वेंगुर्ल्याहून शिरोड्याकडे जातान वाटेत मोचेमाडची खाडी लागते. ही खाडी ओलांडली की डाव्या कुशीला जे गांव येतं ते आमचं न्हैचिआड. न्हय म्हणजेच नदीच्या अथवा खाडीच्या आड ते न्हैचिआड ! आमचं हे न्हैचिआड डोंगराच्या उतारावर वसलेलं आहे. गावात आम्हा इनामदार रेग्यांची पाच घरं आणि इतर शेतकर्यांची म्हणजेच इथल्या भाषेत कुळांची चाळीस पन्नास घरं. गावात वरचा वाडा आणि खालचा वाडा असे दोन भाग येतात. आमची घरं खालच्या वाड्यातली.
रेग्यांच्या पाच घरात आमचं घर मधलं. आमच्या समोर रेग्यांच्या मूळ पुरुषाचं घर. ते आबांचं म्हणून ओळखलं जातं. या घरातील मंडळींना आबा गेले म्हणजेच आबांकडचे असं संबोधलं जातं. आमच्या वरच्या अंगाला एक घर आहे तिथली मंडळी “वैल्या गेली” आणि खालच्या बाजूस घर आहे तिथली मंडळी “खायला गेली”. याशिवाय खालच्या घराच्या मागच्या अंगाला एक घर आहे. एकेकाळी ते खालच्यांच्या घराचंच मांघर होतं. म्हणून तिथली मंडळी “मांघरा गेली”. आमच्या अजीला गावात सर्वजण काकी म्हणून संबोधत. म्हणून आमाचा उल्लेख – “काकी गेले” असा होतो. घरातील सर्व मंडळी मूळ एकाच घरातली असल्याने आम्ही सर्व एकमेकांचे वार्षिक. सध्या आमच्या पाचही घरांमध्ये वस्तीला कुणीच नसतं. आम्ही सर्व जण गणपतीला मात्र हमखास गावी येतो. पाचही घरात गणपती पुजला जातो. गणपतीबरोबर गौरही असतेच. सर्वांच्या आरत्या मात्र एकत्र. एका घरातली आरती उरकली कि सर्वांनी दुसर्या घरी जाऊन तिथली आरती म्हणायची हा रिवाज आजही पाळला जातो.
वैल्यागेल्यांच्या घरासमोर मुंज्याचं देवस्थान आहे. भल्यामोठ्या पिंपळअच्या पारावर या देवस्थानाची स्थापना करण्यात आली आहे. गावात आलं की आंघोळ वगैरे उरकून पाहिलं मुंज्याला नमस्कारासाठी जायचं. गावाहून निघताना मुंज्याकडे नारळ ठेवून प्रवास सुखरूप होवो असं गार्हाणं घालायचं. रोज संध्याकाळी मुंज्याला दिवा दाखवला जातो. या दिव्यासाठी प्रत्येक घरातून “कैपती” तून तेल दिलं जातं. दरवर्षी मुंज्याचा उत्सव असतो. पूर्वी या उत्सवात गावातली मूलं नाटकातील प्रवेश सादर करीत. त्याआधी सर्व गावकर्यांचं भजन होई. मग आरती आणि त्यानंतर मनोरंजनाचे कार्यक्रम. कधीकधी बाहेरगावच्या दशावतरींनाही निमंत्रण धाडलं जाई.
गावातलं आमचं घर प्रशस्त आणि माडीचं आहे. या माडीवर आता मात्र कुणीच जात नाही. घरात शिरल्याबरोबर डाव्या हातात देवखोली आहे. देवखोलीसमोर ओसरी. आत माजघर आणि अन्य आठदहा खोल्या. जवळ जवळ १९७८ सालापर्यंत आमच्या गावी वीज पोहोचली नव्हती. तेव्हा संध्याकाळचे सर्व व्यवहार कंदिलाच्या प्रकाशात उरकावे लागत. हे कंदिलाचे दिवे तयार करणं हा एक मोठाच कार्यक्रम असे. कंदिल लागले की छोटी छोटी पाखरं त्याभोवती फेर धरु लागत. समोरचा रस्ता काळोखात बुडून जाई. अख्खा गावच अंधारात गुडूप होऊन जाई. रात्री घरासमोरच्या फणसावर काजवे चमकत. काळोखात आतल्या खोल्यांमध्ये वावरताना मनावर दडपण येई. घरातले सर्वजण मग ओसरीवर जमत. गप्पाटप्पांना उत येई. या गप्पांमध्ये खायलागेले आणि वयल्यागेले सहभागी होत.
शाळेत असताना नववीच्या मे महिन्याच्या सुट्टीत मी न्हैचिआडला जवळ जवळ महिनाभर राहिलो होतो. याआधी अगदी लहानपणीही मी आई-वडिलांबरोबर न्हैचिआडला आलोच होतो. मात्र मला आमच्या या गावची खरी ओळख पटली ती या मे महिन्याच्या सुट्टीत. त्याकाळी आम्ही दिवसभर घुला हा बुद्धीबळासारखा खेळ खेळत असू. बसण्याच्या पाटाच्या पाठच्या बाजूला बुद्धिबळासारखाच पट आखून त्यावर सोंगट्यांऐवजी समुद्रातले विविध आकारांचे शिंपले मांडून हा खेळ खेळला जातो. हातातल्या सोंगटीने दान टाकून त्यावरून पटावरील स्वत:च्या शिंपल्या सरकवत आणि वाटेतल्या प्रतिस्पर्धाच्या सोंगट्या मारत जाण्याचा हा खेळ आम्ही तासन् तास खेळत असू. दिवसभर आंबे, फणस, करवंदं, शेंगदाण्याचे लाडू, काजूचे लाडू, आमसूलाचं सरबत, कैरीचं पन्हं हा खुराकही सुरुच असे. महिन्याभराच्या सुट्टीतल्या या वास्तव्याने माझ्या मनात न्हैचिआडबद्दल कमालीची ओढ निर्माण झाली. पूर्णत: शहरात वाढलेला आणि गुंतलेला मी अधुनिकतेचा स्पर्शही न झालेल्या न्हैचिआडच्या खेड्यात समरस होऊन गेलो.
लहानपणी न्हैचिआड गाठणे हे एक दिव्यच असे. त्याकाळी गावी जाण्यासाठी एस.टी. शिवाय पर्यायच नसे. मुंबईहून एस.टी. ने प्रथम सावंतवाडी गाठावी लागे. तिथे तासाभराने शिरोड्यापर्यंतची एस.टी. मिळे. त्यानंतर तिसर्या एस.टी.ने “टाक” या मोक्यावरच्या गावी उतरावे लागे आणि त्यानंतर हातात बॅगा धरुन जवळजवळ अर्धा तासाची पायपीट केल्यावर न्हैचिआडचं घर दृष्टीस पडे. गावी पोहोचल्यानंतर पहिला दिवस प्रवासाचा थकवा घालविण्यात जाई. त्यानंतर मात्र पहाटे वेळेवर म्हणजेच समुद्रावर फेरी मारण्याचा कार्यक्रम सुरु होई आणि सुट्टीची मौजमजा लुटण्यास आम्ही सिद्ध होत असू.
आज कोंकण रेल्वेमुळे न्हैचिआड गाठणं सुखकर झालं आहे. ए.सी.चा आरामशीर प्रवास करुन नंतर कु़डाळहून रिक्षा करुन आम्ही न्हैचिआडला पोहोचतो. गावात आता वीजही आली असल्याने घरात पंख्यापासून गिझरपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध आहेत. वाईट वाटतं ते एकाच गोष्टीचं की जवळजवळ चाळीस वर्षांच्या काळात गावातल्या स्थायिक मंडळींच्या राहणीमानात मात्र विशेष फरक जाणवतच नाही. बहुतेकांच्या घरातले कमावते मुंबईत असतात व गावातल्या मंडळींचा उदरनिर्वाह मनी ऑर्डरवरच चालतो. मात्र निसर्गाचं दान भरभरुन लाभलेल्या न्हैचिआडसारख्या कोकणातील असंख्य खेड्यांना सुखसमृद्धिच्या वार्याचा स्पर्शही कधी जाणवत नाही. चार दिवस मौजमजेसाठी खेड्यात जाणं आणि प्रत्यक्ष खेड्यातलं जीवन जगणं यात जमीन आस्मानाचा फरक आहे हे जाणवलं की मन विषण्ण होतं. आजवर मी न्हैचिआडला अगदी ओढीने जात असे. अलीकडे मात्र या ओढीला खिन्नतेची किनार लाभली आहे. न्हैचिआडमध्ये निसर्गाच्या कुशीत हिंडत असताना मध्येच अचानक मी अंतर्मुख होऊन जातो. न्हैचिआडचं आणि न्हैचिआडसारख्या असंख्य खेड्याचं भवितव्य काय या प्रश्नाचं उत्तर मला सापडत नाही. या प्रश्नाचं उत्तर कोण कधी देणार याचा विचार करत मी मुंबईला परततो.
— सुनिल रेगे
Leave a Reply