व्यास क्रिएशन्सच्या चैत्र पालवी 2019 या अंकात मिलिंद भागवत यांनी लिहिलेला लेख.
गेल्या काही काळात माध्यमांचं गारुड समाजमनावर वाढत चाललं आहे. या माध्यमामध्ये सर्व प्रकारचा सोशल मीडिया आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, टीव्ही माध्यम अन् त्यातही बातम्या.. टीव्ही माध्यमात खरंतर मनोरंजन वाहिन्यांचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. पण काही महत्त्वाचं घडत असेल किंवा निवडणुका असतील तर वृत्त वाहिन्यांचं महत्त्व अचानक वाढतं. ते स्वाभाविक आहे.
बातम्या समाजापर्यंत पोहोचवणारे सर्व घटक म्हणजे वृत्तपत्र, आकाशवाणी, वृत्तवाहिन्या, वेबसाईट आणि अलीकडच्या काळात यू ट्यूब, व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम. यातली वृत्तपत्र परंपरा खूप मोठी आहे. आकाशवाणी काळाच्या ओघात थोडी थांबली किंवा मागे पडलासारखी झाली आहे. जेव्हा वाहिन्या, युट्यूब इ. गोष्टी नव्हत्या तेव्हा लोकांना माहिती, बातम्या मिळण्याचा एकच विश्वासार्ह मार्ग होता, वृत्तपत्र.. पुढे काळ बदलला, टीव्ही आला.. त्यावर बातम्या सुरू झाल्या.. माणूस घडलेल्या घटनेच्या दृष्यासह बातम्या द्यायला लागला, काय म्हणाले ते घटनास्थळावरून प्रत्यक्ष दिसू लागलं आणि सगळेच जणं टीव्हीच्या मनोरंजनाबरोबरच बातम्यांच्या सुद्धा प्रेमात पडू लागले. प्रत्यक्ष दृश्य दिसू लागल्यामुळे त्याची विश्वासार्हता वाढू लागली.. पूर्वी पेपरला छापून आले म्हणजे खरं असं म्हणणारी लोकं पुढे हेच वृत्त वाहिन्यांच्या बाबतीत म्हणू लागले. लोकांचा वृत्तवाहिन्या, त्यांचे प्रतिनिधी, वृत्त निवेदक यांच्यावर एक विश्वास बसला. अशा वाहिन्यांवर आपल्या विचारांना स्थान मिळतंय असं वाटू लागलं आणि वृत्त वाहिन्या आणि लोकांचं नातं आणखी दृढ झालं..
कधी सुरू झाला अविश्वास?
अनेक वर्ष वाहिन्या आणि लोकांचा विश्वास यांचं अतूट नातं होतं. पण ज्या दरम्यान वृत्तपत्रांच्याबद्दल पेड न्यूजची चर्चा सुरू झाली, त्याच दरम्यान वाहिन्या आणि अविश्वास हा विषय सुरू झाला. साधारण १० वर्षांपूर्वी पेड न्यूजच्या विषयाने वृत्तपत्र जगत हादरलं.
सर्वोच्च न्यायालयापर्यंत खटला चालला, नंतरच्या निवडणुकांच्या दरम्यान वृत्तपत्रांसाठीसुद्धा काही नियम आले. तशाच पद्धतीने वाहिन्यांसाठी सुद्धा काही नियम आले. काही बंधनं वाहिन्यांनी सुद्धा स्वत:हून घालून घेतली. पण वाहिन्यांच्या विश्वासार्हतेवर पहिलं भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं. ते संसदेतल्या २००८ च्या ‘कॅश फॉर व्होट’ प्रकरणाने. लोकसभेत सरकार टिकवण्यासाठी पैसे दिले – घेतले गेल्याचा आरोप झाला. भाजपाच्या खासदारांना मत देण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप झाला. थेट लोकसभेच्या सभागृहातच हे पैसे आणले गेले आणि देशभर हाहाकार उडाला. यानंतर काही राष्ट्रीय वाहिन्यांनी स्टिंग ऑपरेशन केली. ज्यात लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचं स्टिंग झालं आणि पुन्हा एकदा खळबळ उडाली. २००० पासून पुढच्या दशकभरात वृत्तवाहिन्यांमध्ये स्टिंग ऑपरेशनचं पेव फुटलं आणि अशा स्टिंगचा उपयोग भल्या बरोबरच बुऱ्या गोष्टींसाठी होऊ लागल्याचं समोर आलं. खंडणी, पैसे कमावणे, वैयक्तिक फायदे उपटणे, धमकावणे अशा गोष्टी पुढे आल्या. यामुळे लोकांचा माध्यमांवरचा विश्वास कमी झाला.
फोन प्रकरणाने कळस गाठला
२००८ मध्ये देशाच्या राजकारणात आणि वृत्तमाध्यमांमध्ये खळबळ उडवणारी आणखी एक बातमी आली. ती म्हणजे नीरा राडीया प्रकरण. व्यापार आणि राजकीय क्षेत्रात लॉबिंग करणाऱ्या नीरा राडीया यांनी विविध राजकारणी, व्यावसायिक, पत्रकार अशा अनेकांना केलेले सुमारे ३०० पेक्षा जास्त फोन कॉल आयकर विभागाने एका चौकशी दरम्यान टॅप केले. यामध्ये राजकारणी, पत्रकार आणि उद्योजकांचे लॉबिंग समोर आलं. यामध्ये दिल्ली स्थित बरखा दत्त, प्रभू चावला, एम. के. वेणू, वीर संघवी, नाविका कुमार अशा बड्या पत्रकारांनी मंत्र्यांकडे लॉबिंगसाठी केलेले कारनामे उघड झाले. पत्रकार काय काय उठाठेवी करतात असा प्रश्न उपस्थित केला गेला. जो काही प्रमाणात खराही होता. या आणि अशा घटनांमुळे लोकांचा वृत्त माध्यमांवरचा विश्वास कमी झाला… ज्या माध्यमांवर लोकं डोळे झाकून विश्वास ठेवायचे, त्यांच्याकडे बोटं दाखवत लोकं प्रश्न उपस्थित करू लागले. काही वृत्त वाहिन्यांवर चालणाऱ्या काही चर्चा आणि निवडणुकांदरम्यानचे काही रिपोर्ट हे एकांगी असल्याचं निदर्शनास आलं. आणि प्रेक्षकांकडून विचारलं जाणारं प्रश्नचिन्ह अधिक मोठं झालं..
मिडिया वाईट नाही
मिडिया वाईट नाही, वापरणारा वाईट असेल तर त्याचा वापर वाईट होतो व उगीचच मिडियाच्या नावाने लोक खडे फोडतात. मन चंगा तो कखोटमे गंगा. एखादी बातमी आहे तशी दाखवणे जरी बरोबर असले तरी ती तशी दाखवली तर मोठे वादळ निर्माण होऊन जातीय दंगली निर्माण होणार असतील तर ती तशी दाखवायची का हा महत्त्वाचा विचार आहे आणि विचार मनातून निर्माण होतो म्हणून मी म्हटले की मन अगोदर चांगले हवे. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाच्या घटकाचे वाईट होऊ नये याची काळजी आपण म्हणजे पत्रकारितेने घेतली पाहिजे. पत्रकार हा या बाबतीत फारच मोठा घटक आहे. मिडिया म्हणजेच पत्रकार. तोच तर त्याचे प्रतिनिधित्व करतो. तो कर्ता आहे. त्याच्या कर्माची फळे त्याला एकट्याला नव्हे तर पूर्ण समाजाला भोगावी लागतात. म्हणून सारासार विचार हा महत्त्वाचा आहे. दुसरे म्हणजे, बातमीची वस्तुनिष्ठता. याची योग्य शहानिशा करूनच ती समाजासमोर यावी. तरच पत्रकार समाजाच्या विश्वासार्हतेला पात्र राहतो. ते चुकीचे निघाले तर त्याच्यावर दगडफेक, मारहाण अशा विचित्र गोष्टीलाही सामोरे जावे लागते. पत्रकारिता ही दुधारी तलवार आहे. ती कशी चालवली जातेय यावर त्याची विश्वासार्हता अवलंबून आहे. वस्तुनिष्ठता, विश्वासार्हता हे पत्रकाराच्या रक्तात असायला हवे. तर तो खरा पत्रकार.
व्यास क्रिएशन्सच्या चैत्र पालवी 2019 या अंकात पूर्वप्रकाशित लेख.
मिलिंद भागवत, न्यूज – १८ लोकमत
Leave a Reply