जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरस ने भारतात प्रवेश केल्यानंतर काही दिवसातच प्रत्येक भारतीयाला घरात बंदिस्त होण्यास भाग पाडले. कोरोना वायरस ची लक्षणे काय, तो कसा पसरतो, त्याचा फैलाव कसा रोखायचा यावर आत्तापर्यंत चर्चेची अनेक पारायणे झाली आहेत.
त्याच विषयावर या लेखाद्वारे परत तीच चर्चा करण्यापेक्षा एखादी आपत्ती का निर्माण झाली आणि आपत्ती निवारण झाल्यानंतर त्यामधून काय शिकायचे या गोष्टीवर पण चर्चा करणे मला तितकेच गरजेचे वाटते.
जगातील अनेक देश किंवा त्या देशाचे काही ठराविक भुभाग सतत कुठल्या ना कुठल्या तरी आपत्तीला तोंड देत असतात. ही आपत्ती सुनामी, भूकंप, ज्वालामुखी, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, वादळ अशा विविध स्वरूपात माणसासमोर धडकत असते. आपत्ती वेगवेगळ्या रूपाने मानवजाती समोर धडकल्यानंतर कुठलाही जीव त्याचा मुकाबला करत, त्यातून मार्ग काढत पुढचे जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. पण असे संकट का आले, यापुढे असे संकट पुन्हा येणार तर नाही ना याचा विचार किती जण करतात?
आजकाल मानवजाती समोर निर्माण होणारी बरीच संकटे ही निव्वळ माणसाने निसर्ग सोबत केलेल्या छेडछाडीमुळे निर्माण झालेली संकटे जाणवतात. नदी वाहणाऱ्या एखाद्या शहरात पावसाळ्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते कारण प्रवाहाच्या मार्गात अनेक ठिकाणी अतिक्रमणे निर्माण केलेले असतात. सुपीक असणारा भुभाग वाळवंट जाणवू लागतो कारण वर्षानुवर्षे तिथे कुणी वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घेतलेला नसतो. अनेक ठिकाणी समुद्रात घातलेला भराव सूनामिला निमंत्रण देतो का? माणूस जंगलात अतिक्रमण करायला लागतो मग जंगलातील प्राणी माणसाच्या घरात शिरायला लागतात.
कोरोना व्हायरसच्या बाबतीत केला जाणारा दावा ही पण निसर्गाची छेडच मानायची का? कोरोना व्हायरस वटवाघळांमधून माणसात संक्रमित झाला असा दावा सध्या केला जातोय. या पृथ्वीतलावरील प्राणी, पक्षी आणि निसर्ग हाताळन्याचे काही निसर्ग नियम आहेत ज्याचा माणसाला वेळोवेळी विसर पडतो आणि मग कुठल्यातरी आपत्तीला तोंड देत बसावे लागते. आपण जेव्हा जेव्हा असे निसर्ग नियम मोडण्याचा प्रयत्न करणार तेव्हा तेव्हा आपत्ती कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्या दारात येऊन उभी राहणार.
आपण जर आज घरात बंदिस्त झालोच आहोत तर काही गोष्टींचा विचार अवश्य करून बघा की आपण निसर्गावर कोणकोणत्या पद्धतीने कळत नकळत वार करण्याचा प्रयत्न करत आहोत. पुढील काही दिवस मोठ्या शहरातील प्रदूषण सर्वात नीचांकी पातळीवर असेल. थोडे दिवस का होईना पण नद्या स्वच्छ वाहताना दिसतील. रोज समुद्रात ओतली जाणारी घान काही दिवस थांबलेली असेल. काही टेकड्यांवर हिरवळ आणि झाडे परत उगवायला लागलेली असतील. जंगलाच्या दिशेने वारंवार होणारे अतिक्रमण काही दिवस तरी थांबले आहे. मांसाहार करण्याबद्दल सध्या निर्माण झालेल्या भीतीने काही दिवस मुक्या प्राणी आणि पक्षांना जीवदान दिले आहे.
जेव्हा कोरोणाचे संकट दूर होऊन आपली नियमित जीवनशैली परत सुरू होईल तेव्हा या सर्व गोष्टी एकदम बदलणार नाहीयेत पण जर या गोष्टींकडे संवेदनशील मनाने बघायला सुरुवात केली तर त्याची तीव्रता मात्र नक्कीच कमी होऊ शकते.
इथून पुढे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानवी प्रगती साधताना जिथे जिथे निसर्गाला धक्का लागेल तिथे तिथे ति झीज भरून काढण्याची जिम्मेदारी देखील आपल्याला उचलावी लागेल. आपण तंत्रज्ञान विकसित करण्यासोबत निसर्गाचा आदर राखायला लागलो की मग आपल्यावर देखील वेगवेगळ्या आपत्तीच्या निमित्ताने घरात बंदिस्त होण्याची वेळ येणार नाही.
— राहूलकुमार गोपाळराव बोर्डे
Leave a Reply