नवीन लेखन...

न्हाऊ घाल, माझ्या मना

परवा एक भावगीत ऐकले.-

‘येरे धना , येरे धना, न्हाऊ घाल माझ्या मना’ . . . . . .!

न्हाऊ घालणे म्हणजे स्नान घालणे, आंघोळ घालणे, उद्देश : स्वच्छ करणे. देवाला ( धना म्हणजे देव ) आर्त हांक घालुन विनवणी कोणची, तर ” मनाला न्हाऊ घाल” म्हणजे मनाला स्वच्छ कर, पण त्यासाठी मनाला शरीरापासुन वेगळे कसे करता येईल ?  मन शुध्द करण्या वरून संत कबीर यांचा खालील प्रसंग अर्थपुर्ण वाटतो-

संत कबीरदास एकदा गंगेवर स्नान करायला गेले होते.तिथे दोन तीन उच्चवर्णीय सुशिक्षीत सज्जन स्नानासाठी आले होते.काठावर त्यांना डुबकी घेतां येईना व काठाऐवजी आत गेले तर पाणी खोल होते .कबीरांना त्यांची अडचण समजली म्हणुन त्यांनी त्यांचेजवळचा तांब्या वाळुने घासुन लख्ख केला व काठावरच्या एका माणसाला तो त्यांना द्यायसाठी  दिला.ती माणसं तांब्या न घेतां उलट उर्मटपणे म्हणाले “ ह्या मुस्लीम कोष्ट्याचा विटाळ नको आम्हाला” .( कबीर विणकर कुटुंबातले म्हणुन स्वत:साठी ते उर्दुतला शब्द ‘जुलाही’ वापरायचे त्यामुळे लोक त्यांना मुस्लीम समजायचे.)कबीर म्हणाले “ एवढ्या पवित्र गंगेत धुतल्यानंतर सुध्दा तांब्या ची अपवित्रता जात नाही तर विकृत मन असणार्यांचे शरीर काय अन् मन काय गंगा ते पवित्र कुठुन करणार” !  वरील भावगीता च्या संदर्भात ह्या घटनेचा मतितार्थ हा की कवी म्हणतोय त्याप्रमाणे देवा,मनांत जे अहंकार,द्वेष,आदी विकार येतात ते मनातुन खरे खुरे जाऊ देत,म्हणजेच पर्यायानी मनाला शांत कर.

जसे तन तसे मन या उक्ती प्रमाणे  शरीर स्वस्थ असेल तर मनात पण विकृती येणार नाही व ते निश्चितच समाधानी,उत्साही असेल .आपलेच बघा आपण स्नान केले,( स्वच्छ कपडे घातले ) तर आपण शुचिर्भुत , शुध्द होतो, ओघानेच आपले मन पण आनंदी,पुल्लकित होते.इतकेच काय,काही न समजणारे लहान मुल जर किरकिर करत असेल,कंटाळले असेल तर त्याला आंघोळ च काय नुसते हातपाय तोंड धुतले ( crow  bath ) कपडे बदलले,पावडर लावुन केस विंचरले तरी ते खुष होते,त्याचा मुडच एकदम बदलतो.ही जादु नुसत्या स्नान करण्याने होते.

नहाणे म्हणजे स्नान करणे,अंघोळ करणे( ‘बाथ’ घेणे ), ही साधी सहज क्रिया पण परिणाम मात्र अकल्पित असतात. तरी बरेच जण रोज स्नान करायला कंटाळा करतात  कारण स्नान घेणे हे ते आवश्यक समजत नाही.या संबंधात एक आख्यायिका आहे .कलीयुगात पृथ्वीवर  लोकसंख्या भरमसाठ वाढली ,अन्नाची कमतरता भासु लागली.ते बघुन नारद मुनी ह्यावर उपाय काय? म्हणुन देवाला विचारते झाले .देवाने सांगितले लोकांना एकदाच जेवायला व दोन तीनदा आंघोळ करायला सांग. नारदाने पृथ्वीवर येऊन नेमके उलटे सांगितले “ दोन तीनदा जेवा व एकदा आंघोळ  करा”,तेव्हापासुन आपण तसे करु लागलो असे म्हणतात .( याला अपवाद मुंबई,चेन्नई चे लोक होत, जे बाहेरुन आले की घामाघूम झाल्याने दोन तीनदा आंघोळ करतात.) दोन तीनदा जेवल्याच्या परिणाम स्वरूप पृथ्वीवरची सद्यपरिस्थिती दिसतेच आहे.

