नवीन लेखन...

निपटारा – भाग  3

दोन दिवसांनी आम्ही जमलो. सगळ्याजणी माझी योजना ऐकण्यास अगदी आतूर झाल्या होत्या. त्यांची उत्सुकता अगदी शिगेलाच पोहचली होती म्हणाना.

मी फार न ताणता सुरुवात केली. “आपल्यापैकी बऱ्याचजणी नाट्यविभागात जातात. तिथेच या सर्व प्रकाराचे मूळ आहे अशी माझी पक्की खात्री आहे. आता फक्त आपला संशय पक्का करायचा की झाले. त्यासाठी मी एक युक्ती करायची ठरवली आहे. वासंती, तू आर्ट स्कूलमधे कॅलीग्राफी शिकतेस. तू एक काम करायचं. अरूच्या हस्ताक्षरासारखे हस्ताक्षर काढून एक चार ओळीचं पत्र तयार करायचं. त्यासाठी जाडा भरडा ड्रॉइंग पेपर वापर.

“तो कशाला?” वासंती.

‘अग म्हणजे त्यावर हाताचे ठसे उमटायचे नाहीत.” मी.

“हाताचे ठसे?” वासंती किंचाळलीच.

“मधू, हे असले लफडे मी नाही हां करणार! मला यात ओढू नकोस.

मला फार भीती वाटते.

“अग, जरा ऐकून तरी घे. तू काही चिंता करू नकोस. माझी पूर्ण योजना ऐकल्यावर तुमची पण खात्री पटेल की यात काही धोका नाही. आधी ऐकून घ्या मग मी तुमच्या सर्व शंकांचे निरसन करीन. हं तर वासंती, हा पहा पत्राचा नमुना. मी पत्राचा नमुना दाखवला.

लाडक्या,

मला तुझी फार फार आठवण येते रे, तुझ्या भेटीसाठी मी तळमळते आहे. आपल्या मुलाला घेऊन मी ‘त्या’ ठिकाणी तुझी वाट पहात आहे. तुला मिठीत घ्यायला मी फार आसुसले आहे रे. येशील ना रे? ये, लवकर ये रे माझ्या राजा, लाडक्या.

तुझी जन्मोजन्मीची सखी.

“या पत्रावर कुणाचेही नाव लिहायचे नाही. खाली सहीपण करायची नाही. हे पत्र त्या तिघांना पाठवायचे. ते त्यांना कसे मिळेल ते मी पाहीन. त्यानंतर आपण त्यांच्यावर पाळत ठेवायची. या प्रकारामागे जो असेल तो या पत्राने नक्कीच अस्वस्थ होईल. त्यामुळे त्याच्या वागण्या बोलण्यातही निश्चितच फरक पडेल. या तिघांनाही आपण चांगलेच ओळखतो. त्यांच्याशी सहजच बोलतो असे दाखवून एकीने हळूच हा विषय काढायचा आणि दुसरीने त्याच्यावर बारीक नजर ठेवायची. पत्राचा मात्र चुकूनही उल्लेख करायचा नाही. दोघी दोघींची जोडी करून एकेका जोडीने एकेक सावज जाळ्यात ओढायचं. कळलं?”

‘तशी ठीक वाटते योजना. समजा यातून अपेक्षित सावज सापडलं तर पुढे काय?” शैला.

“ते सर्व त्या सावजावर अवलंबून राहील. त्याचा स्वभाव, वागणे, बोलणे, आवड, निवड, वीक पॉइंटस् यावर अवलंबून राहील. त्याचा अभ्यास करून आपण पुढची खेळी खेळायची.” मी.

ठराव पास झाला. ठरल्याप्रमाणे संशयितांना पत्र पोहोचविण्याची मी व्यवस्था केली. पुढचे आठ-दहा दिवस आम्ही ठरल्याप्रमाणे सावजाचा माग काढत राहिलो आणि आम्ही अंदाज केल्याप्रमाणेच या घटनेमागचा सूत्रधार नाट्यशास्त्र विभागातले नवे तरुण प्रोफेसर, मनोज सरच आहेत हा आमचा होरा खरा ठरला. त्याचे असे झाले,

शैला आणि शोभा नाट्यशास्त्र विभागातच अरू बरोबर नेहमी जात असत. म्हणून आम्ही त्यांचीच नियुक्ती मनोजसरांवर नजर ठेवण्यासाठी केली होती. मनोजसर अरू बरोबर जरा जास्तच अघळपघळपणा करायचे. पण त्यावेळी शैला आणि शोभाला अरूच्या एकंदर मोकळ्या स्वभावाने त्याचे फारसे काही वाटत नसे. शिवाय अरूला राज्य नाट्य स्पर्धेत आपल्याला मुख्य भूमिका मिळावी असे वाटत असे. त्यामुळे ती सरांशी जास्त दोस्ती करते असाच त्यांचा समज झाला होता. पण आता त्यांच्या मनात त्या मागचा मनोजसरांचा काय कावा असावा त्याचा अंदाज येत होता. शैलाने बोलता बोलता सहजच वाटेल असा राज्य नाट्यस्पर्धेचा विषय काढला.

“सर, यंदाच्या नाट्यस्पर्धेसाठी अरू नसणार. ‘ती तुमची फार आवडती विद्यार्थीनी होती ना? आता तुम्ही तिच्या जागी कोणाला चान्स देणार? तिची फारच आठवण येत असेल नाही तुम्हाला?” ते चपापले.

“छे, छे! अग आठवण कसली?” पण हे म्हणताना त्यांच्या नजरेत भीती जाणवली त्या दोघींना. मग शैलाने आणखी थोडी ढील दिली.

“सर, तुमची म्हणे मनीषा चोणकरशी मैत्री आहे. सर, आम्हाला पण द्या ना थोडा ब्रेक!” ते आणखीनच चपापले. पण आपण हे अगदी सहजच बोलतो आहोत असे दाखवून त्या दोघींनी सरांना चांगलेच हरबऱ्याच्या झाडावरच चढवले. त्यांच्या लाडिकपणाला सर भाळले. सोकावलेला बोका जसा लोण्याच्या गोळ्यावर डोळा ठेवून असतो तसं मनोजसर मनातून फारच खूष झाले. वरवर सहज बोलतो असे दाखवून ते म्हणाले,

“यंदाची नाट्यस्पर्धा आपण गाजवायची. तुमच्या सारख्या उत्साही मुलींची तयारी असेल तर मी तुम्हाला खास प्रशिक्षण देईन. पण तुम्हाला फार मेहनत करावी लागेल. शैला, तुझ्यात तर फारच टॅलेंट दिसते मला. जरा मेहनत केलीस तर कुठच्या कुठे जाशील.” एक दिवस तर आसपास कुणी नाही असे पाहून त्यांनी शैलाला मुंबईला येशील का? म्हणूनही विचारले. सावज तर मिळाले, आता त्याला टप्प्यात घ्यायचे, आमीष दाखवायचे आणि सापळा लावून फास आवळायचा!

आमच्या पुढच्या बैठकीत मी माझी सगळी योजना सविस्तर सांगितली. मनोजसरांची उंच ठिकाणांची भीती आणि त्यांचा स्त्रीलंपटपणा याचा कसा खुबीने उपयोग करून घ्यायचा ते सांगितले. या योजनेत आम्ही आमच्या काही खास विश्वासू मित्रांनाही घ्यायचे ठरवले. कारण आम्हा मुलींनाच हे जमले नसते. त्यासाठी मुलामुलींचा ग्रुप आवश्यक होता.

योजनेवर सर्व साधकबाधक चर्चा करून तपशील ठरवला. प्रत्येकाने सोपवलेले काम काय, कसे आणि केव्हा करायचे ते पक्के ठरवले. प्रत्यक्ष जागेवर जाऊन रंगीत तालीम केली. जागा पक्क्या केल्या.

लवकरच कॉलेजला हिवाळी सुट्ट्या लागणार होत्या. त्या सुट्ट्यातच नाटकाची निवड, तयारी, तालीम, पात्र निवड हे होणार होते.

ठरल्याप्रमाणे नाट्यशास्त्र विभागात आमचा ग्रुप जमला. मनोजसर होतेच. कोणते नाटक बसवायचे यावर खूप चर्चा झाली. शैला म्हणाली (आम्ही आधीच ठरवल्याप्रमाणे) “सर, आपण भूपेश आणकुचीदार यांचे ‘कोणी नाही तिथं’ हे नाटक बसवू या का? छान सस्पेन्स आहे. खूप थ्रिलिंग आहे. खूप मजा येईल. त्या नाटकात नायक नायिका भीतीने एकमेकांना मिठ्या मारतात असे खूप प्रसंग होते. आम्ही मुद्दामच ते नाटक निवडले होते. कारण शिकवण्याच्या नावाखाली मिठ्या मारण्याला मनोजसरांना फूल स्कोप होता. सरांनी तर तत्काळ होकार दिला. आमचे अर्धे काम तिथेच पक्के झाले.

नाटक तर ठरले. दोन दिवस सरांनी नाटकाचे वाचन, पात्रांची निवड वगैरे सोपस्कार उरकले. अपेक्षेप्रमाणे शैलाची मुख्य भूमिकेसाठी निवड झाली. सरांनी सगळ्यांना आपापल्या भूमिका समजावून दिल्या. पाठांतर चोख करायच्या सूचना दिल्या. तिसऱ्या दिवशी आमच्या योजनेत ठरल्याप्रमाणे सहजच बोलतो असे दाखवून एक प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव मंजूर होण्यावर आमच्या योजनेचा सारा डोलारा उभा होता.

“सर, आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिस इथे नको करूया.

“का बरं? काय अडचण आहे?” मनोजसर.

