मी अकरावीत असताना तिचा ‘लैला मजनू’ हा चित्रपट पहिल्यांदा अल्पना टाॅकीजला पाहिला. ऋषी कपूर बरोबर तिची चंदेरी दुनियेत नुकतीच ‘एंट्री’ झालेली होती. मी बीएमसीसीला गेलो, तेव्हा तिचा ‘ऑंखियों के झरोंखों से’ प्रदर्शित झाला. वर्षभरानंतर तो मॅटिनीला लागला होता, नीलायम टाॅकीजला. एके दिवशी मी, तो पहायला गेलो..
चित्रपट सुरु झाल्यापासून ते ‘दि एण्ड’ पर्यंत मी पूर्णपणे भारावून गेलो.. सचिन आणि रंजिता यांच्या प्रेम कहाणीत समरसून गेलो.. त्या चित्रपटातील सर्वच गाणी सुमधुर आहेत. रवींद्र जैन यांनी लिहिलेल्या अर्थपूर्ण गीतांना, सुमधुर संगीतही त्यांनीच दिलंय..
त्या दोघांचं काॅलेजमध्ये एकमेकांशी प्रेम जुळतं.. लिली, ख्रिश्चन असते, तर हा हिंदू. दोघांचं प्रेम फुलत असताना, तिला स्वतःला असाध्य आजार झाल्याचं समजतं व तेव्हापासून ती सचिनला टाळू लागते.. शेवटी तिचा त्या आजारात मृत्यू होतो…
या चित्रपटात मोजकीच गाणी आहेत.. पहिलं काॅलेजच्या कवि संमेलनातलं ‘बडे बढाई ना करे.. बडे ना बोले बोल..’ दुसरं, लायब्ररी व वर्गातील ‘एक दिन, तुम बहुत करीब होंगे.. एक दिन..’ या गाण्यात ते दोघं गातात व बाकी सगळे पुतळ्यासारखे स्धिर बसलेले दाखवले आहेत..
जे ‘टायटल साॅंग’ आहे, ‘अखियों के झरोखों से, मैं ने देखा जो सावरे..’ हे अप्रतिमच आहे.. हेमलताच्या गोड आवाजातील, प्रत्येक शब्द हृदयात हळुवार उतरतो.. ते दोघे लाल रंगाच्या कारमधून फिरतात.. कधी हिरवळीवर तर कधी एखाद्या ओढ्याच्या काठावर बसतात.. हे गाणं संपूच नये असं वाटत रहातं…
आज हा चित्रपट पाहून सुमारे बेचाळीस वर्ष झालेली आहेत.. मात्र यातील एक जरी ओळ कानावर पडली तरी, मन पुन्हा त्या काळात जातं.. मनाला हूरहूर वाटते.. हे सामर्थ्य आहे, त्या अंध गीतकाराचं, संगीतकाराचं, कॅमेरामनचं, सचिनचं आणि सर्वात जास्त त्या निरागस लिलीचं!!
कोण कुठली एक पंजाबी मुलगी. पासष्ट वर्षांपूर्वी आजच्या तारखेला जन्माला आली.. माध्यमिक शिक्षणानंतर पुण्यातील ‘एफटीआय’मध्ये अभिनय अभिनय शिकली व विसाव्या वर्षी पहिल्या चित्रपटात ‘लैला’च्या भूमिकेत चमकली..
१९७८ मध्ये तिचे प्रदर्शित झालेले सर्व चित्रपट गाजले.. ‘दामाद’ मध्ये ती अमोल पालेकर बरोबर होती. ‘पती, पत्नी और वो’मध्ये संजीव कुमार बरोबर.. ‘मेरी बीवी की शादी’मध्ये पुन्हा अमोल पालेकर बरोबर..
त्यानंतर तिची जोडी जमली मिथुन चक्रवर्ती सोबत! त्यांचे अनेक चित्रपट आले, यशस्वी झाले. त्यातील ‘तराना’ हा चित्रपट मी तीन वेळा तिच्यासाठीच पाहिला.. ‘आप तो ऐसे न थे’ या चित्रपटातील गाणी उत्तम होती.. ‘उस्तादी उस्ताद से’ सारख्या चित्रपटांमुळे तिची कारकिर्द लवकर संपुष्टात आली.. ‘सत्ते पे सत्ता’ चित्रपटात ती सहकलाकार म्हणून अमिताभ बच्चन बरोबर होती..
१९८३ साली ‘हादसा’ नावाचा चित्रपट तिने फिरोज खानचा धाकटा भाऊ, अकबर खान बरोबर केला. त्यानंतर तिचे नाव त्याच्यासोबत जोडले गेले.. दहा वर्षांतच तिचं करीयर ओहोटीला लागलं.. तिनं २०१२ पर्यंत काम केलं, मात्र तोपर्यंत वसंत ऋतू संपून, ग्रीष्म सुरु झाला होता..
वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षी तिने लग्न केलं व आज ती अमेरिकेत आपल्या पती व मुलासह रहाते आहे…
खरं पहाता, ती एक हिंदी सिने अभिनेत्री.. मात्र तरीदेखील तिच्याबद्दल आपल्याला आपुलकी वाटते.. कारण आपण तारुण्यात असताना, तिचा अभिनय आपल्याला मनापासून आवडलेला असतो.. तिची मनातील ‘मोहक’ छबी, ही कधीही पुसली जात नाही.. सहाजिकच जेव्हा कधी ते हेमलताचं गाणं कानावर पडतं.. तेव्हा निरागस लिलीच समोर उभी रहाते…
त्याच रंजिताला, आजच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! तुला त्या ‘लिली’च्या भूमिकेसारखा आजार कधीही न होता, तू दीर्घायुषी व्हावे, हीच सदिच्छा!!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२२-९-२१.
Leave a Reply