प्राणी असो वा पक्षी, त्यांना आंघोळ ही फार प्रिय असते. चिमण्यां थोड्याशा पाण्यात सुद्धा डुबक्या मारुन पंख फडफडवीत आंघोळ करतात. कावळ्याला चार थेंब मिळाले तरी त्याची आंघोळ पूर्ण होते. हत्तीला डुंबायला भरपूर पाणी लागते. म्हशींना एखाद्या डबक्यात गळ्यापर्यंत डुबवून घेतले की, बाहेर यायची इच्छा नसते. मांजर ही आंघोळीच्या ऐवजी स्वतःला चाटून पुसून स्वच्छ करुन पाण्याची बचत करते.
माणूसच असा एक स्वच्छताप्रिय प्राणी आहे की, त्याला रोजच आंघोळ करावी लागते. अगदी लहान असताना त्याला आई पायावर घेऊन उलथा-पालथा करुन आंघोळ घालते. थोडा बसायला लागल्यावर छोट्या टबमध्ये नैसर्गिक अवस्थेत बसवून आंघोळीचा कार्यक्रम साजरा होतो. शाळेत जाऊ लागल्यावर तो स्वतः आंघोळ करुन लागतो. त्यानंतर त्याला आंघोळीची सवय लागते.
मी खेड्यात लहान असताना आईने मला बंबात पाणी तापवून आंघोळ घातलेली आहे. त्यावेळी मला जी गरम पाण्याची सवय लागली ती अजूनही तशीच आहे. त्याकाळी सकाळी उठल्यावर जळणाच्या काटक्या, ढपल्या टाकून तांब्याच्या धातूचा मोठा बंब पेटवला जायचा. मग त्यात प्रत्येकवेळी पाण्याची भर घालत सर्वांच्या आंघोळी व्हायच्या.
सुट्टीत गावी गेल्यावर हनुमान झऱ्यावरुन किंवा विहीरीवरुन कळशीने पाणी आणावं लागे. मग आंघोळ होई. कधी शेतात गेल्यावर विहीरीला पंप लावला असेल तर पाटात सोडलेलं पाणी पाठीवर घेताना त्याच्या प्रेशरने पाठीत धपाटे घातल्यासारखं वाटत असे.
पोहायला न शिकल्यामुळे विहीरीत किंवा नदीत काठावर बसूनच आंघोळ करायचो. समुद्रकिनारी पाण्यात शिरलो, पण आंघोळ केली नाही.
शहरात आल्यावर स्टोव्हवर पातेल्यात पाणी तापवून छोट्या मोरीमध्ये आंघोळ होऊ लागली. त्यावेळी राॅकेल रेशनिंगवर मिळायचं. कधी एखादा सायकलवरुन राॅकेल विकणारा दिसलाच तर त्याच्याकडून ते मिळवावे लागे.
खूप वर्षांनी गॅस घेतल्यानंतर स्टोव्ह माळ्यावर गेला आणि गॅसवर पाणी तापवले जाऊ लागले. मला रोजच डोक्यावरुन आंघोळ केल्याशिवाय चैन पडत नाही. सदाशिव पेठेत असेपर्यंत अशीच आंघोळ चालू होती.
कधी सुट्टीत किंवा यात्रेला गावी गेल्यावर मागलदारी उघड्यावर आंघोळ करावी लागायची. अशावेळी घरी आलेल्या पाहुण्यां मंडळीतील बायका मशेरी घासता घासता टक लावून बघत रहायच्या, ते मला सहन होत नसे. काही वर्षांनंतर वडिलांनी बंदिस्त मोरी करुन घेतली व तिथे आंघोळ करु लागलो.
बालाजी नगरला आल्यावर खजिना विहीर चौकातील देवधर यांचा ‘भगीरथ गीझर’ घेतला व त्या गरम पाण्याने आंघोळ करु लागलो. काही वर्षांनंतर तो बिघडला. पुन्हा गॅसवर पाणी तापवले जाऊ लागले. उन्हाळ्यात टाकीचे पाणी दिवसभर तापून कोमट रहात असे. तेच वापरुन आंघोळ व्हायची. हिवाळ्यात व पावसाळ्यात पाणी गरमच लागायचे. कधी आजारी पडलो तर आंघोळीला दांडी ठरलेली असायची.
कामानिमित्ताने कधी पहाटे मुंबईला जाण्यासाठी पहाटे चारला उठून आंघोळ उरकावी लागे तेव्हा कुठे सहाची सिंहगड एक्सप्रेस मिळत असे. कधी मुंबईला काकांकडे मुक्काम असला की, चाळीतल्या आंघोळीचा अनुभव मिळे. शुटींगच्या कामासाठी मुंबईतील गुलमोहर लाॅजवर मुक्काम असे. सकाळी लवकर उठून आंघोळीसाठी नंबर लावावा लागे. पुन्हा बारा वर्षांनंतर ‘सातच्या आत घरात’ चे वेळी संजय सूरकरच्या घरी मुक्काम असताना माझ्याकडून चुकून हिटरमुळे प्लॅस्टिकची बादली वितळली होती.
कधी कोल्हापूरला गेलो तर ‘अवंती’ लाॅजवर उतरायचो. तेथील व्यवस्था चांगली होती. बंगलोरला गेलो होतो तेव्हा लाॅजमध्ये गरम पाण्याच्या बादल्या मिळायच्या. कामानिमित्ताने फिरणं होत होतं. तेव्हा ठिकठिकाणी वेगवेगळ्या अनुभवातून जात होतो.
दरम्यान बरीच वर्षे निघून गेली. आता बाहेरगावी जाणं होत नाही. गावी देखील जाणं कमी झालंय. दोन वर्षे कोरोनामुळे देवीची यात्राही झाली नाही. आता रहाण्याची जागा बदलली आहे. सकाळी सोलरच्या गरम पाण्याने आंघोळ होते आहे. मात्र या आंघोळीला, अचानक आलेल्या पहिल्या पावसाच्या, ओल्या चिंब आंघोळीची सर नाही.
© सुरेश नावडकर
मोबाईल ९७३००३४२८४
२८-५-२१.
Leave a Reply