“सर इथं कॉलेजची पोरं पोरी येतात. नंतर बाहेर ते आमची जाम टिंगल टवाळी करतात. तुम्हाला पण सर शिकवताना अकवर्ड होत असेल नाही?” शैला.

“छे छे! मला काही नाही होत अकवर्ड बिकवर्ड पण तुझे म्हणणे पण बरोबर वाटते. पण आता दुसरी कोणती जागा मिळणार?’ पण मनातून त्यांना शैलाचा प्रस्ताव पसंत पडल्याचे दिसले. सावज अमिषाला भुलले होते. पण पुढे शैलाने जे ठिकाण सुचवले ते ऐकून त्यांचे धाबेच दणाणले. शैला म्हणाली, “सर आपण निपट निरंजन लेण्यांच्या एखाद्या लेण्यात प्रॅक्टिस घेतली तर?”

“काय? निपट निरंजन? शैला तुला काय वेड बीड तर नाही लागलं? मनोजसर ओरडलेच. “अगं तिथं कुणी चिटपाखरूही नसतं बहतेक वेळी. नाही नाही हा प्रस्ताव मला बिलकुल मान्य नाही.

“पण सर, तिथं किती शांतता असते? शिवाय उंचावर असल्यामुळे हवाही अगदी मोकळी असते. शिवाय एकदा तिथे गेल्यावर कोणी येणार नाही आपल्याला डिस्टर्ब करायला. बरोबर डबे घेऊन जायचे. सकाळी लवकर निघायचे आणि संध्याकाळी अंधार पडायच्या आत परतायचे. शिवाय आपला एवढा मोठा ग्रुप असल्यावर घाबरायचे कशाला? पिकनिक आणि प्रॅक्टिस दोन्ही होईल! शिवाय तुम्हालाही शिकवायला थोडा मोकळेपणा मिळेल.” शैला.

“हो, हो, मस्त आहे आयडिया.” प्रकाशने दुजोरा दिला. तो नाटकातला मुख्य नट होता. तो पुढे म्हणाला, “सर गेल्याच वर्षी आमची पिकनिक गेली होती तिकडे. तेव्हा आम्ही तिथल्या तीन नंबरच्या लेणीमध्ये अंताक्षरी खेळलो होतो. जाम धम्माल आली होती सर. प्रॅक्टिस ला खरंच फार मस्त जागा आहे सर.”

“नो, नो. नाही. मला हे बिलकुल मान्य नाही. शिवाय मला प्रिन्सिपॉल घाटपांडेसरांची परवानगी घ्यावी लागेल. सगळी जबाबदारी माझ्यावरच पडेल. छे, छे, हे मला नाही जमायचे.”

“सर, आम्ही काढतो त्यांची परवानगी. शिवाय आम्ही काही आता लहान मुलं थोडीच आहोत? मनोजसर, तुम्ही मुळीच घाबरू नका. आपला एवढा मोठा ग्रुप असल्यावर कशाला घाबरायचे? सर, निपट निरंजन लेणी तशी फार लांब नाहीत. आपल्या विद्यालयापासून जेमतेम तीनचार किलोमीटरवर तर आहेत. म्हणजे गावातच की आपली तयारी खूप मस्त होईल सर तिथे.” प्रकाशने आग्रह धरला.

“सर, म्हणाना हो, तुम्ही किनई सर खूप छान शिकवता. पण मला नाही जमत इथं काम. फार संकोच होतो. तुमच्या शिकवण्याप्रमाणे संपूर्ण अॅक्टींग करायला इथं फार कानकोंडं वाटतं. चला ना सर, काय एवढे घाबरताय?’ शैलाने मायाजाल पसरले.

सर्वांसमोर आपण घाबरतोय हे दिसू नये म्हणून सर म्हणाले, “ठीक आहे. मी तयार आहे. पण सरांची परवानगी तुम्ही घ्यायची. मी अजिबात मध्ये पडणार नाही.” मनातून त्यांना खात्री असावी की घाटपांडेसर परवानगी देणार नाहीत आणि आपली झाकली मूठ झाकलीच राहील. पण झाले उलटेच (म्हणजे आम्हाला हवे होते तसेच) घाटपांडेसरांनी कुरकुरत का होईना पण परवानगी दिली. ‘अरू’च्या प्रकरणामुळे नाही म्हटले तरी कॉलेजचे नाव थोडे बदनाम झाले होते. त्यात आणखी काही वेडेवाकडे होऊ नये असे त्यांना वाटणे स्वाभाविकच होते. पण आमचा सगळ्यांचा आग्रह पाहून ते म्हणाले, “हे पहा मुलांनो, तुम्ही सर्व आता जाणते आहात. तुमची जबाबदारी तुम्हाला समजते. माझी काही हरकत नाही. पण माझी एकच अट आहे, आपल्या मालशे मॅडम जर तुमच्याबरोबर यायला तयार असतील तर मी परवानगी देईन.

-विनायक अत्रे

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 91 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..