नवोदित कवी आदित्य दवणेचा जन्म २२ जून १९९३ रोजी झाला.
आदित्य दवणे हे ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे यांचे चिरंजीव होत.आदित्य दवणे यांनी मार्केटिंगमधून एम. बी. ए. केलं आहे तसेच सध्या ते केळकर महाविद्यालय आणि आनंद विश्वगुरुकुल या रात्र महाविद्यालयामध्ये एच. आर व मार्केटिंग या विषयाचे अध्यापन करतात.
अनेक वर्षांपासून कविता आणि विविध विषयांवर आदित्य दवणे वैचारिक लेखन करीत आहेत. नातवंडांच्या कविता हा सामाजिक जाणीव असलेला कार्यक्रम (वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसाठी कवितावाचन) आदित्य दवणे यांच्या संकल्पनेतून सुरू झाला असून मुंबई, पुणे, गोवा येथे या कार्यक्रमांचे प्रयोग सादर झाले आहेत. यापूर्वी त्यांनी ‘युवा बोध’ हे तरुणांसाठी दासबोधाचे त्यांच्या भाषेत निरूपण करणारे सदर ‘मटा नाशिक’मध्ये संपूर्ण वर्षभर लिहिले आहे. लोकसत्ता वर्तमानपत्रात व्हिवा, रविवार वृत्तांत या पुरावण्यांसाठी त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे तसेच विविध मासिकातून त्यांच्या कविता, लेख यांना प्रसिद्धी मिळालेली आहे. काव्यहोत्र, कालाघोडा फेस्ट, किताबखाना, काव्यरसिक मंडळ सुवर्ण महोत्सव आणि अनेक ठिकाणी जाहीर काव्यवाचन त्यांनी केले आहे. विविध मासिकांतून कविता, लेख प्रसिद्ध झाले आहेत. आदित्य दवणे यांनी ‘द पॉइंटरी क्लब’ हा नवोदितांसाठी मंच खुला करून प्रस्थापित व नवोदित यांचा संगम घडवणारा कवितांचा कट्टा ठाण्यात सुरू केला आहे.
२०१७ मध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (कोमसाप) वतीने नवोदित लेखक, कवींसाठी दिला जाणारा ‘सुलोचना मुरारी नार्वेकर लक्षवेधी पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply