नवीन लेखन...

निमित्त… तुकाराम !

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये प्रा. नीतिन आरेकर यांनी लिहिलेला हा लेख


श्रेष्ठ दर्जाचं साहित्य हे प्रत्येक काळातील वाचकासमोर एक आव्हान असतं. कारण ते कालसापेक्ष असतं आणि तितकंच कालातीतही असतं. ते साहित्य वाचकाच्या कुवतीनुसार त्याला समाधान देत असतं. तो वाचक, त्या साहित्याची, त्याला सापडलेल्या वा त्याला आधारासाठी उपलब्ध असलेल्या निकर्षांच्या आधारावर समीक्षा करत असतो. तुकारामांचं साहित्य हे असं एकाच वेळी कालसापेक्ष व कालातीत आहे; आणि ते प्रत्येक काळातील वाचकासमोर आव्हानही आहे.

तुकाराम हे खरे समकालीन होते. त्यांच्या अभंगांत प्रामुख्याने व्यक्ती आणि समाज यांतील संबंधाची जाणीव स्पष्टपणे दृग्गोचर दिसत असते. ज्या काव्यामध्ये व्यक्ती आणि समाज यांच्यातील अतूट बंधांचा, परस्परावलंबित्त्वाचा, त्यांच्यातील मूलभूत स्वरूपाच्या वा तर्कातीत जीवैक्याचा प्रत्यय येतो, ते काव्य सामाजिक जाणिवेचे काव्य आहे असे मानायला हरकत नसते. तुकारामांचे अभंग तसे होते. अर्थात वाङ्मयीन महत्ता ही त्यात अंतर्भूत असणाऱ्या सामाजिक जाणिवेवर अवलंबून असते, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. जाणिवेचे अन्य प्रकारही असतात आणि सामाजिक जाणीव टाळूनही श्रेष्ठ दर्जाचं काव्य निर्माण करणं शक्य असतं. व्यक्ती आणि समाज या संबंधांबरोबरच व्यक्ती आणि निसर्ग, व्यक्ती आणि व्यक्ती, व्यक्ती आणि दिशा, व्यक्ती आणि व्यक्तिमन असे विविध प्रकारचे बंध काव्यांतर्गत जाणिवेला कारणीभूत ठरू शकतात आणि त्यांवर तिची महत्ता अवलंबून असते. या संबंधांव्यतिरिक्तही अन्यही संबंध असू शकतात. हे संबंध संपूर्णपणे स्वतंत्र व स्वायत्त नसतात. त्यांच्या कक्षा परस्परांना घेवून जाऊ शकतात. साहित्याचा जसजसा शोध घेत जावं, तसतशी ही जाणिवेची संमिश्रता, व्यामिश्रता अधिकाधिक जाणवू लागते. श्रेष्ठ दर्जाचे काव्य हे आपल्या परीने काव्याच्या मूलस्वरूपाशी एकनिष्ठ असते. श्रेष्ठ दर्जाच्या काव्यातील सामाजिक जाणीव ही उत्कटतेनं भावगर्भ आणि चिंतनगर्भ असू शकते, नव्हे असते!

जाणकार सहानुभूती, सूक्ष्म निरीक्षणशक्ती, स्वभावतःच कुतूहलपूर्णता या गुणांची कवीला आवश्यकता असते. पण त्या जोडीला कवीजवळ आवश्यक ती शब्दकळा व मांडणीचं सामर्थ्यही असणं आवश्यक असतं. कवी सभोवतालच्या सृष्टीमधून अनुभव टिपून त्या अनुभवाचे प्रतिसृजन करत असतो. श्रेष्ठ दर्जाची कविता ही पारंपरिक प्रतिमासृष्टीला छेद देऊन नवीन प्रतिमासृष्टी जन्माला घालते. कित्येक वेळा कवीला आपल्या सभोवतालची विपरिमता, विरूपता, अगतिकता व यांत्रिकता अस्वस्थ करते. ही अस्वस्थता त्याच्या काव्यातून प्रकट होते. अशावेळी दंभस्फोट करायला त्याला उपहास, उपरोध यांसारखे प्रबळ व तीक्ष्ण हत्यार वापरता येते. हे करत असताना कवीजवळ सूक्ष्म संवेदनशक्ती, प्रसरणशील व लवचिक कल्पनाशक्ती, औचित्याची दांडगी समज, सर्वांभूती महानुभूती आणि स्वाभाविक अस्वस्थता असेल तर त्याची सृजनशीलता नवनवे उन्मेष धारण करते. या सर्व गोष्टींचे संमीलन आपणास तुकारामांच्या अभंगगाथेत आढळते.

