नवीन लेखन...

तळ्याकाठचे निअँडरटाल

निअँडरटाल ही उत्क्रांतीदरम्यान निर्माण झालेली एक मानवसदृश प्रजाती आहे. आजच्या माणसाच्या उत्क्रांतीपूर्वी निर्माण झालेली ही प्रजाती, माणूस निर्माण झाल्यानंतरही दीर्घकाळापर्यंत अस्तित्वात होती. सुमारे चार लाख वर्षांपूर्वी ही प्रजाती निर्माण झाली आणि सुमारे चाळीस हजार वर्षांपूर्वी अस्तंगत झाली. माणसापेक्षा थोडीशी वेगळी शारीरिक ठेवण असणाऱ्या या प्रजातीचे व्यवहार बऱ्याच प्रमाणात माणसासारखेच होते. ते अग्नीचा वापर करीत होते, तसंच ते दगडी शस्त्रांचा वापरही करीत होते. निअँडरटालांचा शोध जर्मनीतील निअँडर खोऱ्यात लागल्यानं, ही प्रजाती निअँडरटाल म्हणून ओळखली जाते. या प्रजातीच्या अस्तित्वाचे पुरावे युरोपपासून मध्य आशियापर्यंत सापडतात. गेल्या वर्षीच्या जून महिन्यात संशोधकांना, एक लाख वर्षांपूर्वीच्या निअँडरटालांच्या अस्तित्वाचा एक वैशिष्ट्यपूर्ण पुरावा सापडला आहे. हा पुरावा आहे स्पेनमधील माटालास्कानास किनाऱ्यावरील, निअँडरटालांच्या एका मोठ्या घोळक्याचा!

दक्षिण स्पेनमधील डोनाना राष्ट्रीय उद्यानातील माटालास्कानास किनाऱ्यावर सन २०२० सालच्या जून महिन्यात अतिशय जोराचं वादळ आलं. या वादळामुळे व त्याच काळात आलेल्या मोठ्या भरतीमुळे इथला किनारा धुतला गेला आणि खालचा घट्ट झालेला वाळूचा थर उघडा पडला. या थराच्या पृष्ठभागावर, हरणं व रानडुकरांशी साधर्म्य असणाऱ्या पुरातन प्रजातींतील प्राण्यांचे ठसे असल्याचं प्राणिशास्त्रज्ञांना आढळलं. यानंतर दोन महिन्यांनी स्पेनमधील हुएल्वा विद्यापीठातील, पुरातन परिसंस्थांवर संशोधन करणाऱ्या एदुआर्दो मायोराल आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी ड्रोनच्या साहाय्यानं या जागेची छायाचित्रं घेतली. या छायाचित्रांचं निरीक्षण केल्यानंतर, संशोधकांना या ठिकाणी मानवी पावलांसारखे दिसणारे काही ठसेही आढळले. मात्र या पावलांना विशिष्ट वक्राकार होता, तसंच पावलांची खोट गोलाकार होती आणि पावलाचा पुढचा भाग छोट्या आकाराचा होता. अशी पावलं तर निअँडरटालांची असायची! म्हणजे इथे निअँडरटाल वावरले होते. त्यानंतर या संशोधकांनी संगणकाच्या साहाय्यानं, या ठशांच्या, लांबी, रुंदी, खोली, आकार, अशा विविध बाबींचं त्रिमितीय विश्लेषण केलं आणि इथे वावरलेल्या निअँडरटालांचं काल्पनिक चित्र उभं केलं. मायोराल आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे सर्व संशोधन शोधनिबंधाच्या स्वरूपात नुकतंच प्रसिद्ध झालं आहे.

मायोराल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना, घट्ट झालेल्या या वाळूच्या थरावर तब्बल छत्तीस निअँडरटाल ‘व्यक्तीं’च्या, एकूण सत्त्याऐंशी पावलांचे ठसे मिळाले. या पावलांची लांबी जास्तीत जास्त एकोणतीस सेंटिमीटर इतकी आहे तर, रुंदी जास्तीतजास्त तेरा सेंटिमीटर इतकी आहे. पावलांच्या आकारावरून या संशोधकांनी केलेल्या तर्कानुसार, निअँडरटालांच्या या घोळक्यात, निदान नऊ प्रौढ, पंधरा मोठी मुलं आणि सात लहान मुलं असावीत. यातील प्रौढांची जास्तीत उंची ही १.९ मीटरपर्यंत असावी. या घोळक्यात किमान पाच ‘पुरुष’ आणि चौदा ‘स्त्रिया’ असल्याचं, या निअँडरटालांच्या पावलांच्या स्वरूपावरून दिसून येतं. या घोळक्यातल्या लहान मुलांपैकी दोन मुलांच्या पायांचे ठसे अवघे चौदा सेंटिमीटर लांबीचे आहेत. ही दोन मुलं वयानं अगदी लहान असावीत – फक्त सहा वर्षांची!.

मायोराल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इथला वाळूचा थर अभ्यासून त्याचं स्वरूप जाणून घेतलं. इथल्या परिसरातले, अशा वाळूचे थर हे सुमारे एक लाख वर्षांपूर्वीचे असल्याचं, अगोदरच्या एका संशोधनातून स्पष्ट झालं आहे. यावरून ही पावलंसुद्धा सुमारे एक लाख वर्षांपूर्वी उमटली असल्याचा निष्कर्ष या संशोधकांनी काढला. ही जागा म्हणजे त्याकाळच्या एखाद्या तळ्याचा परिसर असल्याचं आढळलं आहे. या तळ्याचा काठ वाळूनं व्यापला होता. घट्ट झालेल्या या त्यावेळच्या वाळूचं स्वरूप आणि त्यावर आता जमा होणाऱ्या वाळूचं स्वरूप वेगळं आहे. तसंच या थराच्या पृष्ठभागावर क्षारांचे स्फटिक सापडले आहेत. क्षारांच्या या स्फटिकांवरून, इथे त्याकाळी अस्तित्वात असलेल्या तळ्याचं पाणी ताजं नसून, ते जमा झालेलं पाणी असल्याचं दिसून येतं. कदाचित एखाद्या खड्ड्यात पाणी साठून इथे तळं तयार झालं असावं आणि त्याच्या काठावर निअँडटालांचा हा घोळका येऊन गेला असावा. आज जरी ही जागा समुद्र किनाऱ्यावर असली तरी, त्या काळी आजचा हा समुद्र किनारा या जागेपासून काहीसा दूर – अधिक दक्षिणेकडे – असल्याचे पुरावे मिळाले आहेत.

निअँडरटालांची पावलं ही तळ्याच्या काठाकाठानं पुढे जात असलेली दिसत नाहीत. ही पावलं एकतर या तळ्याकडे जात आहेत किंवा तळ्यापासून दूर जात आहेत. निअँडरटालांचा मार्ग तळ्याच्या किनाऱ्याला सुमारे नव्वद अंशांचा कोन करतो. म्हणजे तळ्याजवळ आलेले हे निअँडरटाल यावेळी तरी प्रवासात नाहीत. ते तळ्याकाठी मुद्दाम आले असावेत. तळ्याच्या काठापर्यंत दिसणारी त्यांची पावलं, पाण्याच्या आत शिरत असलेलीही दिसत नाहीत. हे निअँडरटाल तळ्याच्या काठावरच थांबलेले दिसतात. निअँडरटाल ही मुख्यतः शिकारीवर जगणारी प्रजाती होती. त्यामुळे ते कदाचित खाद्य गोळा करण्यासाठी या तळ्याशी आले असावेत. मात्र या निअँडरटालांनी मोठ्या प्राण्याची शिकार केल्याचा पुरावा काही या वाळूच्या थरावरील खुणांवरून मिळाला नाही. तळ्यातले मासे पकडण्यासाठी, छोटे कवचधारी मृदुकाय प्राणी गोळा करण्यासाठी किंवा तळ्यावर येणाऱ्या पक्ष्यांची शिकार करण्यासाठी ते आले असावेत. कारण या परिसरातील निअँडरटालांच्या खाद्यात या गोष्टींचा समावेश असायचा. या ठशांच्या बाबतीतला एक वेगळाच भाग म्हणजे, ज्या सहा वर्षांच्या दोन छोट्या मुलांच्या पायांचे ठसे इथे आढळले आहेत, ते फक्त ठरावीक दिशेनंच गेलेले दिसत नाहीत. ते इकडेतिकडे विखुरले आहेत. यावरून या संशोधकांनी, ही दोघं लहान मुलं वाळूत खेळत असावीत, खेळताना ती इकडेतिकडे बागडत असावीत, असा एक सरळ साधा, पण मनोरंजक निष्कर्ष काढला आहे.

एदुआर्द मायोराल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, इथल्या परिस्थितीजन्य पुराव्यांचा आधार घेऊन, एक लाख वर्षांपूर्वीच्या या निअँडरटालांच्या जीवनक्रमातील एका छोट्याशा भागाचं चित्र रंगवण्याचा केलेला हा प्रयत्न आहे. हा प्रयत्न चित्तवेधक तर नक्कीच आहे, परंतु त्याचबरोबर तो महत्त्वाचाही आहे. कारण अशा प्रयत्नांतूनच लाखो वर्षांपूर्वीच्या मानवसदृश प्रजातींच्या जीवनशैलीची कल्पना येऊ शकते.

चित्रवाणीः https://www.youtube.com/embed/FMc81qpCQ3g?rel=0

— डॉ. राजीव चिटणीस.

छायाचित्र सौजन्य: Charles R. Knight – Wikimedia, Mayoral, et al. 2021

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..