जुलै महिना आला आणि डिप्लोमा इंजिनियरींगचं पाहिलं वर्ष सुरू झालं … पाहिल्याच वर्षी सामोऱ्या आलेल्या ड्रॉईंग , मॅथ्स , मेकॅनिक्स सारख्या अहीमहीशी लढण्यासाठी क्लासेसला जायची योजना आखणे भागच पडले कारण समजण्याच्या पलिकडे गेलेलं मॅट्रीक्स , इंटिग्रेशन , डेरिव्हेटीव्हज् करता करता पार आडवं व्हायची वेळ आली . त्यात भरीला प्रॅक्टीकल्स ,जरनल्स्, आणि सारख्या कसल्या ना कसल्या व्हायवा चालूच !नुसतं चरख्यातून पिळल्यासारखं वाटू लागलं . आपला रस्ताच चुकलाय …
काय करणार …
संध्याकाळी क्लासला जाऊन आल्यावर उरलं सुरलं त्राणही संपून जाई . परिक्षेच्या वेळी रात्री अभ्यासाच जागरण आणि पुन्हा सकाळच्या लेक्चर्सचा विचार करत टेन्शन पांघरूनच झोपेच्या आधीन व्हावं लागे . ..
हे काय आपल्या मागे लागलंय देवा ! बाकीचे कॉमर्स आर्टस वाले किती बिनधास्त आणि सुखी ..खुशाल लेक्चर बंक करून मस्त फिरतायेत आणि आपण बसलोय पिळून घेत .
आज क्लास मधे तर नुसतं भंजाळल्यासारखं झालंय … डोळ्यासमोर ना ना प्रकारचे आकडे ,फॉम्युले ,आकृत्या नुसतं थयाथया नाचतायेत …असे विचार घोळवत क्लासचा रस्ता तुडवतांना एके दिवशी रस्त्याजवळच असलेल्या एका सुबकशा घरातून गाण्याचा आणि घुंगरांचा आवाज ऐकू आला … पाय तिथेच थबकले … थोडा वेळ तो आवाज ऐकत मी तिथेच उभी राहिले ..
पुढच्या आठवडयात क्लास संपल्यावर येतांना त्या घराजवळ पावलं पुन्हा घुटमळली . मनाचा हिय्या करून कंपाऊंड मधून आत शिरले . बाहेरच्या गेटजवळ पाटी लावली होती . .
‘विशाखा नृत्यालय – ज्योती शिधये ‘
अंगण ओलांडून आत गेले आणि दरवाज्याजवळ उभी राहिले … संध्याकाळचे सात वाजले असावे आत पाहिले तर समोरच नटराजाची मुर्ती !तिला नुकतीच ताजी फुलं वाहून पुजा केली होती .. समोर लावलेला दिवा मंद तेवत होता आणि धुपाचा सुगंध सगळीकडे दरवळत होता . मनाला फार प्रसन्न वाटलं …आत कथ्थकची शिकवणी रंगात आलेली … शिकवणाऱ्या बाई पाठमोऱ्या होत्या .. .थोडा वेळ दरवाजाला टेकून तशीच उभी राहिले . … क्लास संपला आणि बाई वळल्या आणि त्यांचे लक्ष माझ्याकडे गेले … त्यांना बघताच मी भानच विसरले . सावळा सुंदर रेखीव हसरा चेहरा , कानात छानशा कुडया कपाळावर मोठी ठसठशीत टिकली आणि साधीशी कॉटनची साडी .. इतकं सुंदर सोज्वळ स्वरूप ! मला आत बोलवून त्यांनी विचारपूस करायला सुरवात केली … त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीत एक लय होती हातवाऱ्यांमधे एक प्रकारचा ग्रेस ! त्यांना मी बघतच राहिले … आणि बोलता बोलता मी माझ्या नकळत त्यांना सांगून टाकलं ‘मला कथ्थक शिकायचंय ‘ त्या सौम्य हसल्या आणि म्हणाल्या ‘ठीक आहे ये उद्यापासून ‘
एका वेगळ्या आनंदात घरी पोहोचले . माझा कॉलेज ,क्लास करुन आलेला थकवा , शीण कुठल्या कुठे पळाला … गेल्या गेल्या आईला सगळं सांगितलं . . ती म्हणाली , तुला जमत असेल तर शीक खुशाल ! रात्री भरभर सर्व आवरुन अंथरुणावर पडल्या पडल्या दुसऱ्या दिवसाची वाट पहाता पहाता कसा डोळा लागला काही समजले नाही ..
दुसऱ्या दिवशी कॉलेजला ,अत्यानंदामुळे झालेला माझा अती अॅक्टीव्ह पणा पाहून सगळ्यां मित्र मैत्रिणींनी मनसोक्त चिडवून बेजार केले … कधी संध्याकाळ होते असं झालेलं ….
….
आज डान्स क्लासचा पहिला दिवस !
मी नटराजाला मनःपुर्वक नमस्कार केला … अन् माझा नृत्याच्या प्रवासाला आरंभ झाला !
बाईंची शिकवण्याची पद्धत खूप छान होती पण त्या खूप शिस्तप्रिय आणि कडक ! वेळ पाळण्याबाबत फार आग्रही …प्रत्येक छोटीशी गोष्ट त्या अतिशय विस्तारानं आणि खोलात जाऊन शिकवत … काही समजलं नसल्यास पुन्हा सांगत पुन्हा पुन्हा करून दाखवत …त्यांचा गळा ही सुंदर !
कथ्थक ह्या नृत्य प्रकार म्हणजे भारतीय आठ प्रकारच्या नृत्यशैलींमधला एक मुख्य प्रकार हे त्यांच्याकडून ऐकल्यावर मी हुरळलेच !
त्या सांगत
‘ कथावाचन करणाऱ्यां लोकांकडून मंदिरांमधे आपल्या पौराणिक कथा सांगितल्या जात. त्यानंतर होणाऱ्या कीर्तनात नट मंडळी नृत्य करीत असत. काही सामाजिक कारणांमुळे या नटमंडळींवर तत्कालीन परिस्थितीत बहिष्कार टाकला गेला, त्यामुळे यांनी स्वतःच कथा सांगून नृत्य करण्यास प्रारंभ केला, म्हणून त्यांना ‘कत्थक’ असे संबोधण्यात येऊ लागले. आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली या नटमंडळींनी नृत्याची शास्त्रीय पद्धती व परिभाषा आत्मसात केली आणि नृत्यप्रधान अंगाने त्यांनी कृष्णाच्या लीलांचे सादरीकरण करण्यास सुरुवात केली, आणि कथक नृत्यशैलीचा जन्म झाला. ‘
कथ्थक ची ही गोष्ट मला फार आवडत असे . मधून मधून त्याही ही गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत … त्यांचा उद्देश हाच होता की आम्ही जे काही शिकतोय ते खूप मनापासून शिकावं आणि पुढे जाऊन त्यात आपल्या मेहनतीची भर घालून हा वारसा पुढे चालवावा …
शास्रीयदृष्ट्या या शैलीत गत, तोडे, नायक नायिका भेद, तत्कार, घुंगुरांचा आवाज, तालवादकासह नर्तकाची जुगलबंदी अशा प्रकारांचा समावेश होतो. ‘ या गोष्टी सांगतांना त्या मधे मधे एखादा सुंदर तोडा ही करून दाखवत …
त्यामुळे तो एक दिड तास त्यांच्या सहवासात खूप छान जाई … आम्हाला शिकवतांना प्रत्येक तोडा आधी त्या करून दाखवत … तेव्हा त्यांना बघत रहावंसं वाटे . रोज ततकार , एकताल , त्रिताल झपताल म्हणणे , वेगवेगळ्या हस्त मुद्रा ,त्यांचे अर्थ चेहऱ्यावरचे भाव दर्शन … ह्या सगळ्यांची उजळणी आणि त्याबरोबर एखादा नवीन प्रकार शिकायला मिळे …
तोडे , तिहाई ,ताल , सम , मात्रा ,बोल … हे शब्द हायपरबोला , पॅराबोला , मेकॅनिक्सच्या पुलीज , केमेस्ट्रीची भयंकर समीकरणे या सगळ्यांमुळे मनावर झालेल्या जखमांवर जालीम उताऱ्याचं काम करत होते …
आता प्रत्येक संध्याकाळ सुंदर जात होती … कितीही अभ्यास असला तरी काही वाटत नव्हते .. सगळ्या विषयांच्या पुस्तकांबरोबर जुळवून घेण्याचं धोरण मी ठरवलं
आयुष्याला एक लय आली होती .. मी खुष होते
कधी कधी
कॉलेजमधे असल्यावर कुठल्याही बोरींग लेक्चरला बेंचवर हाताचा ठेका धरून कुणाला कळणार नाही अशा बेतानं हळूच डोळे मिटून बसायचं .. मग भवताल विसरून नकळत त्रिताल , तोडे ,हस्त मुद्रा असं आदल्या दिवशी शिकवलेलं काहीबाही आठवत असे … मी मनातल्या मनात गुणगुणू लागे अन् उजळणी करून घेई … म्हणजे क्लास ला गेल्या वर काही विसरायला होणार नाही असा माझा हेतू आणि बाईवर माझं इंप्रेशन चांगलं रहायला हवं हयासाठी सुध्दा माझी धडपड चालू असे …
अभ्यास संभाळून हे करतांना घरून धमकी वजा वाक्यांचे डोस मिळत .
‘ बघ हं .. आपली परिस्थिती ही बेताची आहे आणि तुमचं शिक्षण महत्वाचं ! बाकी सगळं नंतर … परिक्षेत मार्क कमी मिळाले तर डान्सक्लास बंद होईल याची धास्ती..
या सगळ्या गोष्टी संभाळता संभाळता हळू हळू वर्ष गेलं कथ्यक च्या परिक्षा ही देत गेले . क्लासच्या दर गुरुपोर्णिमेला होणाऱ्या कार्यक्रमात परफॉर्मन्स करता आल्यामुळे प्रॅक्टीस होत गेली आणि लय अंगात भिनली … स्टेज कॉन्फिडन्स आला … याला कारण बाई … त्यांनी माझ्यातला आत्मविश्वास जागवला .. आयुष्याकडे सुंदर सकारात्मक दृष्टीकोनातून पहाण्याची सवय बाईमुळे लागली ..
आयुष्याच्या एका वळणावर माझ्या ह्या गुरु मला भेटल्या आणि जगण्याचा अर्थच बदलला … कथ्थक शिकण्याचा पुरेपुर आनंद बाईच्या सहवासात राहून घेता आला .
कधी कधी असं वाटतं मॅथ्स क्लासच्या वाटेवर बाईच घर नसतं तर ? आयुष्यातल्या ह्या आनंदाला मी मुकले असते …चालता चालता घुंगरांचा आवाज काय आला आणि वाट वाकडी करून बाईच्या क्लास मधे गेले . आणि दोन वर्ष कथ्थक शिकले
नंतर वेळे अभावी अभ्यास आणि जॉब च्या व्यापामुळे क्लास सुटला … मग माझ्या खणात ठेवलेले घुंगरू कधी कधी काढून मी घरीच प्रॅक्टीस करत असे . …. बाईंना , त्यांच्या नृत्याला ,त्यांच्या घरच्या त्या संध्याकाळच्या सुंदर वातावरणाला खूप मिस करत असे ..
लग्नानंतर दोनेक वर्षानी एकदा आईकडे गेले असतांना आई म्हणाली ‘अग ते तुझे घुंगरू घेऊन जा बरं आणि क्लासबिस लाव ‘ तेव्हा मी कपाटातून घुंगरू काढले .. त्यांचा स्पर्श झाला अन् डोळ्यातून पाणीच आले … तो किती आनंदाचा काळ होता नाही माझा …. पुन्हा बाईची खूप आठवण आली ..
…..
आज बऱ्याच दिवसांनी ड्रॉवरमधून पुन्हा घुंगरू काढले बाहेर काढले … पायात घालावेसे वाटले … पण एकही तोडा आठवेना …. रोजच्या धावपळीत मी ते सगळं विसरून गेलेय … घुंगरू पायात घालून तरी काय उपयोग …
थोडा वेळ तशीच बसून राहिले ….
मिटल्या डोळ्यांमधे गेलेल्या काळाचा तो सुंदर तुकडा तरळून गेला … बाई सुंदर आवाजात म्हणायच्या त्या श्लोकांमधलाच एक श्लोक आठवला …
किमत्र बहुनोक्तेन शास्त्रकोटि शतेन च ।
दुर्लभा चित्त विश्रान्तिः विना गुरुकृपां परम् ॥
अर्थ : खूप ऐकल्याने किंवा खूप बोलल्याने नाही … किंवा करोडो शास्त्र शिकुनही नाही .. चित्तातली परम शांतता गुरुकृपा झाल्याशिवाय लाभत नाही !
©️®️ दिपाली भावसार -ज्ञानमोठे
Leave a Reply