मानव अभिव्यक्तीप्रधान प्राणी आहे. आपले अस्तित्व सिध्द करण्यासाठी त्याची धडपड असते.ते झाले तर जीवनात सफलता येते. जगण्यात जीवंतपणा येतो. आपली संस्कृती जतन करता येते. भावभावना आणि सृजनाचा मुक्त आविष्कार होत असतो. प्रबोधन होते. संस्कार होतात. समाज घडतो. सामाजिक घडामोडींचे प्रतिबिंब साहित्यात उतरत असते. तद्वतच साहित्य जगण्याचे नवे भान देते. वेदना, आक्रोश, प्रेम, शौर्य, विद्रोह, हर्ष यासम विविध भावभावना साहित्यातून व्यक्त होत असल्याने रंजकतेबरोबरच ज्ञानसंवर्धनाचीही जबाबदारी साहित्याची असते. गद्य आणि पद्य साहित्य परिवर्तन घडवून आणते.साहित्याने क्रांती घडविलेली आहे. हे साहित्य शहरी भागात जसे विकसित पावते तसे खेड्यात, ग्राम्य वातावरणातही निर्माण होते. शहरातील साहित्य निर्मितीवर चर्चा होते.समीक्षणात्मक लेखन होते.लेखकाची नोंद घेतली जाते. पुरस्कार, मानसन्मान, प्रेरणा मिळते. प्रकाशक मिळतात. पुस्तके छापली जातात.लेखक नावारूपास येतात.एकंदरीत काय तर लेखक घडविला आणि घडला जातो.प्रसारमाध्यमे आणि नियतकालिकांचा योग्य वापर करून घेतला जातो. साहित्य संमेलने भरविली जातात. त्यास प्रायोजक व्यक्ती, संस्था मिळतात. त्यामुळे लेखकास मंच मिळतो. हे साहित्य योग्य घटकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. येथील बालकुमार वाचक , प्रौढ वाचक मोठ्या प्रमाणात साक्षर असतात. घरी विद्या , ज्ञानप्राप्तीचे धडे मिळत असल्याने वाचक ज्ञानी असतो.तेथील समाजाच्या आचार विचारांचा प्रभाव लेखन साहित्यात जाणवतो.नियतकालिके शहरी साहित्य जास्त प्रमाणात स्वीकारतात.कारणही तसेच असते. वाचकाभिमुख साहित्य निर्माण होते. साहित्यात जे विविध प्रवाह आहेत त्यात दलित , ग्रामीण, स्त्रीवादी आणि नागरी साहित्य यांचाही समावेश होतो. मात्र ग्रामीण साहित्याला आता अडथळय़ाची शर्यत पूर्ण करावी लागते.
ग्रामीण भागातही साहित्य संमेलने भरवली जातात. सर्व समूह त्यात सहभागी होत असतात.एकतर साहित्य म्हणजे काय असते याचा परिचय ग्रामस्तरावर खूप कमी लोकांना असतो. ते फक्त मनोरंजन या दृष्टिकोनातून त्याकडे पाहतात. कथा, कादंबरी, कविता, चरित्र, नाट्य, यांना डिजिटल युगातील स्थान शोधावे लागते. वाचन संस्कृती ही धार्मिक ग्रंथ वाचन आणि पारायण यापलिकडे जायला तयार नाही. शिक्षणाचा प्रभाव आता जाणवू लागला आहे. परिणामस्वरूप आता काही ठिकाणी साहित्य संमेलने भरत आहेत हे सुचिन्ह आहे. मंगळवारपासून सोयगावमध्ये मराठवाडा साहित्य संमेलन होत आहे.हे संमेलन सर्वार्थाने यशस्वी होईल, यात शंका नाही.मराठवाडा साहित्य परिषदेची साहित्य संमेलने ही अधिकाधिक शहरवजा खेड्यातच होत आहेत. अशा साहित्य संस्थांनी पुढाकार घेऊन साहित्याचा ग्रामजागर भरवावा. गावखेड्याची सांस्कृतिक भूक खूप मोठी आहे. ती या व्यवस्थेने पूर्ण करावी.ती त्यांची जबाबदारी आहे. या संमेलनाचा मांडव अनेक मानापमान नाटकांनी रंगतो. साधनांची कमतरता असते. साहित्याचे अंग कमी आणि बिघाडीची हमी जास्त अशी गत असते.
राजकीय पार्श्वभूमीही यास लाभलेली असते.त्यामुळे आयोजनास कुणी धजावत नाही. ज्यांची शाळा, महाविद्यालये आहेत अशी मंडळी राबता असल्यामुळे संमेलन आयोजनाचे धाडस करतात. महागाईच्या काळात साहित्य जोपासणो अवघड होऊन जाते.त्यातच इंग्रजी भाषा आक्रमणाचा हा काळ आहे. इंग्लिश स्कूल नावाचा नवीन व्यवसाय रूळत आहे. त्यांची सेवावृत्ती की मेवावृती हाही एक प्रश्न आहे. त्या मार्गाने मराठी साहित्य संवर्धन होईल का हे येणारा काळच ठरविल.
गावखेड्यात एखादा दुसरा कवी, लेखक असतो.जीवनाशी निगडीत, परिसराचे चित्रण तो मांडत असतो. त्याची धडपड असते ती आपले साहित्य वाचकांपर्यंत जावे ही. पण त्यास आवश्यक त्या संधी मिळत नाहीत.मातीतून उगवलेले साहित्य पीक करपण्याचीच शक्यता अधिक. प्रकाशन संस्था आणि त्यांचे व्यवहार या विषयी अनेक अनुभव आहेत.
कविता, कथा वा कादंबरी लिहिली तरी प्रकाशित करण्यासाठी शहरातच यावे लागते. कितीतरी दज्रेदार लेखन करणारे लेखक असे आहेत की ते त्यांचे पुस्तक प्रकाशित करू शकत नाहीत.काहींनी तर लिहिणो हा छंदच सोडून दिला आहे. काही फेसबूक , व्हॉट्सअँप, हाईक, गुगल, इन्स्टाग्राम अशा माध्यमांपुरतेच र्मयादित असतात. तिथेच अभिव्यक्त होतात.
साहित्य निर्मिती आणि त्यावरील चर्चा, समीक्षा हा विषयच वेगळा आहे.तो दुर्मिळ आहे. असे असले तरी आसाराम लोमटेंच्या आलोकचा साहित्य अकादमी पुरस्कार ही घटना या मातीचेच पीक आहे. तसे कसदार साहित्य निर्माण होते पण त्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण होणो ही खरी गरज आहे. खेड्यात संमेलनास खूप चांगला प्रतिसाद मिळतो. नाविन्यता असते.
गावपरिसरातील उत्तम परंपरा लोकसाहित्य याचे प्रतिबिंब या संमेलनात उमटावे. नविन लेखकांना लिहीते करणो .म्हणजे प्रस्थापित लेखकांनी नवे लेखक घडवावेत आणि सुजाण वाचकांनी, रसिकांनी वाचक घडवावेत. वाचकांना वाचण्यास प्रेरीत करणो या साठी ग्रामसाहित्य संमेलने महत्वाचे कार्य करतात. मोठय़ा संमेलनापेक्षा छोटे साहित्यिक उपक्रम अधिक भर घालतात. प्रभावी ठरतात. लेखनावर चर्चा होते. भाषिक सौंदर्य अधिक खुलते.
शासन अन्य मराठी साहित्य संमेलनास अनुदान देते. ते अधिकाधिक ग्रामस्तरावर द्यावयास हवे. जिल्हास्तरावर ग्रंथोत्सव जसे होतात तसे तालुकास्तरावर , ग्रामस्तरावर उत्सव आयोजित करावेत. योग्य उपक्रमास, संमेलनास पाठबळ मिळावे. जेणोकरून ग्रामसाहित्य संवर्धनासाठी हातभार लागेल . बालकुमार, महिलांसाठी साहित्यनिर्मितीसह संमेलनाची गरजच आहे. ग्राम साहित्य संमेलनाचा मांडव, वर्हाडी आणि लगीनघर सजले तरच भाषेचे तोरण शोभून दिसेल.
विठ्ठल जाधव
मो – ९४२१४४२९९५
पुण्यनगरीमधील लेख.. लेखकाच्या अनुमतीने पुनर्प्रकाशित
Leave a Reply