
२००३ ते ते 1७ जून २०१९ या कालखंडामध्ये माओवादी हिंसाचारामध्ये ४२७७ हिंसक प्रसंगांमध्ये ३३३९ नागरिक,२१९६ सुरक्षा कर्मचारी आणि ३३६७ माओवादी मिळून ९१३७ ठार झाले. म्हणजेच हिंसाचाराच्या दृष्टीने माओवादग्रस्त भागामध्ये होणारा हिंसाचार हा काश्मीर किंवा ईशान्य भारताच्या हिंसाचारा पेक्षा तेव्हा कितीतरी जास्त असतो. तरीपण हा हिंसाचार जंगलामध्ये होत असल्यामुळे मीडियाचे याकडे पुरेसे लक्ष नसते.
१३ जुन २०१९ला कांकेर येथे सुरक्षादलांची माओवाद्यांसोबत चकमक झडली. ठार केलेल्या दोन माओवाद्यांकडून पाकिस्तानी बनावटीच्या रायफल्स मिळाल्या. दंडकारण्यात अनेक वर्षे दहशत माजवणारी नर्मदाक्का अखेर पोलिसांच्या तावडीत सापडली आहे. तिच्यावर खून आणि हत्याकांडासारखे इतके गंभीर गुन्हे आहेत की, आता तिला जामीनही मिळणे अशक्य आहे. त्यातच, नर्मदाक्काची तब्येत बरी नसते. तिच्या अटकेने माओवादी चळवळीला मोठा हादरा बसला आहे. ती माओवाद्यांच्या महिला आघाडीची प्रमुख होती.
नर्मदाक्काचे मूळ नाव अलुरी उषाराणी. आंध्र प्रदेशात कृष्णा जिल्ह्यातील गुडीवाडा हे तिचे मूळ गाव. १९९५च्या आधीच माओवादी चळवळीत सक्रिय झाल्यानंतर तिने नर्मदाक्का हे नाव घेतले. माओवादी चळवळीत क्रूर कारवाया करणाऱ्या महिला गुन्हेगारात नर्मदाक्काचे नाव अग्रभागी आहे. तिने मद्रास विद्यापीठात एमए केले आहे. माओवादी चळवळीत गेल्यानंतर नर्मदाक्काकडे वेगाने नवनव्या जबाबदाऱ्या येत गेल्या. दलममध्ये आल्यानंतर नर्मदाक्कावरील जबाबदारी वेगाने वाढत गेली. स्थानिक समिती, झोनल समिती करत करत ती दंडकारण्यातील महिला नक्षलींची प्रमुख बनली.
५२ मोठ्या गुन्ह्यांमध्ये संशयित
छुपे व छापामार पद्धतीचे हल्ले करण्यात नर्मदाक्का तरबेज होती. लोकसभेच्या प्रचारात दांतेवाडा येथे भाजप आमदार व इतर पाच जणांचा माओवादी हल्ल्यात मृत्यू झाला होता. या हल्ल्याचा कटही नर्मदाक्कानेच आखला होता. अशा हत्याकांडांचा कट रचायचा आणि तो अमलात आणायचा, यासाठी नर्मदाक्का कुख्यात आहे. तिच्यावर अनेक राज्यांचे मिळून पन्नास लाखांचे इमान होते. आजवर किमान ५२ मोठ्या गुन्ह्यांमध्ये संशयित म्हणून नर्मदाक्काचे नाव आहे.
नर्मदाक्काचा नवरा किरणकुमार हाही कट्टर माओवादी आहे.तोही १५ जुनला पोलिस कारवाईत सापडला. त्याचे उच्च शिक्षण आयआयटीमध्ये झाले आहे. तो जितका बुद्धिमान तितकाच क्रूरही आहे. नर्मदाक्का आणि त्याने मिळून अनेक हत्याकांडे यशस्वी केली आहेत. माओवाद्यांचा प्रचार करण्याची आघाडीही किरणकुमारने बराच काळ सांभाळली. तो आणि नर्मदाक्का हे गेली किमान २५ वर्षे भूमिगत राहण्यात यशस्वी झाले.नर्मदाक्का आणि तिचा नवरा गेले सहा महिने हैदराबादमध्ये लपून नर्मदाक्कावरील उपचार करत होते. तेव्हापासून त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली आणि अखेर अटक करण्यात आली.
माओवादी संघटनात सर्वसामान्य स्त्री जीवन भयंकर विदारक
नर्मदाक्का जरी दंडकारण्यातील महिला माओवाद्यांची प्रमुख होती तरी ती माओवादी संघटनांमध्ये होणारे स्त्रियांवर अत्याचार आणि माओवाद्यांकडून माओग्रस्त भागामध्ये स्त्रियांवर होणारे अत्याचार थांबवू शकली नाही.माओवादी संघटना असं एक क्षेत्रं आहे की, जिथे महिला आजही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहेत. पण त्यांचं तिथलं ते जीवन सर्वसामान्य स्त्रीपेक्षाही भयंकर विदारक आहे. आदिवासी स्त्रिया पूर्वीसारख्या सुरक्षित नाहीत. शतकानुशतकं, शांतपणे जीवन जगणाऱ्या आदिवासी प्रदेशात माओवाद्यांनी जेव्हापासून शिरकाव केला, त्यावेळेपासून तिथलं सर्वसामान्य समाजजीवन उध्वस्त झालं आहे. आदिवासी स्त्रियांच्या वेगळयाच प्रकारच्या, गंभीर समस्या आहेत. या समस्यांचं निराकरण करण्याचे मार्ग कोणते, त्याचाच विचार करणं आवश्यक आहे.
माओवादी संघटनांमध्ये स्त्रीचं काय स्थान आहे?. सर्वच प्रकारच्या अन्याय, अत्याचाराच्या विरोधात आणि शोषणाच्या विरोधात सतत ओरड करणाऱ्या माओवादी संघटनांमधील स्त्रियांची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेतली तर माओवाद्यांची उक्ती आणि कृती यातील तफावत लक्षात येते.
असंख्य आदिवासी मुली/स्त्रिया भरडल्या जातात
माओवादी संघटनेत अनेक वर्ष राहून, नंतर शरण आलेल्या काही माओवादी महिलांची हकीकत त्यांच्याच तोंडून ऐकल्यानंतर अंगावर काटा येतो. शरण आलेल्या महिला माओवाद्यांना शोधून काढणं आणि त्यांना बोलतं करणं हे काम कठीण आहे. शरणागती पत्करलेल्या महिला पोलिसांच्या खबरी म्हणून काम करत असल्याचा माओवाद्यांना संशय असतो. याच संशयापोटी त्यांची हत्या करण्यात येते.
माओवादी चळवळीच्या व्यूहरचनेप्रमाणे मुलींची संघटनेत खालच्या पातळीवर मोठया प्रमाणात भरती केली जाते. पोलीसांबरोबर झालेल्या चकमकींमध्ये माओवादी संघटनेच्या मुलींना मुद्दाम आघाडीवर ठेवलं जातं. चकमकीत स्त्रियांचा मृत्यू झाला तर माओवादी संघटनेतील पुरुष पोलीस आदिवासी स्त्रियांना मारत आहेत अशी बोंब उठवतात.असंख्य आदिवासी मुली/स्त्रिया अकारण भरडल्या जातात.
स्त्रियांच्या हक्कांच्या बळी
गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक गावातून घरटी एक मुलगा किंवा मुलगी चळवळीत सामावून घेण्याची सक्ती माओवाद्यांकडून केली जाते. मुलींना तर उचलून नेऊ अशी धमकी देणारे माओवादी नव्या पिढीला कारवायांचे बाळकडू वयाच्या आठव्या वर्षापासून देत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.
पोलिसांची छावणी ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी पोलिसांना भाजीपाला, दूध, पाणी इत्यादी दैनंदिन वस्तू पुरवणाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी त्यांच्या घरातील तरुण मुली-बायकांना माओवादी पळवून नेतात. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांतील छोटे व्यापारी, किराणा दुकानदार यांच्याकडील स्त्रिया माओवाद्यांनी पळवून नेलेल्या आहेत,आजही हे सत्र सुरू असावे. काहींना लैंगिक शोषणानंतर गर्भधारणा झाल्यास किंवा कंटाळा आल्यास वर्ष, सहा महिन्यांनी सोडून दिले जाते तर काही कायमच्या अदृश्य होतात. माओवाद्यांच्या धाकाने कुणीही पोलिसांत जाण्याची हिंमत करत नाही. या भागातील मानवी हक्कांच्या आणि स्त्रियांच्या हक्कांच्या संदर्भात कार्य करणाऱ्या संघटनांना, माओवाद्यांचे वकीलपत्र घेणाऱ्यांना, स्थानिक वृत्तपत्रांना वर उल्लेखिलेल्या बाबी ठाऊक नाही असे म्हणणे धारिष्टयाचे होईल. या विरुद्ध यापैकी कुणीही आवाज उठवणार नाही कारण हे सर्व माओवाद्यांच्या प्रभावाखाली आणि माओवाद्यांच्या बाजूने काम करीत आहेत. स्थानिक जनता व पोलिसांना या सर्व बाबींची खडान्खडा माहिती आहे. पण जनता माओवाद्यांच्या धाकाने तर पोलीस, राज्यकर्त्यांची काही करण्याची इच्छा नसल्यामुळे काही करू शकत नाही.
आत्मघातकी वाटेवर महिला आणि मुले
माओवाद्यांच्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये 30 टक्के महिला आहेत. महिलांना जेवण बनवणे, घरकाम यात गुंतवले जाते. वरिष्ठ माओवादी स्वतःच्या सुरक्षेसाठी महिलांना बॉडीगार्ड म्हणून नियुक्त करतात. म्हणजे त्यांचा गैरवापर करणे सोपे होते.
माओवाद्यांच्या माहितीप्रमाणे हजारो महिला माओसंघटनात सामील आहेत. जास्तीत जास्त महिलांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडायला हवे. जोपर्यंत माओ चळवळीचा पुरता बीमोड होणार नाही तोपर्यंत महिलांचे भोग सुटणार नाहीत.
अनेक लहान मुलांना पण माओ चळवळीमध्ये सामील केले आहे. मुलांच्या तुकड्या माओवाद्यांना उपयुक्त ठरतात. कारण त्यांच्या लहान वयामुळे त्यांच्यावर संशय घेतला जात नाही. या मुलांच्या मार्फत सुरक्षा दलाच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाते, शस्त्रे आणि पैशांचा पुरवठा केला जातो. अनेकदा या लहान मुलांचा उपयोग भूसुरुंग पेटविण्यासाठी केला जातो.
महिलाच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना
माओवादग्रस्त भागांतील महिलाच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याच्या घोषणा केंद्र आणि राज्य सरकारांनी अनेकदा केल्या; पण त्या पूर्ण करण्याबाबत फारसे काहीच झाले नाही. आगामी काळामध्ये ग्रामसुरक्षा समित्यांची निर्मिती करण्यावर शासनाने भर द्यावा. अशा समित्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून निर्माण कराव्यात. माओवादी हिंसाचारापासून सामान्यांचे रक्षण गाव सुरक्षा दलेच करू शकतात. प्रत्येक गावात काश्मीरप्रमाणे गाव सुरक्षा दले (Village Defence Council) तयार करावी लागतील. त्यांना होमगार्ड, निवृत्त सैनिक आणि पोलिसांची मदत मिळू शकते. तसे झाले तरच सुरक्षेची भावना वाढू शकेल.
सर्वसामान्य नागरिकांची जबाबदारी
पोलिस आणि गुप्तचर संस्थांनी माओग्रस्त भागांमध्ये एक सर्वेक्षण/तपासणी करून किती मुली आणि बायकांना माओवाद्यांनी पळवून नेले आहे याची माहिती एकत्र करावी. यानंतर अर्थातच त्यांना माओवाद्यांच्या तावडीतुन सोड्वण्याचा पूर्ण प्रयत्न सरकार आणि सुरक्षा दलांनी करावा.
लोकशाहीमध्ये माओवाद्यांशी लढणे हे देशभक्त सामान्य नागरिकांचे पण काम आहे. माओवादी हिंसाचाराच्या मागे उभ्या राहणाऱ्या तथाकथित मानवतावाद्यांचा पर्दाफाश करावा लागेल.
2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत पक्षांच्या जाहीरनाम्यांमध्ये माओवाद्यांविरुद्ध एक अक्षर लिहीले गेले नव्हते. 2019 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये माओवाद्यांना विरोध हा निवडणुकीमध्ये महत्त्वाचा विषय बनला पाहिजे.
— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
Leave a Reply