सूत :
प्रभुरामांच्या मानसमूर्तिस करुनी अभिवादन
आदिकवी वाल्मीकि आदरें रचतीं रामायण ।। १
निनादे जगतीं रामायण ।।
करुण क्रौंचवध समोर बघुनी
कवितारूपें प्रगटे वाणी
अमर जाहलें व्याधाप्रत ऋषिवर्यांचें भाषण ।। २
वरदहस्त श्रीवाग्देवीचा
सहजसिद्ध प्रासादिक भाषा
सज्ज कथाया रघुनाथांचें लोकोत्तर जीवन ।। ३
मर्यादापुरुषोत्तम रघुवर
नरपुंगव, अद्वितिय धुरंधर
जगा दिव्य आदर्श चिरंतन कौसल्यानंदन ।। ४
आश्रमात शुभब्राह्ममुहूर्तीं
रामकथा ऋषिवर्य सांगतीं
आतुर श्रोतृगणानें पुढलें ओसंडे प्रांगण ।। ५
— – सुभाष स. नाईक
Leave a Reply