जन्म: १९ ऑगस्ट १९१८
मृत्यू: २६ डिसेंबर १९९९
शंकर दयाळ शर्मा यांना अनेक मानसन्मान मिळाले. भारतीय विद्यापीठांसह लंडन व केंब्रिज विद्यापीठाने त्यांना सन्मान्य डॉक्टरेट पदव्या देऊन गौरविले. पहिला श्री. चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय पुरस्कारही त्यांना देण्यात आला होता.
कार्यकाळ : २५ जुलै १९९२ ते २५ जुलै १९९७
भारताचे नववे राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी स्वांतत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांचा जन्म भोपाळ येथे झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध वैद्य होते. त्यांचे प्रारंभिक शिक्षण भोपाळ आणि आग्रा येथे झाले. शंकर दयाळ शर्मा यांनी अलाहाबाद विद्यापीठातून एम.ए. (१९३९) लखनौ विद्यापीठातून एल.एल.एम. तसेच केंब्रिज विद्यापीठ आणि लिंकन्स इन (इंग्लंड) या विद्यापीठांमधून अनुक्रमे पीएच. डी. व बार ॲट लॉ या पदव्या मिळविल्या. भारतात परतल्यावर त्यांनी लखनौ विद्यापीठात कायदा विषयाचे प्रपाठक म्हणून काम केले. केंब्रिज आणि हार्व्हर्ड या विद्यापीठातही त्यांनी अल्पकाळ अध्यापन केले. भारत छोडो आंदोलनाच्या वेळी त्यांनी राजकरणात प्रवेश केला. त्यांना आठ महिने तुरुंगवासदेखील भोगावा लागला. १९५०-५२ दरम्यान त्यांनी भोपाळ संस्थानातील काँग्रेसच्या अध्यक्षपदी होते. याच सुमारास त्यांचा विमला यांच्याशी विवाह झाला. १९५२ ते ५६ या काळात ते भोपाळच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. पुढे भोपाळ मध्य प्रदेश राज्याचा भाग बनल्यावर ते मध्य प्रदेश राज्यात मंत्री झाले. मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व नंतर अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम पाहिले. १९७२ ते ७४ दरम्यान ते अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि लोकसभेवरही निवडून आले. त्यानंतर त्यांनी आंध्र प्रदेश, पंजाब आणि महाराष्ट्र या राज्यांचे राज्यपालपद भूषिवले. १९८७ साली ते काँग्रेसतर्फे उपराष्ट्रपती या पदावर निवडून आले.
Leave a Reply