फुल हौशीने माळायचं ..आणि मुलींना सुनेला ही घालायला लावायचं .. फुलांची दांडगी हौस , ही तिच्याकडून आईकडे आणि नंतर माझ्या कडे अशी झिरपत आलीये … गाण्याचा कान …गाणं म्हणायची हौस , वाचनाची आवड ….
आयुष्य खूप भरभरून जगली माझी आज्जी … कधी ही तक्रारीचा ,नाराजीचा सूर लावला नाही तिनं उभ्या आयुष्यात . .. सगळे बरेवाईट प्रसंग झेलीत हसऱ्या चेहऱ्यानं ती गेली तेव्हा मी जास्त रडले ही नाही कारण तिला असा रडक्या चेहऱ्यानं निरोप दिलेला आवडलाच नसता मुळी ….
आज मला जाणवते ती आजी मधली प्रचंड
शक्ती ,उर्जा … मागच्या काळातली असूनही तिने स्त्री म्हणून ना स्वःताला कमी लेखलं ना आम्हाला … काळाच्या पुढेच होती ती … खूप प्रगत विचार होते तिचे आणि आमच्या कुठल्याही चांगल्या कामात सदैव पाठिंबा !
माझ्यात ज्या काही चांगल्या सवयी आणि आवडीनिवडी असतील त्या ह्या आजीकडून आल्या असाव्यात नक्कीच !म्हणजे या चांगल्या गोष्टींच्या रूपात तू आमच्यात आहेसच प्रमिला आज्जी !
लहानपणी माझं बोट धरून वेगवेगळ्या रस्त्यांवरून मला फिरवणारी आणि या रंगीबेरंगी जगाशी ओळख करुन देणारी …. माझा आयुष्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन कुठल्याही परिस्थितीत सुंदर , चांगला , पॉझिटिव्हच कसा राहिल हे पहाणारी आज्जी आजही माझ्या सोबतीला आहे मी निवडलेल्या वाटांवर…
माझं बोट तिच्या मऊशार आश्वासक हातात आहे …
मी निश्चिंतच आहे !
©️®️ दिपाली भावसार -ज्ञानमोठे
Leave a Reply