हल्ली आपल्या महाराष्ट्रात गल्लो गल्ली नवरात्रोत्सव साजरे केले जात आहेत. गणेशोत्सवापूर्वी आतुरता गणरायाच्या आगमनाची आणि गणेशोत्सव झाला की लगेच आतुरता दुर्गा आगमनाची. एका उत्सव मोड मधून दुसऱ्या उत्सव मोड मध्ये. हल्ली सगळ्यांचा सगळ्याच उत्सवामध्ये असलेला उत्साह ओसंडून वाहताना बघायला मिळतो.
इच्छापूर्ती गणेश , नवसाला पावणारा गणपती असे सगळे विसर्जित झाले की लगेच नऊ रात्रीत नचण्यासाठी सगळे सज्ज होतात. बायका तर बायका हल्ली पुरुष सुध्दा नऊ दिवस नऊ रांगांमध्ये न्हाऊन निघताना दिसतात. साड्यांच्या दुकानात रंगीबेरंगी साड्या खरेदी करताना बायकांसोबत चौका चौकातल्या गरबा उत्सव आयोजक पुरुष मंडळींची सुध्दा गर्दी वाढते आहे.
गणेशोत्सव मंडळांमध्ये असलेल्या स्पर्धेचे स्वरुप नवरात्रोत्सव मंडळांमध्ये सुध्दा बघायला मिळते आहे. गरबा नाच करणाऱ्यांसाठी विविध व आकर्षक बक्षिसे, रंगीबेरंगी साड्या, पैठण्या , फॅन्सी ड्रेस आणि मग बक्षीस समारंभ आणि पुरस्कार सोहळे. नऊ दिवस कार्यक्रमांची नुसती रेलचेल सुरू असते. अबाल वृध्द स्त्री पुरुष सगळे नटून थटून नऊ दिवस गोल गोल फेऱ्या देत एकमेकांच्या हातावर टाळ्या देत ठेक्यात नाचत असतात.
कोणी नाचत असतात, कोणी नाचणाऱ्याना बघत असतात तर कोणी आपल्याला नाचताना बघतय की नाही हे बघत असतात. एकूणच काय जो तो आनंदात असतो.
गरबा मंडळात नऊ दिवस नऊ रंगांच्या भरजरी पैठण्या वाटल्या जाणार आहेत ही बातमी सगळ्या गावभर पसरली होती. गावात नव्याने लग्न होऊन आलेल्या नवरीचे नाव लक्ष्मी होते पण माहेरी दोन वेळचे पोटभर जेवायला मिळायचे तेवढेच लग्न झाल्यावर सुध्दा मिळत होते एवढेच काय ते नावाच्या लक्ष्मीचे नशीब होते. लक्ष्मीला पैठणी बद्दल कुतूहल वाटायला लागले एक दिवस ती गरबा बघायला गेली आणि तिथे नटून थटून नाचायला आलेल्या बायकांना बघून थिजून गेली. चेहऱ्यावर थापलेले फाऊंडेशन ओठांना लावलेले लिपस्टिक आणि त्यादिवशी असलेल्या रंगाचे मॅचींग बांगड्या, चपला ,टिकल्या आणि हातातल्या टिपऱ्या बघून तिला स्वतःच्या गरिबीची कीव आली. तिला तिची घुसमट होत असल्या सारखे वाटले. ती निराश होऊन घरी जायला निघणार एवढ्यात dj वर मोठ्या आवाजात परी हू मै वाजायला लागले. परी हु मैं सुरू होताच तीन वर्षाच्या चिमुकली सह दहा, पंधरा, वीस, पंचवीस, तीस, पस्तीस आणि चाळीस वर्षांच्या पऱ्या एक हात वर करून एक पाऊल पुढे करून मग एक पाऊल मागे करून दुसऱ्या हाताने विरुद्ध दिशेने येणाऱ्या इतर पऱ्या किंवा राजकुमाराच्या हातावर टाळ्या द्यायला लागल्या. लक्ष्मीला हे बघताना गम्मत वाटायला लागली. बघता बघता तिला असे जाणवायला लागले की काही पुरुष नाचणाऱ्या बायकांकडे कौतुकानं, कुतूहलाने तर काहीजण विक्षिप्त नजरेने बघत आहेत. एका बाजूला तरुण पोरांचे घोळके मुलींकडे आशाळभूतपणे बघून आपसात काहीतरी जोक केल्यासारखे बोलताहेत आणि खो खो करून जोरात हसताहेत. हळू हळू तिला तिच्यासारख्या बायका पण दिसायला लागल्या ज्यांच्या अंगावर साध्या साड्या होत्या त्यांच्याकडे बघून तिला जरा हायस वाटलं. कितीतरी मुली व स्त्रिया त्यांच्या नाचण्यात गुंग होऊन गरब्याचा आनंद लुटत होत्या पण त्याचवेळी त्यांच्याकडे बघणाऱ्या पुरुषांच्या वेगवेगळ्या नजरा कोणाला जाणवत होत्या की जाणवून दुर्लक्षित केल्या जात होत्या हे त्या दुर्गा मातेलाच माहिती असा विचार लक्ष्मीच्या मनात आला.
शेवटी स्पर्धेचा निकाल लागला, संपूर्ण परिसरात बॅनर वर जेवढ्यांचे फोटो होते निदान तेवढे तरी आयोजक स्टेजवर उपस्थित होते. नटून थटून आलेल्या एका महिलेला पैठणी देण्यात आली. लक्ष्मीला पैठणीची लकाकी लांबूनच दिसली पण तिला वाटले आपल्याला दोन वेळचे पोटभर जेवायला मिळतं तेच बस आहे. उत्सव आणि सण श्रीमंतांनी साजरे करावे आणि गरिबांनी बघावे हीच तर जगाची आणि जगायची रीत झालिये हल्ली.
© प्रथम रामदास म्हात्रे.
मरीन इंजिनियर.
B.E. (mech),DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply