नीला सत्यनारायण यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९४९ रोजी मुंबई येथे झाला.
नीला सत्यनारायण यांचे वडील वासुदेव आबाजी मांडके हे पोलीस खात्यात होते. नीला सत्यनारायण या १९७२ च्या बॅचच्या सनदी अधिकारी होत्या. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त राहिल्या होत्या.
नीला सत्यनारायण यांच्या आपल्या सनदी अधिकारपदाच्या ३७ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी मुलकी खाते, गृह खाते, वनविभाग, माहिती आणि प्रसिद्धी खाते, वैद्यक, समाजकल्याण, ग्रामीण विकास यांसारख्या अनेक खात्यांत प्रमुख पदांवर काम केले. लोकप्रिय सनदी अधिकरी म्हणूनही त्यांची ओळख होतीच. आपल्या रुक्ष आणि अतिशय धकाधकीच्या कामात व्यग्र असतानाही त्यांनी आपली संवेदनशीलता जोपासली, वाढवली आणि लेखनातून त्या व्यक्त होत राहिल्या. कवयित्री म्हणून त्या अधिक परिचित असल्या, तरी याशिवाय त्या लेखिका पण होत्या. त्यांचे स्तंभलेखनही अनेकांना आवड असे.
त्यांनी मराठीत सुमारे १५० हून अधिक कविता लिहिल्या असून, त्यांनी काही मराठी चित्रपटांसाठी आणि दोन हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले होते. नीला सत्यनारायण यांच्या कथेवरून ‘बाबांची शाळा’ हा मराठी चित्रपट निघाला होता. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन त्यांनीच केले होते. नीला सत्यनारायण यांच्या ‘ऋण’कादंबरीवर आधारित समीर सुर्वेला यांनी ‘जजमेंट’हा मराठी सिनेमा बनवला. २०१९ मध्ये ‘खऱ्याखुऱ्या गोष्टी’ हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला होता.
सनदी सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही त्या समासेवेत कार्यरत होत्या. अनेक कार्यक्रम, महिलांविषयी उपक्रम आदी कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती असायची. त्यांचे भाषण ऐकणे हे उपस्थितांसाठी एक पर्वणी असायची. त्या चांगल्या वक्त्याही होत्या.
एका मुलाखतीदरम्यान, त्यांनी सांगितलं होतं की, “लहानपणापासूनच रंगमंचावर काम करण्याची माझी इच्छा होती. मात्र, आयएसआय होण्यासाठीचे बळ पतीने दिले आणि त्यामुळे आयएसआय झाले.”. स्पष्टवक्तेपणा आणि सडेतोड मत मांडण्याबाबत त्या प्रसिद्ध होत्या. ‘आरोही’ या कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी गरीब, गरजू व खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीचे तंत्र शिकवण्याचे, त्यांचे व्यक्तिमत्व घडवण्याचे काम नीला सत्यनारायण यांनी हाती घेतला होता.त्यातून त्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी अनेक गरीब, गरजू व खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीचे तंत्र शिकवण्याचे, त्यांचे व्यक्तिमत्व घडवण्याचे काम केले.
नीला सत्यनारायण यांना चारित्र्य प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रीय चारित्र्य पुरस्कार, २०१५ साली टाकीचे घाव या पुस्तकाला कोकण मराठी साहित्य परिषदेचा ललित गद्यासाठीचा अनंत काणेकर स्मृती पुरस्कार, असीम या हिंदी कविता संग्रहाला केंद्र शासनाचा अहिंदी भाषी लेखक पुरस्कार, अमेरिकेतल्या मेरीलँड येथील ‘इंटरनॅशनल लायब्ररी ऑफ पोएट्री’चे इंग्रजी कवितेसाठीचे एडिटर्स पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले होते.
नीला सत्यनारायण यांचे १६ जुलै २०२० रोजी निधन झाले.
Leave a Reply