स्नान करताना शरीरावर स्वच्छ शुध्द पाण्याचे मार्जन करुन खालील स्तोत्र म्हणायची पध्दत पुर्वापार चालत आली आहे कारण त्यामुळे पवित्र सप्तनद्यांमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळते असा समज आहे.

गंगे ! च यमुने ! चैव गोदावरी! सरस्वति! नर्मदे !

सिंधु ! कावेरी! जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु ! !

कसलीही शुध्दता करण्यासाठी  पाण्याशिवाय गत्यंतर नसते.पाण्याच्या महत्वाच्या संदर्भात एक गमतीदार गोष्ट वाचण्यात आली होती ती येणेप्रमाणे-

एक आजोबा  स्नानविधी आटोपुन रोज पोथी वाचत असतात.त्यांचा शाळेत जाणारा नातु म्हणतो  आजोबा तुम्ही रोज रोज हे कां वाचता ? व त्यानी तुम्हाला काय मिळते?आजोबा म्हणतात तु माझे एक काम कर मग मी तुला सगळे समजावतो. राख व कोळश्यानी काळी झालेली एक बादली त्याला देऊन  जवळच असलेल्या नदी वरुन पाणी आणायला ते त्याला सांगतात.नातु नदीवर जातो ,राख ओतुन देऊन पाणी भरुन आणायचा प्रयत्न करतो पण बादली फुटकी असते व परत येईपर्यंत पाणी गळुन जाते.आजोबा म्हणतात उद्या पुन्हा प्रयत्न कर.दुसरे दिवशी आणी असेच काही दिवस तेच तेच घडते.त्यानंतर आजोबा त्याला बादली आणायला सांगतात.नातु ती आणतो व आजोबा बघतात तर बादली एकदम लख्ख झालेली.आजोबा  म्हणतात  बादली आधी कशी होती व आता बघ  ती कशी स्वच्छ झाली आहे .पाण्याने आपले काम केले व ते एक दिवसात नव्हे तर सातत्याने रोज केल्याने तसे झाले. पाण्याच्या नुसत्या सानिध्याने सगळे शुध्द स्वच्छ होते पण सातत्यता तितकीच महत्वाची,म्हणुन तर रोज स्नान करायचे असते.आता हे बघ, स्नान करुन मी  देवाची प्रार्थना करतो तर शरीराबरोबर मन पण शुध्द झालेले असते व वाईट विचार मनांत येत नाहीत.रोज हे असे केल्याने मन पवित्र होऊन जाते व मनांत काही विकार,अहंकार आलेच तर ते पण धुतल्या जातात.शुध्दतेला प्रार्थनेची जोड मिळाली तर पवित्रता ही येणारच.

आध्यात्मिक संदर्भ म्हणजे गरूड पुराणात सांगितल्याप्रमाणे स्नान करताना खालील स्नानमंत्र म्हणावा.

ॐ अपवित्र:  पवित्रो वा सर्वावस्थां गतो अपी वा।

य:स्मरेत पुन्डरीकाक्षं , स  बाह्याभ्यंतर: शुचि: ॥

खरे तर हा स्नानमंत्रा पेक्षा “ पवित्रिकरणा” चा किंवा ‘शुध्दिकरणाचा’ मंत्र आहे. मंत्राचा अर्थ  हा की शुध्दता असो वा अशुध्दता मग ती आंतरिक (मनाची ) असो वा बाह्यस्थितीजन्य ,पुन्डरिकाक्षा ची म्हणजेच श्री विष्णु चे भावपुर्वक निव्वळ स्मरण केल्याने व्यक्तिचे पवित्रीकरण होते.स्मरणात मात्र तो “भक्तिभाव” निश्चितच असावा.आता शुध्दता किंवा पवित्रता म्हटली तर हे भाव ईश्वराच्या संदर्भात येतात.देव हा निर्गुण असला तरी आपण त्याला सगुण स्वरूपात ( मुर्ती रुपांत ) कल्पितो व आपल्या श्रध्देनुरूप  त्याची षोडोपचार पुजा करतो. त्यांत दुध,दही,मध,साखर,तुप या पंचामृतानी नंतर उष्णोदक म्हणजे कोमट पाण्यानी तद् नंतर शुध्दोदक स्नान् म  व तेही देव स्त्रीलिंगी  असेल तर श्री सुक्तानी व पुल्लिगी असेल तर पुरूषसुक्तानी अभिषेक ( मार्जन ) करुन स्नान घालतो. सर्व उपनिषदांचे सार (महावाक्य) म्हणजे “अहं ब्रम्हास्मि” अर्थात प्रत्येक आत्म्यात ईश्वराचा वास असतो म्हणजे आपल्यात पण ब्रम्हतत्व म्हणजे आपले शरीर मंदिर स्वरूप झाले मग आपण नको कां पवित्र (स्वच्छ ) राहायला?

स्नान करण्याचे पण विवीध प्रकार आहेत.आंघोळ न करता नुसते कपडे बदलुन सांगुन टाकायचे की आंघोळ झाली,हे झाले dry bath किंवा ‘आंघोळीची गोळी’घेणे. नुसते हात-पाय धुणे( स्पंजिंग ) हे झाले ‘crow bath’ ( जसे पक्षी चोचीने पाणी उडवतात तसे) . समुद्र किनार्यावर डुबकी नंतर कमीतकमी कपड्यांनी वाळुवर पहुडणे म्हणजे “सन बाथ”जे विदेशांमधे थंड प्रदेशांमधे सामान्य (common) आहे.मुल जन्मल्यानंतर मुलाला नर्स जी आंघोळ घालते ती” पहिली वहिली” आंघोळ.आत्ता उन्मळून येतो म्हणुन पाच मिनीटांत ‘भुडभुड गंगा’ केली तरीही ती आंघोळच. ( गंगेत लोटा किंवा तांब्या बुडवताना बुडबुड आवाज येतो त्यावरुन भुडभुड शब्दप्रयोग आला असावा.) शाॅवर खाली उभे राहुन उभ्याउभ्या केलेली आंघोळ म्हणजे ‘शाॅवर बाथ ‘तर टब मध्ये पहडुन केलेली आंघोळ म्हणजे ‘टब बाथ.’वाढदिवसाला किंवा दिवाळीला पहाटे उटणे लावुन घातलेली आंघोळ म्हणजे “अभ्यंग स्नान”.मेजर ॲापरेशन च्या आधी दवाखान्यात घाईघाईत केलेली आंघोळ म्हणजे’ स्मरणीय स्नान’. लग्नात उष्टी हळद लावुन मुलीच्या बहीणींनी घातलेले स्नान म्हणजे ‘ रोमांचकारी’( romantic) स्नान तर लग्नानंतर नववधुबरोबर केलेले प्रथम स्नान हे “प्रणय स्नान”.जेव्हा प्राण ज्योत मालवते व मनुश्य शेवटच्या प्रवासाला निघतो , तेव्हा लोक त्याला घाई घाईत स्नान घालतात ते मात्र असते” अंतिम स्नान.”

स्नानाचा  एक वेगळा प्रकार म्हणजे  पोहणे,विहिरीत,नदीत,समुद्रात अथवा स्विमींग पुल ( तरणतारण) मध्ये. पोहण्याने चांगला व्यायाम होतो पण खरे स्नान होत नाही. गरम  पाण्याच्या कुंडात अगर तरणतालातील “झाकुजी”तले स्नान झाले “उपचारीक “स्नान. अनोळखी विहीर,अनोळखी नदी यांत पोहु नये म्हणतात.समुद्रात पोहणे तसेपण धोकादायक असते ,तरणतालातले पोहणे धोकादायक नसले तरी बरेचदा हायजिनीक नसते.त्यानंतर घेतलेल्या शाॅवर मध्ये काही अर्थ नसतो.विहिरीवर खिराडीच्या साहाय्याने बादलीने( किंवा रहाटाने ) पाणी काढुन मोकळ्या हवेत (open air )आंघोळ करणे इतिहास जमा असले तरी खेडेगावांमध्ये बर्याच प्रमाणात अजुन प्रचलित आहे.नदीवर पण आंघोळ करता येते पण स्वच्छ पाण्याची खात्री हवी.तिथे घाघर घेऊन पाणी भरणार्या बायका किंवा कोणी कपडे  धुताहेत,पुरूष खोल नदीत पोहताहेत व मुले काठावर डुबक्या घेताहेत हे दृष्य तर कवीमनांला व चित्रकारांना  चांगलेच भावते .श्रीरामाला नौकेतून पार करु देणारी शरयु असो किंवा श्रीकृष्णाला बाललिला करु देण्यास प्रवृत्त करणारी यमुना असो,तसेच पवित्र सप्तनद्यांपैकी एखादी असेल तर मग  स्नानासाठी होणारी गर्दी विचारायलाच नको.अशा गर्दीच्या वेळेला स्नान करणे हितकर नसते.

स्नान केव्हा करावे व कसे करावे यांचे पण ठोकताळ्याने काही अलिखीत नियम आहेत.स्नान हे शक्य तोवर ब्रम्हमुहुर्तावर म्हणजे पहाटे ४-४.३० ते सकाळी ६वा पर्यंत करावे म्हणजे आळस निघुन जाऊन शुध्द हवेने ताजे तवाने वाटते .वेदांमध्ये म्हटले आहे की अविवाहित पुरुषाने एकदा,विवाहित पुरुषाने दोनदा व ऋषिमुनींनी दोन-तीनदा स्नान करावे . आंघोळ स्नान गृहात खाली बसुन करावी म्हणजे हातपाय व्यवस्थीत  हालवता येतात व तसे करताना त्वचेवरची अतीसुक्ष्म छिद्रे मोकळी केल्या जाऊ शकतात. हा एक प्रकारचा व्यायामच होय म्हणुनच जेवल्यानंतर लगेच किंवा व्यायाम केल्यानंतर लगेच स्नान करू नये. आंघोळी पुर्वी शक्य असल्यास खोबरेल वा अन्य उपयुक्त तेलाने मालिश करावे त्यामुळे रक्तसंचार चांगला होतो.आंघोळ शक्य असल्यास थंड पाण्याने अगर कोमट पाण्याने करावी,ते जमत नसल्यास गरम पाणी घ्यावे परंतु ते खुप गरम नसावे.सर्वप्रथम पाणी हात,पाय व इतर भागांवर घ्यावे नंतर हळुहळु डोक्यावर घ्यावे .एकदम डोक्यावर घेतल्यास डोक्याचे बदलते तापमान बरेच वेळा शरीर सहन करू शकत नाही व काही भयंकर व्याधी मागे लागु शकतात.स्नान गृहात वाफ निघुन जाण्यासाठी व्हेंटिलेशनअसावे.बाथरूम मध्ये आंघोळ केल्याने व्यक्तिला वैयक्तीक जागा (स्पेस)  मिळते,त्या वेळेत शक्य असल्यास रामरक्षा किंवा आपल्या कुलदैवतेचे एखादे स्त्रोत्र मोठ्या आवाजात म्हणता येते.ह्याच वेळेत बरेचदा नवीन कल्पना येतात ,चिंतन करणे ,गंभीर निर्णय घेणे जमते ,अशाच वेळेत आर्कमेडीजच्या डोक्यात, द्रव पदार्थाच्या उत्प्रणोदना(  upthrust )चा सिध्दांत प्रसुत झाला व युरेका युरेका म्हणत टब मधुन तो विवस्त्र बाहेर आला ! बरेचजण स्नानगृहात ( बाथरूम सिंगर )मोकळ्या आवाजात गाण्याचा सराव  करतात. दुसरा फायदा म्हणजे शरीराच्या विवीध भागांचे निरीक्षण करुन त्वचेचे रोग अथवा कर्करोगा सारख्या व्याधी बाबत वेळेत जाणीव होऊ शकते. आंघोळ करताना तिळ,बदाम,दुध-बेसन,हळद अशा नैसर्गीक किंवा वनौषधि युक्त पदार्थांचा उपयोग करावा, ( केमिकल स्वरूपाचा साबण मात्र वर्जित असावा ).

एकुण काय तर गोष्टीतल्या आजोबांसारखी मनोवृत्ती घरातल्या सगळ्यांनी बाळगली तर घरात शांती व सुखाचे जणु झरेच वाहायला लागतील व मग आपल्याला म्हणावेसे वाटेल-

घरांत हसरे तारे, असतां……मी पाहु कशाला नभाकडे !

— सतीश कृष्णराव परांजपे 

1 Comment on न्हाऊ घाल, माझ्या मना

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..