आमचे गाव मुंबई पासून दोन तासांवर… खोपोली-पाली(गणपती) रोडवर खुरवला थांबा आहे. तेथून रामेश्र्वर हील स्टेशनला रोड जातो. त्या रोडवर कुंभारघर गांव आहे.
आठ-दहा वस्तीची छोटी-छोटी घरे आहेत. कुंभारघर नाव कसे पडले हे माहित नाही, पण तिथे मातीची मडकी व पणत्या बनवणारी एक-दोन घरे आहेत.
भाद्रपद महिना आला की आम्हा सर्वांना आमच्या गणपतीचे वेध लागतात. गाव तसे खुप लहान पण पावसाळ्यात अतिशय आल्हाददायक वातावरण असते. तेथे जास्त करून भातशेती केली जाते त्या दिवसात पिवळसर हिरवी शेती पाहून मन प्रफुल्लीत होते.
आजूबाजूच्या हिरव्यागार डोंगरांमधून पाण्याचे धबधबे वाहत असतात. डोंगराच्या पायथ्याशी एक मोठे धरण आहे ते पावसाळ्यात दुथडी भरुन वाहत असते व वर्षभर भरलेले असते.
गावात पाचच मोठी दुर्वे-मुजुमदारांची घरे, ह्याच घरांमधे अश्विन महीन्यात उजव्या सोंडेचा नवसाचा गणपती येतो. (त्या मागेही घरातील मोठ्या लोकांनी सांंगितलेली एक गोष्ट आहे.) तेव्हा सर्व मुंबईभर पसरलेले दुर्वे-मुजुमदार गणपतीनिमित्त एकत्र जमतात.
आम्ही मुळचे दुर्वे पण आम्हाला ‘मुजूमदार’ ही पदवी मिळाल्यामुळे मुजूमदार हे आडंनाव पडले. पूर्वज असे सांगतात की,भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला गडाला परकीय शत्रुंचा वेढा पडला होता. घरात पूजा करायला पुरुष मंडळी नव्हती. सर्वजण गडावर अडकली होती. म्हणून घरातील बायकांनी गणपतीस पाण्यात ठेवले व नवस केला की, “जोपर्यंत आमची मंडळी घरी सुखरूप येतील तेव्हाच तुझी पूजा केली जाईल.” त्याप्रमाणे एक महिन्याने म्हणजेच अश्विन महिन्यातील चतुर्थीला पुरुष मंडळी घरी आली. मगच गणपतीची पुजा केली गेली. तेव्हापासून अश्विन महीन्याच्या चतुर्थीलाच उजव्या सोंडेचा गणपती आणला जातो व दीड दिवसाची पुजा केली जाते.
नवरात्रातील चौथ्या माळेला बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. प्रत्येक घरात सकाळपासून लहान-मोठ्यांची लगबग चालू होते.
पूर्वी घरातील बायका पहाटे लवकर उठून सोवळ्यात स्वयंपाक करत असत व संध्याकाळ पर्यंत पंक्ती चालत, आता थोडे कमी झाले. संध्याकाळी बायका आवरून एकमेकांकडे दर्शनाला जातात व पुरुष मंडळी रात्री आरतीला जात असतात. रात्री गावातील भजन मंडळी येऊन भजन करतात. सर्वजण जमल्याने रात्रभर गप्पाटप्पा होतात खूप मजा येते.
दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचमीला कोरड्या सवाशिणीं असल्यामुळे लवकर उठून त्याची तयारी करावी लागते. दुपारपर्यंत सवाशिणींचा कार्यक्रम उरकतो. जेवणं झाली की लगेच विसर्जनाची लगबग सुरू होते.
सर्वांचे गणपती बकुळीच्या पारावर जमतात तेथे आरती केली जाते. नंतर जड अंतःकरणाने बाप्पाला निरोप दिला जातो. सर्वजण विसर्जनासाठी धरणावर जातात.
अशा ह्या गावच्या आठवणी गणपती जवळ आले की मनात रुंजी घालत असतात.
— सौ. मानसी मुकुंद वढावकर-मुजूमदार.
मुलूंड (पूर्व)
ॐ गं गणपतये नम:
??????????