तुकारामांची अभंगगाथा ही एकाचवेळी आत्मगर्भ आहे आणि समाजागर्भही आहे. ती वैयक्तिक दुःखभोगातून सामाजिक दुःखभोगही मांडत राहते. ती सूक्ष्मातून स्थूलाकडे व स्थूलातून सूक्ष्माकडे जात येत राहते.

तुकारामांचा संपूर्ण जीवनकाळ हा महाराष्ट्रातील अत्यंत धामधुमीचा व अस्मानी संकटांना सामोरा जाणारा काळ आहे (१६०८-१६५०). हा काळ प्रचंड उलथापालथीचा काळ आहे. दीर्घ काळ चाललेला दुष्काळ, कर्मठ वातावरण, महानुभाव-नाथ-दत्त-वारकरी-सूफी संप्रदायांचे विविध विचारप्रवाह, मोंगली आक्रमणे, बहामनी सुलतानांच्या परस्परांतील लढाया, शिवाजी राजांचा उदय (१६२०) आणि त्याचा हळूहळू विस्तार, शेतकऱ्यांचे शिपाईगड्यात होणारे रुपांतरण अशा अनेक गोष्टी अवतीभवती सुरू होत्या. तत्कालीन आर्थिक घडीही पूर्णपणे विस्कटलेली होती. मुस्लीम राजसत्ता असली तरी प्रत्यक्षात हिंदू, मराठी सरदार ही या बहामनी राजसत्तांची ताकद होती. फार मोठ्या प्रमाणात धार्मिक अराजकाला तत्कालीन महाराष्ट्रीय समाजजीवन तोंड देत नव्हतं. तुकारामादी संतांना जो जाच झाला, तो यवनांपेक्षा मुस्लीम राजसत्तेपेक्षा सनातनी ब्राह्मण वर्गाचा, हे ध्यानी घेतलं पाहिजे. तुकारामांच्या गुरुपरंपरेतील बाबाजी दीक्षित, त्यांचे गुरु केशव चैतन्य, राघव चैतन्य यांना सर्व धर्मीय, पंथीय व भाषिक समाज भजत होता. वर्णातीत, धर्मातीत सहिष्णुतेचं त्या काळातील दख्खनी भूप्रदेश हा उदाहरण होता.

तुकारामांच्या अभंगातील बराचसा भाग हा जातीयतेविरुद्ध आणि संकुचित, कर्मठ धर्मसत्ते विरुद्ध होता. तुकारामांनी त्या काळातल्या अतिशय उदार असणाऱ्या परंपरेशी आपलं वैचारिक नातं जोडल्यामुळे त्यांनी ज्ञानेश्वर-नामदेव-एकनाथांकडून चालत आलेल्या परंपरेला नवा अर्थ प्राप्त करून देता आला. त्यांच्याइतका मोठा कवी आजतागायत झालेला नाही. तुकारामांनंतर धार्मिक सहिष्णुतेला वाईट दिवस आले. प्रसरणशील व लवचिक असणाऱ्या वारकरी पंथावरही प्रतिगामी बुरसट विचारांचा प्रभाव वाढला व तो आजही टिकून आहे.

आयुष्यातील दोन तृतीयांश काळ एक वैश्यवृत्तीचा उत्तम सावकार म्हणून व्यतीत केल्यावर तुकोबांनी सर्वसंगपरित्याग केला आणि एका संसारशील मनुष्याचे अस्तित्वांतर संतत्त्वात झाले. याचे एक कारण त्यांनी केलेला वारकरी संप्रदायाचा अंगिकार होय. वारकरी संप्रदायाचा निर्माता म्हणून पुंडलिकांना ओळखले जाते तर त्याचे प्रवर्तक म्हणून ज्ञानदेव मानले जातात. नामदेवांनी वारकरी संप्रदायाचा विस्तार केला, नाथांनी त्याला भक्कम आधार प्रदान केला. तुकारामांनी त्याचा कळस गाठला. वारकऱ्यांचं दैवत आहे- विठ्ठल ! विठ्ठ (प्राकृत-विष्णु) + स्थल (शिव) = विठ्ठल अशी विठ्ठलाची नाम उपपत्ती मानली जाते. या देशातील सर्वाधिक संघर्ष हा हिंदू-मुस्लीम किंवा हिंदू आणि अन्य धर्मीयांत झालेला नाही; तर तो वैष्णव आणि शैव यांच्यात झालेला आहे असे इतिहास सांगतो. वारकरी संप्रदायाला एखादा प्रेषित नाही. तो एक प्रवाही समूहमनाचा सामाजिक आविष्कार आहे. गळ्यात तुळशीमाळ, मुखी हरिनाम, शाकाहार, निर्व्यसनीपणा, कपाळी टिळा, विठ्ठल दैवत असा वारकऱ्यांचा साधा सोपा आचारधर्म पंढरीची वारीसुद्धा त्यांनी करायला हवी असे नाही.

तुकारामांचं घराणं आंबिले उर्फ मोरे! हे घराणं देहू गावात प्रतिष्ठित महाजनकी चालवणारं घराणं होतं. कुणबी जातीच्या तुकारामांचं निम्म्याहून अधिक जीवन सर्वसामान्यरित्या व्यतीत झालं होतं. त्यांना चार भावंडं होती. मोठा सावजी हा आध्यात्मिक वृत्तीचा होता. पत्नीच्या मृत्यूनंतर तो घर सोडून गेला तो कायमचा. तुकारामांची पहिली पत्नी रखमा व तिचा संताजी नावाचा एक मुलगा होता. तिला दम्याच्या विकाराने ग्रासल्यावर त्यांचा विवाह जिजा उर्फ आवलीशी लावला गेला. “संसारतापे तापलो मी देवा । करिता या सेवा कुटुंबाची ।।” असे ते लिहितात. दिवसभरातील विविध व्यावहारिक संदर्भ देत घेतच त्यांची अभंगगाथा प्रसृत होत होती. त्यातच दोन वर्षांच्या दुष्काळाने सर्वत्र हाहाकार माजला. त्यांची पत्नी रखमा निवर्तली, संताजीचा मृत्यू झाला. कुठेही अन्नधान्य मिळत नाही, प्रचलित समजूतीप्रमाणे त्यांनी घरातील अन्नधान्य लोकांना देऊन टाकलं. हुंड्या फाडून टाकल्या व ते स्वतःला संसारतापापासून मुक्त करून गावाबाहेरच्या टेकडीवर जाऊन बसले. तिथे त्यांना नवं जीवनदर्शन घडलं. सामाजिक, कौटुंबिक, वैयक्तिक अशा सर्व स्तरावर अवांच्छित अपयश मिळालेले तुकाराम जीवनाकडे नव्या दृष्टीकोनातून पाहू लागले. “नाही मज कोणी आपुले दुसरे” या अवस्थेतील तुकाराम विठ्ठलाला डोळ्यासमोर ठेऊन अभंगरचनांतून आपल्या व्यथा मांडू लागले. त्यामुळे या व्यथांना व्यक्तिगत संदर्भ न राहता ती सार्वत्रिक स्वरूपाची व्यथा झाली. हा दुःखाचा प्रातिनिधिक समूह आविष्कार होता. परिणामी त्या दुःखाला मानवतेच्या असहाय्य आर्ततेचे रूप प्राप्त झालेले दिसते. “जळो माझी काया । लागली वोगवा | धाव रे केशवा | मायबापा ।।” ही आर्तता तुकारामांना त्यांच्या अहंकारापासून दूर नेते व सर्वव्यापी माणूसपण त्यांच्यात साकारते – “पंचभूतांचिये । सापडलो संदी। घातलीसे बंदी | अहंकारे ।। तुका म्हणे आता । देह देऊ बळी । करूनि सोडू होळी । संचिताची ।।

तुकारामांचा हा आक्रोश सत्यशोधनाचा होता. जीवनातील शाश्वत सत्याला शोधू पाहणाऱ्या एका अस्वस्थ संवेदनाशील मनाने, स्वतःच्या अनुभूतीच्या आधारे आत्मतत्त्वाला गवसणी घालण्याचा तो प्रयत्न होता. हे आत्मतत्त्व त्यांना स्वतःतच सापडले. ‘विष्णुमय जग | वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम | अमंगळ ।।.. तुका म्हणे एका । देहाचे अवयव । सुख दुःख जीव । भोग पावे ।।” किंवा “अरोग्यता तुका । पावला अष्टांगी। मिरविला रंगी । निजात्मरंगे ।।”

तुकारामांनी आपल्या अभंगांच्या सहाय्याने स्वतःचे उन्नयन घडवलेले दिसते. पण हे करत असताना संसाराची सर्व कामे त्यांनी जिजावर आवलीवर सोडून दिली. “नामदेवे केले । स्वमामाजी जागे ।” असे म्हणत शतकोटीचे अभंग करीन अशी मनाशी त्यांनी खूणगाठ बांधली होती आणि आवलीनंही पुरुषप्रधान संस्कृतीतल्या मराठी स्त्रीच्या आदर्श प्रारूपाप्रमाणे संसाराचा गाडा रेटला होता.

तुकारामांचं एक ऐतिहासिक कार्य फारसं लक्षात घेतलं गेलं नाही. त्यांचे व त्यांनी ज्या संप्रदायाचा अंगिकार केला त्या वारकरी संप्रदायाचे, ते ऐतिहासिक कार्य म्हणजे, त्यांनी ईश्वर आणि देव यांच्यात मध्यस्थांची स्वयंघोषित भूमिका बजावणारा पुरोहित वर्गच नष्ट केला. तुकाराम होते तोवर या पुरोहित वर्गाला फारशी किंमत नव्हती. तथापि त्यांच्या पश्चात समाजचक्रात उलटं वळण जे घेतलं ते आजतागायत. आपल्या समाजपुरुषांच्या ऐतिहासिक कामगिरीवर आपणच बोळा फिरवत असतो. “तुका म्हणे सोपी केली पायवाट | उतरावया भवसागर रे ।।” अशी त्यांची स्पष्ट भूमिका होती. एकदा ‘पायवाट’ सोपी केल्यानंतरत्यांनी अभंगातून ईश्वराच्या ‘दलाली वर कोरडे ओढले. त्यांच्या भक्तिपर काव्यातही तत्कालीन भ्रष्ट ब्राह्मणवर्ग आणि तथाकथित सरंजामदारांवर त्यांनी भेदक टीका केली आहे. “रात्रंदिन आम्हां । युद्धाचा प्रसंग ।” अशा शब्दात आपल्या भोवतीच्या परिस्थितीचं वर्णन केल्यानंतर तुकाराम स्वतःच्या कवित्वाबद्दल बोलतात – “तुका म्हणे मज । देव बोलवितो ।” किंवा “मज विश्वंभर बोलवितो ।” स्वतःच्या काव्य-निर्मितीसंदर्भात ज्ञानदेवांनंतर इतक्या निरिच्छपणे कोणी बोललं नसेल.

काळाच्या ओघात तुकाराम स्वतःच्या हयातीतच दंतकथा बनले होते. चमत्कारांची भारूडं स्वतःभोवती निर्माण झाल्यानंतर ती भारूडं फेकून देण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केला होता. “सत्यासाठी माझी शब्दवंचना” असं म्हणत ते आपल्या प्रयत्नांसंबंधी काही विधान करू पाहतात. त्यांच्या सामाजिक टीकेवरून सतराव्या शतकातील समाजरचनेचे एक प्रारूप वाचकांसमोर उभे राहते. ही टीका बोचरी असली तरीही तिच्यात सुभाषितांचं सत्त्व दडलेले दिसते – “तुका म्हणे हे । भाविकांचे वर्म । येरी धर्माधर्म । विचारावे ।।”, “भक्तिभावे विण । तुका म्हणे अवघा सिण ।।”, “एक ब्रह्मचारी | गाढवा झोंबता । हाणोनिया लाता। पळाले ते ।।”, “गाढवही गेले । ब्रह्मचर्य गेले । तोंड काळे जाले । जगामाजी ।।”, “जोडोनिया धन । उत्तम वेव्हारे । उदास विचारे । वेच करी II’, “सुख पाहता जवापाडे । दुःख पर्वताएवढे ।।”

तुकाराम जितेजागतेपणी देवत्वापर्यंत पोहोचत आहेत हे पाहून तत्कालीन धर्ममार्तडांनी त्यांची कविताच पाखंडी ठरवली होती व त्या कवितांना स्वहस्ते जलसमाधी देण्याची आज्ञा केली होती. तुकारामांना स्वतःच्या कवित्वाविषयी प्रचंड आत्मियता होती. त्यांची कविता नवी समाजमूल्ये निर्माण करते आहे याची त्यांना जाण होती. अनेक समाजमान्य संकल्पनांना त्यांनी नवे मूल्यभान प्राप्त करून दिले होते. “बाईलेचा त्याग म्हणजे ब्रह्मचर्य नव्हे,” “व्यभिचारी स्त्रीचीही जाज्ज्वल्य निष्ठा असते,” “भगवे कपडे घालतो तोच साधू नव्हे तर जो रंजल्या गांजल्यांना आला म्हणतो तोच खरा साधू ओळखावा” अशासारख्या नवकल्पना ते मांडत होते. अर्थातच सनातनी समाज ते नाकारत होता. त्यांनी मांडलेले नवे नैतिक अर्थ त्या समाजाच्या अस्तित्वाला धोकादायक होते. म्हणून ते अभंग इंद्रायणीत बुडवायला सांगितले गेले. तरीही ते अभंग लोकगंगेत तरले. ज्ञानदेवांनंतर विद्रोहाचे इतके मोठे ज्वलंत उदाहरण इतिहासात दिसत नाही. लोकगंगेने अभंग तारल्यावर हा विरक्त संत त्याचे श्रेय विठ्ठलाला देऊन मोकळा होतो व म्हणतो- “बरे होतो, दीन होतो तरी ।।”तुकारामांचे अभंग वाचताना, आज, मनात शंका उभी राहते की त्यांना नेहमीच्या त्रिमिती जगापलिकडची चौथी मिती जाणवत होती का? या चौथ्या मितीची एक वेगळीच जाणीव त्यांच्या अभंगातून जाणवते -“मीच मज व्यालो । पोटा आपुलिया आलो II,’ “मरणाही आधी | राहिलो मरोनी ।।” “आपुले मरण | पाहिले म्यां डोळा,” “आम्ही मेलो तेव्हा । देह दिला देवा । आता करू सेवा । कोणाची मी ।।” या मितीची जाण आल्यानंतर दहाकार तुकाराम सर्पाकार होतात व म्हणतात – “अणुरेणुया थोकडा । तुका आकाशाएवढा ।।” आकाशाएवढे होताना अखेरीस ते लोकात उरलो असंच म्हणतात – “तुका तुकला तुका। विश्वीं भरोनि उरला लोका ।।”

सर्वाकार होत असतानाच तुकाराम हे लोकाकार होतात. म्हणजेच सूक्ष्मातून स्थूलाकडे व स्थूलाकडून सूक्ष्माकडे त्यांचा प्रवास होत राहतो. एकदा का “याचसाठी केला । होता अट्टाहास | शेवटचा दिस। गोड व्हावा ।।” ही भावना निर्माण झाली की तुकाराम जनमानसात व लोकरूपात विलीन होऊन जातात.

निमित्त तुकारामांचे पण शोध एका कवित्वाच्या माध्यमातून निराकाराकडे जाऊन पोहोचणाऱ्या संतांचा!

–प्रा. नीतिन आरेकर

(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..