राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया-सुळे यांचा जन्म ३० जून १९६९ रोजी पुणे येथे झाला.
सुप्रिया सुळे या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या. राजकारणाचा वारसा असतानाही सुप्रिया सुळे यांनी स्वबळावर आपला एक वेगळा ठसा उमटवला. सुप्रिया सुळे यांच्या राजकारणाचा आणि नेतृत्त्वाचा बाज अजित पवार आणि रोहित पवार यांच्यापेक्षा सर्वार्थाने वेगळा ठरतो. शरद पवार यांच्या तालमीत तयार झालेल्या सुप्रिया सुळे जाणीवपूर्क किंवा कदाचित आणखी कोणत्या कारणाने महाराष्ट्रातील राजकारणापासून दूर राहिल्या आहेत. त्याऐवजी सुप्रिया सुळे यांनी आपले लक्ष हे राष्ट्रीय राजकारणावर केंद्रित केल्याचे दिसते. शरद पवार यांच्याप्रमाणे त्यांना राजकारणाची आणि समाजकारणाची पूरेपूर जाण आहे. याच संयमी आणि अभ्यासू वृत्तीच्या जोरावर सुप्रिया सुळे संसदेत राष्ट्रवादीचा आवाज बुलंद करताना दिसतात. लोकसभेत अभ्यास पूर्ण मुद्दे मांडणाऱ्या, सर्व सामान्यांच्या हक्कासाठी भांडणा-या सुप्रिया सुळे या कॉलेजमध्ये मात्र लाजाळू होत्या. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईतील सेंट कोलंबस हायस्कूलमध्ये झाले. पुढे बारावीनंतर मेडीकल बद्दलची भीती आणि इंजिनियरिंग बद्दलची नावड यातून त्यांनी जयहिंद कॉलेजमधून मायक्रोबायोलॉजीमध्ये बीएससी केले.
त्यांचे वडील शरद पवार मुख्यमंत्री असतानाही त्या बसनेच कॉलेजमध्ये ये-जा करत. त्यानंतर ‘सकाळ’ वृत्तसमूहात त्यांनी काही काळ नोकरीही केली.
उच्च विचारांच्या कुटुंबात सुप्रिया सुळे यांची जडणघडण झाली. त्यांना स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याच पूर्ण स्वातंत्र्य होते. अमुकच शिकलं पाहिजे,तमुकच झालं पाहिजे,अशी कसलीही सक्ती कधीच झाली नाही. न शिक्षणाबाबत, न लग्नाबाबत. त्यांच्या आयुष्याचे सगळे निर्णय त्यां नीच घेतले आणि विशेष म्हणजे त्यांच्या पाठीशी शरद पवार आणि कुटुंबीय भक्कमपणे उभे राहिले. सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बहिणीचे पुत्रही आहेत. पण, तरीही ते अमेरिकेत नोकरीत करत. लग्ना नंतर सुप्रिया सुळे या सदानंद यांच्याबरोबर अमेरिकेत गेल्या. त्यांनी तिथे बर्कले युनिवर्सिटीत प्रवेश घेऊन आपले खंडित शिक्षण सुरू केले. तिथे जलप्रदूषणावर त्यांनी एक पेपरही सादर केला होता. नंतर सदानंद सुळे यांच्या बदलीमुळे त्यांना सिंगापूरला यावे लागले. काही वर्ष जकार्ताला राहून काही वर्षांपूर्वी हे दाम्पत्य भारतात परतले. शैक्षणिक असो, सामाजिक असो व राजकीय कार्य, प्रत्येक वेळी सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे हे त्यांना प्रोत्साहन देतात. २००६ पर्यंत सुप्रिया सुळे सक्रिय राजकारणापासून दूर होत्या. शरद पवारांची मुलगी यापलिकडं त्यांची राजकारणात फारशी ओळख नव्हती. २००६ मध्ये पहिल्यांदा सुप्रिया सुळे यांचं नाव राजकारणात चर्चेत आलं. राज्यसभेच्या रिक्त जागापैकी एका जागेवर सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत त्या विजयी झाल्या आणि सुप्रिया सुळे यांनी राजकारणात प्रवेश केला. सुप्रिया सुळे यांच्या राज्यसभेच्या निवडणुकीचा एक किस्सा शरद पवार नेहमी सांगतात. त्यांच्या आत्मचरित्रातही ही गोष्ट त्यांनी नमूद केलेली आहे. सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीच्या वतीनं उमेदवारी देण्यात आली. त्यांच्याविरोधात भाजपा-शिवसेना युतीच्या वतीनं उमेदवार दिला जाणार होता. सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीच्या वतीनं उमेदवारी देण्यात आली. त्यांच्याविरोधात भाजपा-शिवसेना युतीच्या वतीनं उमेदवार दिला जाणार होता. युतीचे निर्णय त्यावेळी ‘मातोश्री’वर व्हायचे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणतील तोच निर्णय इतका दबदबा बाळासाहेबांचा होता. निवडणूक जाहीर झाल्यानंतर शरद पवार बाळासाहेबांना भेटायला गेले. त्यांनी सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देत असल्याचं बाळासाहेबांना सांगितलं. बाळासाहेब म्हणाले, मग शिवसेना उमेदवारी देणार नाही. मध्येच शरद पवार म्हणाले, ‘पण भाजपाचं काय?’ बाळासाहेब म्हणाले, ‘कमळाबाईची चिंता नको करू, कमळाबाईला कसं पटवायचं ते मला माहिती आहे,’ असा शब्द बाळासाहेबांनी दिला. सुप्रिया सुळे बिनविरोध निवडून आल्या.
सध्या सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार म्हणून कार्यरत आहेत. एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. राष्ट्रीय राजकारणात यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचा असलेला गुण सुप्रिया सुळे यांच्याकडे आहे. त्यांचे हिंदी आणि इंग्रजी भाषेवर उत्तम प्रभुत्त्व आहे. त्यामुळेच संसदेत त्या कोणत्याही मुद्द्यावर सविस्तरपणे बोलू शकतात. या जोडीला त्यांच्याकडे अभ्यासू आणि संयमी वृत्ती आहे. त्यामुळेच सुप्रिया सुळे यांनी संसदेत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोळाव्या लोकसभेत सुळे यांनी सभागृहात ९६ टक्के उपस्थिती लावत १५२ चर्चासत्रांत सहभाग घेतला. त्यांनी एकूण ११८६ प्रश्न उपस्थित केले, तर २२ खासगी विधेयके मांडली. यासाठी त्यांना फाउंडेशनतर्फे दर पाच वर्षांनी देण्यात येणारा संसद महारत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याच बरोबरच चालू सतराव्या लोकसभेतही सुळे यांच्या कामगिरीतील सातत्य कायम असून त्यांनी ८९ टक्के उपस्थिती लावत १२२ चर्चासत्रात भाग घेतला आहे. सभागृहात एकूण २८६ प्रश्न त्यांनी विचारले असून चार खासगी विधेयके मांडली आहेत.
या कामगिरीसाठी सुप्रिया सुळे यांना सलग सहाव्यांदा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. या सोबतच दर वर्षी चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि इ- मॅगॅझिनतर्फे देण्यात येणारा संसद महारत्न पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना नुकताच मिळाला आहे. राज्यातील युवतींना पक्षासोबत जोडण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवती काँग्रेस सुरू करण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांना आपल्या वडिलांच्या प्रमाणेच चित्रकला, साहित्य, विज्ञान यासह इतरही अनेकविध सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये विशेष रुची आहे.
सुप्रिया सुळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply