माझ्या आठवणीत प्रेक्षकांना (किमान मला तरी) बेवकूफ बनविण्याचा प्रयोग ” कुंवारा बाप ” ने केला. सोलापूरच्या “आशा ” टॉकीज मध्ये ऐनवेळी मित्राने दगा दिल्यावर मी एकटाच सहामाही परीक्षा संपल्यावर या चित्रपटाला जाऊन बसलो.
माझा दगेबाज शहाणा मित्र “उमा ” टॉकीज मध्ये “संन्यासी ” ला जाऊन बसला. फसगतीचा फंडा असा की अमिताभ, धर्मेंद्र, हेमा, विनोद खन्ना अशी बिनीची नांवे – ( तीही बहुधा मेहमूद च्या प्रेमाने गेस्ट अँपिअरन्स ला तयार झाली असावीत) यांच्या नांवाने जाहिरात केलेला हा चित्रपट ! आणि माझ्यासारखी मंडळी त्याला भुलून चित्रपटाला जाऊन बसली आणि फसली. त्यामानाने संजीव, विनोद मेहरा जरा अधिक काळ पडद्यावर दिसले.
जगातल्या यच्चयावत विनोद वीरांचे दैवत आणि हास्याच्या उसासून प्रतीक्षेत असलेल्या प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत चार्ली चॅप्लिन वर बेतलेले प्रमुख पात्र ! तरीही विनोदनिर्मितीच्या केविलवाण्या प्रयत्नात फसलेली कलाकृती. उतरणीला लागलेल्या मेहमूदचा हा प्रयत्न (आणि त्या नंतरचा ” जिनी और जॉनी ” ) हास्यास्पद ठरण्याच्या जवळपासचा. ( मी “जिनी और जॉनी” पाहण्याचे पातक केले नाही.) त्यासाठी अगदी ” सज रही गली मेरी माँ ” ची कुबडीही लावून झाली.
कोठल्याही क्षेत्रातल्या नामवंताने नक्की कोठे थांबावे म्हणजे हंसे टाळता येईल याचा धडा या चित्रपटाने दिला.
पण काळजात घुसून राहिली किशोरच्या आवाजातील दर्दभरी विराणी ” आ री आजा ! ” हिंदीत किंबहुना कोठेही अंगाई गीताची फारशी चलती नसते. इथे राजेश रोशन सारख्या गुणी (आणि बव्हंशी फक्त स्वतःच्या भावाच्या चित्रपटासाठी मर्यादित राहिलेल्या ) संगीतकाराने आख्खा दर्द ओतलाय या गाण्यात !
” उडनखटोला ” हा भुसावळच्या हिंदी भाषिक मंडळींचा शब्द या गाण्यात भेटला. छोट्या मुलाला झोपविण्यासाठी वापरलेली ही अंगाई नंतर बाप-लेकांचे पार्टींग सॉंग झाले.
जाता -जाता काहीतरी अनमोल हाती लागून गेले आणि आजवर ते मी जपून ठेवलंय. मेहमूदच्या फसवण्याला माफ केलंय या एका अंगाईसाठी ! केव्हाही, कोठेही हे गीत ऐकले की आत काहीतरी अनामिक कालवाकालव होते. बापाची लेकासाठीची धडपड डोळ्यांसमोर येते. ती खोटी, फसवी असू शकत नाही (भलेही चित्रपटात ती बऱ्यापैकी बटबटीत दाखविली असली तरी ! )
आणि दरवेळी बापाने अंगाई म्हणायलाच हवी असे कुठाय? त्यासाठी त्याने कुठून आणायचा किशोरचा “सोलफूल ” आवाज ? शेवटी बापाला स्वतःची धडपड, धावाधाव असतेच की !
आजकालच्या निद्रारहीत जीवनाचे एक कारण म्हणजे अशी अंगाई गाणारे कोणी उरले नसावेत हे असू शकेल कां ?
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply