मालशे मॅडम म्हणजे आमच्या फिजिकल ट्रेनर आणि स्पोर्टस् विभाग प्रमुख. खूप सिनियर. पण उत्साह दांडगा. ट्रेकिंग कँप, पिकनिक वगैरे प्रोग्रॅम त्यांच्या खास आवडीचे. विद्यार्थ्यांमध्ये जाम पॉप्युलर. पण दिवाळीच्या सुटीमध्ये त्यांचे येणे जरा अवघडच वाटत होते. आमची योजना बारगळते की काय असे वाटले. पण त्या लगेच तयार झाल्या. अर्थात त्या आल्यामुळेच आमच्या योजनेचा बोजवारा उडण्याची शक्यता होतीच. पण ते पुढचे पुढे. आता आमची योजना ‘स्थळ’ पक्क होणे या टप्प्यावर होती आणि तो टप्पा आम्ही विनासायास गाठला होता. मालशे मॅडमचा अडसर कसा दूर करायचा ते ठरवायला आमच्याकडे खूप वेळ होता. आताच कशाला काळजी? अर्थात त्यांच्या येण्याने मनोजसरांच्या चाळ्यांना थोडा आळा बसणार हेही खरे होतेच. मी ग्रुपला म्हणाले, “अरे सध्या परवानगी तर मिळाली. त्यातून कसा मार्ग काढायचा ते पाहू. अजून आठ दहा दिवसांचा अवधी आहे. पाहू, काहीतरी मार्ग सापडेलच.’
ठरल्याप्रमाणे निपट निरंजन लेण्यात आमच्या तालमी सुरु झाल्या. कॉलेजपासून लेणी चार पाच किलोमीटरवर होत्या. मधे बिबीका मकबरा, निपट निरंजन मठ, सोनेरी महल ही पुरातत्व खाताच्या ऑफिसची जुनी, जुन्या पद्धतीची परंतु उजाड परिसर असणारी वास्तू या खेरीज संपूर्ण परिसर निर्मनुष्य, ओसाड, येणारे पर्यटक बिबीका मकबरा पाहूनच परत जात. पुढे निपट निरंजन लेण्यामध्ये पाहण्यासारखे काही नाही, त्यामुळे फुकट तीन चारशे पायऱ्या कोण चढणार? शिवाय आसपास सगळे सपाट, उजाड, त्यात काय पहायचे? पायऱ्या पण ओबडधोबड. नाटकाच्या तयारीला मात्र उत्तम जागा. शांत तर इतकी की टाचणी पडली तरी आवाज यावा.
पहिल्या दिवशी वर जाताना मनोजसर जरा अस्वस्थ वाटले. पायऱ्या चढताना शक्यतो मागे वळून पहायचे टाळत होते. ग्रुपच्या मधून मधून चढत होते. कडेला जायचे तर नावच काढत नव्हते. पण पुढे दोन तीन दिवसात आणि तालमींच्या नादात ते पिकनिकच्या मूडमध्ये आले. त्यांची भीती चांगलीच चेपली. शिवाय शिकवण्याच्या नावाखाली त्यांना पाचकळपणा करायला भरपूर वाव होता. शैला पण, “सर सीन नीट समजावून सांगा ना’, असे उत्तेजन देत होती. खेळवत होती. सर तर आता चांगलेच निर्ढावले. मालशेमॅडमनाही त्यांचा लघळपणा फारसा पसंत नव्हता. पण जोपर्यंत प्रत्यक्ष काम करणाऱ्या मुलामुलींचा काही आक्षेप नव्हता तोपर्यंत त्यांचा काही विरोध करण्याचा प्रश्नच नव्हता. तरी पण एकदोनदा त्यांनी मनोज सरांकडे आपली नापसंती व्यक्त केली. पण त्यांनी तिकडे दुर्लक्षच केले. मालशेमॅडम गप्प बसल्या.
मनोजरसर आता आमच्या जाळ्यात चांगलेच फसले होते. आता फासा टाकायची वेळ आली होती. पण अडचण होती ती मालशे मॅडमची. एकदा वाटले की त्यांनाही आपल्या कटात सामील करून घ्यावे. पण त्या कॉलेजच्या स्टाफवर असल्यामुळे ती शक्यता शून्यच होती.
पण ही अडचण अगदी अनपेक्षितपणे संपली. म्हणजे एके दिवशी त्या म्हणाल्या, “मनोजसर, उद्या मला लवकर घरी जायला हवे. संध्याकाळी पाहुणे यायचेत. आता आपली प्रॅक्टिस संपत आली आहे. उद्या जरा लवकर आटपा, आपण अर्धा दिवस सुट्टी घेऊ.” पण मनोज सर आता चांगलेच चटावले होते. त्यांची नाहीतरी त्यांना अडचण होत होती. ते आनंदाने म्हणाले, “हो, हो. जा ना. तुम्ही एक दिवस नाही आलात तरी चालेल. काय रे मुलांनो तुम्हाला काय वाटते?” आम्हाला तर काय आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन असेच वाटले. आम्ही एक सुरात ओरडलो “हो, हो चालेल आम्हाला. मॅडमना द्या एक दिवसाची सुट्टी.” मालशेमॅडम म्हणाल्या, “ठीक आहे. पण मी अर्धा दिवस तरी येईनच. जरा लवकर जाईन, तेवढे मला पुरे.
“ओ.के. जशी आपली मर्जी.” मनोज सर नाटकीपणे म्हणाले.
मी ह्याच संधीची वाट पाहत होते. आमच्या शिकारीचा बेत, फायनल किल, उद्याच करायचा विचार मी पक्का केला. मी म्हणाले, “सर आता आपली तयारी तर छानच झाली. सगळ्यांचे संवाद, अॅक्शन्स पाठ झालेत. उद्याच आपण आपले शिबिर संपवू. फार फार तर उद्या आपण एखाद दुसरा तास जास्त वेळ तालीम करू.” माझा हेतू’ लक्षात येताच सगळे ओरडलेच, “हो सर, मधू म्हणते ते खरे आहे. आता आम्ही आमची प्रॅक्टिस घरी किंवा विभागात येऊन करू. आता अभ्यासासाठीही थोडा वेळ हवा. घरचे लोकही म्हणायला लागलेत की पुरे आता ही नाटकं, थोडं अभ्यासाकडेही लक्ष द्या म्हणून!” शेवटी उद्या जरूर वाटल्यास थोडा वेळ जास्त थांबून तालमीचे सूप वाजवायचे असे ठरले. मालशेमॅडम म्हणतच होत्या, “उद्या नको, परवा ठेवा म्हणजे मी पण असेन शेवटपर्यंत.” पण आम्ही मात्र आलेली संधी सोडायची नाही असे ठरवून त्यांना म्हणालो, “मॅडम, तुम्ही खुशाल जा लवकर. काही काळजी करू नका. अहो आता का आम्ही लहान बाळं आहोत? शिवाय इतके दिवस तुम्ही पाहताच आहात ना की सगळं कसं व्यवस्थित चालू आहे ते?” शेवटी त्या कबूल झाल्या.
दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे तालीम सुरु झाली. आज मनोजसरांचा शिकवण्याचा उत्साह तर अगदी उतू चालला होता. शिकवण्याच्या नावाखाली मिठ्या मारण्याच्या प्रकारातून कधी सुटते असे शैलाला झाले होते. मनातून ती मला जाम शिव्या देत असणार, पण मैत्रिणीच्या प्रेमापोटी ती सारे सहन करीत होती. दुपारी मालशेमॅडम गेल्या आणि मग तर काय मनोजसर अगदी चेकाळलेच. म्हणाले, “शैला, यू आर ग्रेट. मस्त काम करतेस. भीतीने थरकाप उडाल्यावर तू जो मुद्राभिनय करतेस ना, सुपर्ब! यंदाचं राज्यनाट्य स्पर्धेचं बक्षीस आणि मुख्य नटीचे बक्षीस आपल्यालाच! पण तुला अजून थोडी प्रॅक्टिस हवी. चल मी दाखवतो तुला.”
पुढच्या प्रसंगाच्या विचाराने शैला हादरली. म्हणाली, “सर आता पुरे. अति सरावामुळे माझी दमछाक होते. संवादही विसरायला होतात. आज आपण क्लायमॅक्सच्या प्रसंगाची सात-आठ वेळा उजळणी केली. आता मी दमले. आता तुम्ही बाकीच्यांची तयारी करा. मी नाट्यशास्त्र विभागात एकटी येऊनही तालीम करीन. आता सगळा ग्रुप नसला तरी चालेल, तेव्हा तुम्ही माझी भूमिका घोकून घ्या.
हे ऐकून मनोजसर तर मनातल्या मनात अगदी जिभल्याच चाटू लागले. आनंदाने म्हणाले, “ठीक आहे, ठीक आहे. शैला तू म्हणतेस तसंच करू. तू आणि प्रकाश येत जा. तुमचेच काम जास्त आहे. आपण खूप मेहनत घेऊ. हे नाटक तुला मस्त ब्रेक देणार. बघशीलच तू!”
मी मनात म्हणाले, “अरे चोरा अस्सं काय? चोराच्या मनात चांदणं. समजेलंच पुढे जेव्हा तुझ्या डोळ्यासमोर चांदण्या चमकतील तेव्हा!” तालमीच्या अंतिम टप्प्यात किती वेळा गेला समजलेच नाही. म्हणजे आम्ही मुद्दामच तिकडे दुर्लक्ष केले. कारण आमच्या ख-या नाटकाला संध्याकाळच्या धूसर वातावरणाचाच बॅकड्रॉप हवा होता. लेण्यात अंधारु लागले तसे आम्ही बाहेर पडलो आणि लेण्यांपासून अंतरावर जिथे मोकळी जागा होती, तिथे उघड्यावरच आम्ही तालीम चालू ठेवली. तालीम संपत आली तसे आमच्या ध्यानात आले की सगळीकडे, अंधारून आले आहे. हिवाळ्याचे दिवस ते दिवस लवकर मावळत होता. तालमीच्या नादात आणि उंचावर असल्यामुळे काही जाणवले नाही, पण तालीम संपताच एक विचित्र सन्नाटा सगळीकडे पसरला आहे असे वाटले, आसपास दूरवर ओसाड माळरान, भकास राखाडी रंगात बुडालेला उदास परिसर, मागे लेण्यांचा प्रचंड डोंगर एखाद्या प्रचंड श्वापदासारखा अंगावर येतोय की काय असा खडा आमचेच आवाज आम्हाला गिळतात की काय असं वाटू लागले, लेण्यांच्या गुहांचे एका माळेत असणारे अंधारे बोगदे जणू जबड़ा बासून बसले आहेत असा भास व्हायला लागला. आम्ही ज्या बातावरणाची अपेक्षा केली होती, त्यापेक्षाही प्रत्यक्ष परिस्थिती भयानक होती. आमचा थरकाप उडाला, तरी मी धीर एकवटून म्हणाले, “शैला, आता सगळ्यांना खूप भूक लागली आहे. काढ पाहू, ‘भत्ता म्हणजे कोरडी भेळ.’ चणे, मुरमुरे, खारेदाणे, डाळं, फरसाण, शेव, त्यावर मिरची, बारीक कांदा चिरून घालायला, कोथिंबीर, लिंबू पिळायचे. भत्याचा आम्ही पाच मिनिटात फडशा पाडायचो, पण मात्र इथून कधी सटकतोय असे प्रत्येकाच्या मनात होते, पण आमच्या शिकारीचा हा तर शेवटचा टप्पा होता आणि ‘भत्ता’ हा परवलीचा शब्द होता आमच्या नाटकाचा पडदा उघडण्याचा!
-विनायक अत्रे
Leave a Reply