इस्रायल कॅलेंडर प्रमाणे वर्षाच्या या पहिल्या दिवसाला ‘नवरोज’ म्हटले जाते. नवरोजचा अर्थ जणू सृष्टी नवीन हिरवा शालू अंगावर पांघरुन स्वागताला उभी आहे. पारशी नववर्ष हे इराणी किंवा ‘शहनशाही कॅलेंडर’ प्रमाणे साजरे केले जाते. या कॅलेंडरची निर्मिती पर्शियन राजा जमशेद यांने केली होती. नवरोज हा दिवस झोराष्ट्रीयन वर्षाचा पहिला दिवस आहे. ही दिवस म्हणजे पारशी आणि इराणी समुदायामध्ये शांती आणि मैत्रीची भावना वाढवणारा दिवस असतो.
पारसी समाजात नवरोज साजरा करण्याची परंपरा सुमारे पश्चिम आशिया, मध्य आशिया, काकेशस, ब्लॅक सी बेसिन आणि बाल्कनमध्ये ३ हजार वर्षांपूर्वी सुरू झाली होती. जमशेदी नवरोज, नवरोज आणि पतेती या नावांनीही हा उत्सव साजरा केला जातो.
ग्रेगरी कॅलेंडरनुसार, पतेती किंवा नवरोज वसंत ऋतूमध्ये साजरा केला जातो. पारशी समाज मूळचा इराण या देशातील. या देशाचे पूर्वीचे नाव म्हणजे पर्शिया, पारशी लोकांचे वास्तव्य असलेला देश. पण चौदाव्या शतकात इराणमध्ये धर्म परिवर्तनाचे वारे सुरु झाले आणि पारशी लोकांवर अत्याचार करण्यात येऊ लागला. त्यामुळे पारशी समुदायाने तो देश सोडला. यापैकी मोठा समुदाय हा भारतात आला आणि मुंबईत वास्तव्य करु लागला.
आजच्या दिवशी पारसी समाजबांधव नवीन कपडे परिधान करून अग्यारीमध्ये जाऊन प्रार्थना करतात. तसंच एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात.
या दिवशी पारसी समाजातील बांधव पंचपक्वान्न तयार करतात. नातेवाईक, मित्रमंडळींना घरी बोलावतात. भोजनाचा एकत्रित आस्वाद घेतात. त्यांना भेटवस्तूही देतात. मित्रमंडळींचे आभार मानले जातात.
या दिवशी अग्यारीत जाऊन प्रार्थना म्हटल्या जातात आणि खास पारशी भोजनाचा आस्वादही घेतला जातो.
महात्मा गांधी पारशी बांधवांविषयी म्हणाले होते की हा समाज भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत फक्त ०.००७% आहे. पण, त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. स्वातंत्र सैनिकांपासून ते उद्योजकांपर्यंत पारश्यांनी आपले वर्चस्व सिध्द केले आहे. देशाच्या विकासात पारशी समुदायाचे मोठं योगदान आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासून पारशी समुदायाची लोकसंख्या घटत असून ती एक चिंतेची बाब ठरत आहे. त्यांची लोकसंख्या वाढावी म्हणून भारत सरकारने जियो पारशी ही योजना सुरु केली आहे. त्यामुळे पारशी समाजाला भारतीय कायद्याप्रमाणे दोन अपत्यांचं बंधन लागू होत नाही.
पारसी जेवण हे गुजराती आणि इराणीयन खाद्य संस्कृतीचा मिलाप आहे. पारसी जेवणात मुख्यत: भात आणि दालचा (घट्ट वरण) समावेश आहे. पारशी लोकं मांसाहाराचा वापरही मोठ्या प्रमाणात करतात. त्यामध्ये पात्रानू मच्छी, धनसाक, चिकन फर्चा, सली मूर्गीसारख्या पदार्थांचा सामावेश आहे. अंडी आणि अंडयाचे पदार्थ हे त्यांच्या नाश्यात असतात. स्क्रॅम्ब्ल्ड एग, पारसी आकूरी, पोरो हे काही लोकप्रिय पदार्थ. गोडात त्यांना शिरा, शेवया, फालूदा, कूल्फी अधिक आवडतात.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply