निद्रा नाश करुनि होते ते काय
चिंतेचा लोट धरिती पाय
हलकल्लोळ या शिरी माजतो
व्हावे जे तेच होते न की उपाय!!
अर्थ–
झोपच येत नाहीये, झोपच येत नाही अजिबात रात्री. काय करावं कळत नाही, अख्खी रात्र विचारांमध्ये जाते. सुचतंच नाही काही, नुसता डोक्याचा भुगा झालाय. दिवसभर काम, संध्याकाळी प्रवास, घरचं काम तरी रात्री झोप येत नाही. काहीतरी गडबड आहे डोक्यात त्याशिवाय हे असं होणार नाही.
रवीस काही टोचू नका
त्यास काही न लपे
स्वच्छ प्रकाश पोचतो जिकडे
तेथेचि रात्री झोप लागे
अपार कष्ट करून सुद्धा काहीतरी व्हायचं, मिळायचं बाकी आहे हे मनात असलं की झोप लागणं मुश्कील. एखाद्या ध्येयाने झपाटून त्या विचाराअंती झोप न लागणं चांगलं पण तरीही तेथे मनास विश्रांती ही हवीच. पण काळजी पोटी, चिंतेपोटी झोप न लागणे योग्य असते? चिंता ही असणारच त्यासाठीच जन्म असतो आपुला, पण त्याच्या बरोबर दुसरी बाजूही असते समाधानाची. माझ्या कडे काय नाही ह्यापेक्षा माझ्याकडे काय आहे ह्यावर जोर दिला तर चिंता समाधानात परावर्तित होऊ शकते.
‘चिंता करितो विश्वाची’ म्हणून नारायणाने आपला हेतू स्पष्ट केला पण त्या हेतूची चिंता करीत तो बसला नाही त्यासाठी लागणारी कृती त्याने केली म्हणून पुढे नारायणाचे श्री समर्थ झाले. समर्थांनी ही कित्येक रात्री जागून काढल्या असतील त्यात तिळमात्र शंका नाही पण त्या माझी आई आता कशी असेल या चिंते पोटी नसतील तर मी जे कार्य करायला जन्मलो आहे ते कसे करावे याच्या विचारांत ते जागले असतील.
उद्या काय होणार याची चिंता आज झोपू देत नाही आणि काल असेच का झाले याचे दुःख नीट जगू देत नाही. याचा अर्थ चिंता करूच नये? अजिबात नाही चिंता करावी योग्यच असते ती पण त्याचा परिणाम आपल्या मनावर, शरीरावर किती करून घ्यायचा हेही पाहायला हवेच. नाहीतर उपाय काही नाही, रात्री झोप येत नाही, रात्री झोप नाही म्हणून दिवसा हुरूप नाही मग काही करावेसे वाटत नाही म्हणून परत रात्री झोप नाही. उद्याची चिंता आजचं जगणं संपवते. विचार होणे गरजेचे, ज्याने त्याने स्वतःशी करावा.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply