आजच्याच दिवशी, १८४८ साली, निसर्गराजाने एकदाच –फक्त एकदाच — असा चमत्कार केला होता, जो पाहून -ऐकून लाखो लोक आश्चर्यचकित झाले होते ! अमेरिकेच्या उत्तरेस असलेल्या आणि अमेरिका-कॅनडा देशांच्या सरहद्दीवर हजारो वर्षे अष्टौप्रहर कोसळत असलेल्या अतिप्रचंड जलप्रपाताचे, नायगारा धबधब्याचे कोसळणे२९ मार्च १८४८ रोजी अचानक थांबले आणि तब्बल तीस तास त्यातून पाणी आलेच नाही. नायगारा ठणठणीत कोरडा पडला होता ! झाले असे होते की ज्या लेक एरी मधून नायगारा नदीचा उगम होतो तो लेक तळापासून काठापर्यंत संपूर्ण बर्फमय झाल्याने नदीच्या उगमाजवळ विचित्र कोंडी होऊन नदीत पाणी जाणे थांबले होते त्यामुळे अवघा पन्नास-पंचावन्न किलोमीटर्स प्रवास करीत वाहणारी ही नदी पाण्याविना कोरडी पडली होती आणि एरव्ही कोसळणाऱ्या नायगारा धबधब्याच्या सहस्रधारा अक्षरशः लुप्त झाल्या होत्या ! तीस तासानंतर मात्र हा धबधबा पुन्हा पूर्वीच्याच भव्य रुपात पुन्हा कोसळू लागला तो आजही तसाच कोसळत आहे !
नायगारा धबधबा पाहण्यासाठी प्रतिवर्षी जितक्या संख्येने जगभरातून पर्यटक येत असतात तितक्या संख्येने ते अन्य कुठल्याही पर्यटन-स्थळाला भेट देत असतील असे वाटत नाही . तीन वेगवेगळे धबधबे मिळून हा नायगारा धबधबा झाला आहे . अमेरिकन फॉल्स १०६० फूट लांबीचा असून त्याचे सर्वात उंच ठिकाण १७६ फुटांवर आहे .त्याला चिकटूनच ब्रायडल व्हेल फॉल्स आहे . या दोन्हीतून प्रति सेकंदाला ५६७००० लिटर्स इतके पाणी पडत असते ! यांच्या एका बाजूला अमेरिका तर दुसऱ्या बाजूला कॅनडा आहे . कॅनडियन हॉर्स शू या नावाने प्रसिध्द असलेला तिसरा धबधबा २६०० फूट लांबीचा आणि घोड्याच्या नालेसारख्या आकाराचा असून त्यांचे सर्वात उंचावरचे ठिकाण १६७ फूट उंचीवर आहे . या धबधब्यातून सेकंदाला बावीस लाख सत्तर हजार लिटर्स इतके पाणी कोसळत असते ! हा धबधबा पाहताना समर्थ रामदासांचे शब्द आठवतात .. “धबाबा कोसळती धारा, धबाबा तोय आदळे!”
— प्रविण कारखानीस.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply